लेख : मुद्दा : संस्कृतीची जपणूक

1

>> मोक्षदा घाणेकर

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करण्याचा संस्कार हिंदू धर्मात प्रत्येक सश्रद्ध कुटुंबाकडून केला जातो. या संस्काराचेच फलित म्हणून दरवर्षी 1 जानेवारीला नववर्षाच्या आरंभी युवावर्ग मोठ्या प्रमाणात नावाजलेल्या मंदिरांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतो. राज्यातील शिर्डी देवस्थान, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर याखेरीज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या, कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणी लीन व्हायला तरुण वर्ग सुट्टी काढून जातो. 31 डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागताच्या जल्लोषात दारू पिऊन देहभान विसरणारा हाच युवावर्ग दुसऱ्या दिवशी देवदर्शनाच्या रांगेत पाहिल्यावर हा विरोधाभास मनाला खटकतो.

दीडशेहून अधिक वर्षे या देशावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांना मायदेशी जाऊन आज एकाहत्तरहून अधिक वर्षे झाली तरी त्यांच्या सांस्कृतिक गुलामगिरीतून आपण अद्याप बाहेरच पडलेलो नाही, हे 31 डिसेंबरला हिंदुस्थानात होणाऱ्या जल्लोषातून लक्षात येते. गुढीपाडवा हा खऱ्या अर्थाने नववर्षारंभ आहे. गुढीपाडवा केवळ हिंदू नववर्षाचाच नव्हे, तर पृथ्वीचाही आरंभ दिन आहे याविषयीचा उल्लेख वेदांमध्ये सापडतो. मध्यंतरीच्या पिढीने पुढच्या पिढीवर गुढीपाडव्याचे महत्त्व बिंबवणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे 1 जानेवारी हाच जागतिक वर्षारंभ आहे असा गैरसमज पुढच्या दोन-तीन पिढय़ांमध्ये रूढ झाला आहे. जगाच्या पाठीवर आज अनेक देश आहेत ज्यांचा वर्षारंभ 1 जानेवारीला होत नाही. सध्याच्या पिढीवर असलेला पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा, इंटरनेट आणि मोबाईलचा अति वापर यामुळे हिंदुस्थानी संस्कृतीच्या महानतेचा लोकांना विसर पडू लागला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री माजणारे स्तोम ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला करून देणे हे आपलेच कर्तव्य आहे. जो तरुण नववर्षाच्या आरंभी देवदर्शन करण्यासाठी तासन्तास रांगेत उभा राहतो त्याला गुढीपाडवा हाच नववर्षारंभ कसा हे पटवून दिल्यावर तो ते ऐकणार नाही का?