लंडनमधील मानवतेचं मंदिर!

1582

>>द्वारकानाथ संझगिरी

लंडन शहराच्या छपराएवढं उदारमतवादी, कनवाळू छप्पर जगातल्या कुठल्याही शहराचं नाही. विविध देशांचे नेते, राजकारणी, लेखक, कलावंत, खेळाडू त्या छपराच्या छायेत राहिले. तुम्हाला कुठे चार्ली चॅप्लीन राहिल्याच्या खुणा दिसतात, कधी स्वामी विवेकानंद, तर कधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या. महात्माजींचा तर पार्लमेंट स्क्वेअरमध्ये पुतळा आहे. जे ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढले त्यांनाही लंडनने कवेत घेतलं. मुख्य म्हणजे त्यांनी ब्रिटिश साम्राज्यावर केलेल्या जखमा विसरून त्यांचं अस्तित्व गौरवण्याचा मोठेपणा या शहराकडे आहे, इथल्या नागरिकांकडे आहे. म्हणून लंडनचा महापौर आणि उपमहापौर मुस्लिम असू शकतो. तो हिंदुस्थानी असू शकतो.

या कनवाळू लंडनमध्ये मानवतेचं मंदिर उभं राहिलंय. ते उभं करण्यात हिंदुस्थानी सरकारचा वाटा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या म्युझियमला मी मानवतेचं मंदिर म्हणतोय. या वास्तूत डॉ. बाबासाहेब 1921-22 मध्ये राहिले. तिथे जाणं सोपं आहे. लंडन टय़ूबच्या नॉर्दन लाईनवर यॉकफार्म नावाचं स्टेशन आहे. तिथून बाहेर पडलं की तीन मिनिटांत आपण त्या वास्तूत पोहोचतो. लंडनच्या प्राईमरोज हिल विभागात किंग हेन्री रस्त्यावरचं हे अर्ध विटकरी घर आहे. लंडनमध्ये टेन डाऊनिंग यापेक्षा सुप्रसिद्ध पत्ता नाही. इथले हिंदुस्थानीसुद्धा टेन हेन्री रोड सुप्रसिद्ध करू शकतात. त्यासाठी मनातल्या भिंती तोडाव्या लागतील आणि मुळात म्हणजे एक महामानव इथे राहून गेला याची सामान्य हिंदुस्थानी माणसाला माहिती व्हायला हवी. या वास्तूच्या इमारतीवर एक निळा बोर्ड आहे. त्यावर लिहिलंय, “Dr. Bhimrao Ramji Ambedkar 1891-1956, Indian Crusader of Social Justice lived here1921-1922.” लंडनमध्ये थोरा-मोठय़ांच्या घरावर असा निळा फलक लावायची अत्यंत अनुकरणीय पद्धत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधलं अस्तित्व मोठं असावं. हे त्यांच्या लेखनातून जाणवतं. 1920 च्या ब्रिटनमधल्या बेरोजगारी, शहरीकरण आणि आयर्लंडच्या स्वातंत्र्य लढय़ाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात सापडतं.

इथल्या वास्तव्यापूर्वीही डॉक्टरांचं वास्तव्य लंडनमध्ये होतं. त्यांना बडोद्याच्या महाराजांनी शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली होती. सयाजीराव गायकवाडांना त्यांच्यातला हिरा दिसला होता. त्याला पैलू पाडावेत म्हणून त्यांनी डॉक्टरांना लंडनला पाठवलं. तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला, पण 1917 साली पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना परतावं लागलं. दुर्दैव पहा, लंडनहून परतताना ज्या बोटीत त्यांचं सामान होतं त्या बोटीला टॉरपेडोने उडवलं. त्यांनी तयार केलेला थिसिस त्यात उद्ध्वस्त झाला. ते 1920 साली लंडनला परतले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतलाच, पण कायद्याच्या पदवीसाठी लंडनच्या दर्जेदार ‘ग्रे-इन’मध्येही प्रवेश घेतला. लक्षात ठेवा की, आपण एका अशा विद्यार्थ्याबद्दल बोलतोय ज्याच्या पिढय़ान्पिढय़ा प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवल्या गेल्या होत्या. पुस्तक ही त्यांच्यासाठी अप्राप्य गोष्ट होती. शालेय आवार दुरापास्त होते. पुढे बाबासाहेब ज्या शाळेत बसत तिथली जमीन ते उठल्यावर शुद्ध करून घेतली जात होती. अशा मुलाबाबत आपण बोलतोय. त्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वास्तूच्या एका खोलीत राहात. त्या इमारतीत त्यांच्याबरोबर एक हिंदुस्थानी तरुणही राहात होता. अर्थात इतिहासाने त्याला लक्षात ठेवण्याची तसदी घेतलेली नाही. लंडनमध्ये त्यांना पहिल्यांदा मोकळा श्वास घेता आला. त्यांना कुणी जात विचारली नाही. त्यांच्या सावलीकडे कुणी अशुद्ध म्हणून पाहिलं नाही. आजूबाजूच्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लेखक, विचारवंत, संगीततज्ञ यात ते बरोबरीने मिसळून गेले. पण 1917 साली पुन्हा हिंदुस्थानात परतल्यावर त्यांना बडोदा आणि मुंबईत जागा शोधताना नाकीनऊ आले. त्यांच्या अंगावरचा सूट, त्यांचं ज्ञान, त्यांचे ब्रिटिश इंग्लिश सर्व त्यांच्या जातीपुढे निप्रभ ठरलं. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय, ‘युरोप आणि अमेरिकेत पाच वर्षे राहिल्यावर आपण अस्पृश्य आहोत ही भावनाच निघून गेली.’

