लेख – रहस्य-राणी!

>> दिलीप जोशी

प्रभावी कल्पनाविश्व निर्माण करून वाचकांना वेगळय़ाच विश्वात नेणं आणि तिथेच गुंगवून ठेवणे साध्य झालेले अनेक सिद्ध लेखक-लेखिका जगभर आहेत. त्यामध्ये इंग्लिश रहस्य कथाकार ऍगाथा ख्रिस्ती यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. या रहस्य-सम्राज्ञीने सहासष्ट रहस्य कथानके रचली आणि त्या कादंबऱया जागतिक विक्रमाने खरीदल्या गेल्या. त्याशिवाय काही लघुकथाही लिहिल्या. हर्क्युल पायरो तसेच मिस मार्पल या रहस्यकथेतल्या पात्रांना जनमानसात रुजवले. आपल्याकडे बाबूराव अर्नाळकरांचा ‘काळा पहाड’ एकेकाळी रुजला होता तसे अर्नाळकरांच्या रहस्यकथा लतादीदीसुद्धा वाचत असत. इंग्लिश वाचक वर्गात अशीच अफाट लोकप्रियता ऍगाथा ख्रिस्ती यांना लाभली. गेल्या महिन्यात म्हणजे बारा जानेवारीला ऍगाथा यांचा सेहेचाळीसावा स्मृतीदिन होता. त्यांच्या पश्चात इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांनी लिहिलेल्या ‘माऊस ट्रप’ या रहस्य कथानकावरचे नाटक लंडनच्या थिएटरमध्ये 1952 पासून अव्याहत सुरू आहे. आतापर्यंत त्याचे पंचवीस हजारांहून किती तरी अधिक प्रयोग झालेत. नाटकात काम करणाऱया कलाकारांच्या पिढय़ाही बदलल्या असून असा नाटय़विक्रम केवळ ऍगाथा ख्रिस्ती यांच्याच नावे आहे.

असे अनेक विक्रम ऍगाथा ख्रिस्ती यांच्या लेखनाने केले. त्यांच्या पुस्तकांच्या दोन अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. अशी वाचकप्रियता जगात क्वचितच एखाद्या आधुनिक स्वरूपाच्या पुस्तकाला आणि लेखकाला लाभली असेल. त्यांच्या साहित्यातील या प्रचंड कर्तृत्वाबद्दल त्यांना ‘डेम’ हा किताब देण्यात आला. जगभरच्या 103 भाषांमध्ये ख्रिस्ती यांची रहस्यकथानके भाषांतरीत झली.

इंग्लंडमध्ये डेव्हन प्रांतात 15 सप्टेंबर 1890 रोजी त्यांचा जन्म झाला. घरची श्रीमंती असलेल्या ऍगाथाला मनाप्रमाणे शिक्षण घेता आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात (1914 ते 19) त्यांनी एका रुग्णालयातही काम केले. त्या वयातच रहस्यकथा लिहायला सुरुवात केली, पण 1920 मध्ये ‘द मिस्टेरिअस अफेअर ऍट स्टाट्रब्स’ ही रहस्य कहाणी प्रसिद्ध झाली आणि वाचकांना एक नवी रहस्यकथाकार उदयाला आल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर पुढची पंचावन्न वर्षे त्यांच्या नावाचा डंका साहित्य क्षेत्रात निनादत राहिला.

ऍगाथा यांचे बालपण सुखवस्तू घरात, आनंदी वातावरणात गेल्याने कलागुणांचा विकास होण्यात अडचण नव्हती. पुस्तक वाचनाची त्यांना अतिशय आवड होती. मिसेस मोलवर्थ यांची मुलांसाठी लिहिलेली ‘मॅजिक नट्स’ आणि ‘ख्रिसमस ट्री लॅण्ड’ अशा बालगोष्टींबरोबरच इतर लेखकांची मिळतील ती पुस्तके वाचण्यात त्यांचा वेळ जात असे. समवयस्क मुलांबरोबर खेळण्यापेक्षा आपली पुस्तके आणि पाळीव प्राण्यांबरोबर छोटी ऍगाथा अधिक मजेत राहायची. तरुण वयात मात्र त्यांचा मैत्रिणींचा ग्रुप होता. या सुखाला ग्रहण लागले. ते वडील फ्रेड्रिक यांच्या आकस्मिक, अकाली निधनाने. ऍगाथा यांनी नंतर म्हटलंय की ‘माझ्या अकराव्या वर्षी वडील गेले आणि माझे बालपणही संपले.’ त्यानंतर शिक्षणासाठी काही काळ फ्रान्समध्ये पॅरिसला काढल्यावर ऍगाथा इंग्लंडला परतली. त्या काळात मैत्रिणींसमवेत नाटकात काम करणे, लेखन करणे, संगीत आणि काव्य अशा साहित्य विश्वातील अनेक दालनांमध्ये त्यांची मुशाफिरी सुरू झाली. 1914 मध्ये ऍगाथा मिलरचा आर्चीबाल्ड ख्रिस्ती यांच्याशी विवाह झाला. पुढे ऍगाथा ख्रिस्ती हे नाव इंग्रजी साहित्य जगतात अजरामर झाले.

विल्की कॉलिन्स यांच्या रहस्य कादंबऱया आणि आर्थर कॉनन डायल यांच्या ‘शेरलॉक होम्स’च्या कथा वाचता-वाचता ऍगाथा यांनी ‘मिस्टेरिअस अर्फअर्स स्टाइल्स’ ही कादंबरी लिहिली. त्यातील हर्क्युल पॉथरट हा मिशालजी पोलीस अधिकारी वाचकप्रिय झाला. या कादंबरीनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. रहस्यकथा लिहून वाचकांना स्तिमीत करणाऱया ऍगाथाच्या व्यक्तिगत जीवनातही एक ‘रहस्यमय’ घटना घडली. त्याची ‘नायिका’ तीच होती. 1926 मध्ये घटस्फोट घेण्याच्या काळात ऍगाथा ख्रिस्ती दहा दिवस ‘बेपत्ता’ झाल्याच्या वार्तेने जनक्षोभ इतका उसळला की, इंग्लंडच्या गृहमंत्र्यांना त्यात लक्ष घालावे लागले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पहिल्या पानावर ही बातमी छापली. अखेर 1928 मध्ये घटस्फोट प्रक्रिया पूर्ण होऊन ऍगाथा आणि आर्चीबाल्ड वेगळे झाले. नंतर ऍगाथा यांनी पुरातत्त्व संशोधक सर मॅक्स मॅलोवन यांच्याशी विवाह केला. पुढचे वैवाहिक जीवन सुखाचे ठरले. दुसऱया महायुद्ध काळातही (1939 ते 45) ऍगाथा यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज रुग्णालयात, फार्मसी विभागात काम केले. 1971 मध्ये ‘डेम कमाण्डर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ सन्मान लाभलेल्या या रहस्य सम्राज्ञीने 1976 मध्ये जगाचा निरोप घेतला असला तरी अब्जावधी वाचकांच्या मनात आणि ब्रिटिश रंगभूमीवर त्यांचे नाव अजूनही गाजतेय. असे भाग्य एखाद्यालाच लाभते.