या म्युझियमच्या तळमजल्यावर काही फोटोंच्या कॉपीज काढून त्याच्या फ्रेम्स लावल्या आहेत. त्यात पंडित नेहरूंचं पहिलं मंत्रिमंडळ आहे. हिंदू कोड बिलावर युक्तिवाद करणारे डॉक्टर आंबेडकर आहेत. गाडगे महाराजांबरोबरचा त्यांचा फोटो आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आणि महाडच्या चवदार तळय़ाच्या सत्याग्रहाचे फोटो आहेत. मला सर्वांत आवडला त्यांचा पेरियार यांच्यासोबत हास्यविनोद करतानाचा फोटो. दोघंही हिंदुस्थानातले सामाजिक क्रांतीचे अध्वर्यू! तिसऱ्या मजल्यावर त्यांचा पलंग, लिहायचं टेबल, चष्मा वगैरे वैयक्तिक गोष्टी आहेत. तिथे एक अतिशय सुंदर टी सेटचा फोटो आहे. बोन चायनाचा असावा. डॉक्टरांवर ब्रिटिशांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचा पोशाख, त्यांची राहणी तशीच होती आणि ब्रिटिशांप्रमाणे ते सकाळी बेड टीसुद्धा घेत. पण आपले डोळे विस्फारतात त्यांची मधल्या मजल्यावरची ग्रंथसंपदा पाहून. त्यात त्यांची भाषणं आणि त्यांचे लेख, यांचे व्हॉल्युम्स तिथे आहेत. मराठीतले संविधान आहे. त्यांच्या अफाट वाचनाने आपण दिङ्मूढ होतो. त्यामुळेच त्यांना तीन मोठय़ा पदव्या मिळाल्या. 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून इकॉनॉमिक्समधील डॉक्टरेट मिळविणारे ते पहिले हिंदुस्थानी होते. त्यानंतर ते बॅरिस्टर झाले आणि मग कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांना मिळाली. ती मानद डॉक्टरेट हाती.

या टेन हेन्री रोडवरून ते सकाळी उठून सेंट्रल लंडनमधील लायब्ररीत चालत जात. काही वेळा ब्रिटिश म्युझियम किंवा हॉलबोर्नच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या कॅम्पसमध्ये जात. ब्रिटिश म्युझियमच्या रीडिंग रूममध्ये कार्ल मार्क्स, बर्नाड शॉ, महात्मा गांधी बसून वाचन करीत असत. तिथेच डॉक्टर जात. आता ती लायब्ररी बंद झालीय. इंग्रजांनी मिटवलेली ती पहिली ऐतिहासिक गोष्ट असावी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये फेनियन तत्त्वज्ञानाशी त्यांच संबंध आला. त्याच वेळी आयर्लंडचा लढा सुरू होता. 1937 साली आयर्लंडची पहिली घटना तयार झाली. डॉक्टरांच्या विचारधारेवर या सर्व गोष्टींचा प्रभाव पडला. 1932 मध्ये ते लंडनमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी गेले. त्या वेळी त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने इतर विद्वान प्राध्यापक आणि उच्चशिक्षित मंडळींबरोबर जेवायला आमंत्रण दिलं. पण त्या वेळी त्यांचा लंच गाजला हाईड पार्क हॉटेलमधला बडोद्याच्या महाराजांबरोबरचा लंच. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने चक्क त्यावर लेख लिहिला आणि म्हटले. ‘राजपुत्र आणि अस्पृश्याच्या एकत्रित जेवणाने युगायुगाची भिंत कोसळली.’
आता कायद्याने जातीच्या भिंती पाडल्या आहेत, पण मनातल्या भिंती कायदा पाडू शकत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे. जेव्हा कधी लंडनला जाल तेव्हा बर्मिंगहॅम पॅलेस पहा, व्हॅक्स म्युझियममध्ये तुमच्या हीरोबरोबर फोटो घ्या, लंडन आयमधून गरुडाला दिसणारं लंडन पहा, पण शेवटी या मंदिराला भेट द्या. इथे देव नाही. पण देवालाही हेवा वाटावा असा महामानव आहे.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या