LOU Ottens – कॅसेट कल्चरचा जनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

काळाबरोबर होणारा बदल अपरिहार्य असतो. आपल्याला आवडो न आवडो, काल त्याच्या गतीने परिवर्तन घडवतच जातो. नव्या जमान्यातील नव्या पिढय़ा नव्याने विचार करतात. पूर्वीच्या संकल्पना मागे पडतात. हे सुचलं ते परवा आलेल्या एका संशोधकाच्या जाण्याने. वयाच्या 94व्या वर्षी लाऊ ओटेन्स या नेदरलॅंड येथील शास्त्रज्ञाने अखेरचा श्वास घेतला. त्यापूर्वी त्याने आपल्या जीवनात एक अपूर्व कामगिरी केली होती ती छोटय़ा (कॉम्पॅक्ट) ऑडिओ कॅसेटच्या निर्मितीची. एकोणीसशे सत्तरच्या दशकात या कॅसेट असलेले मोठे आणि पुढे अगदी ‘वॉकमन’सारखे अगदी खिशात राहतील असे कॅसेट प्लेअर आणि रेकॉर्डर दिसू लागले. जगभर पूर्व-ध्वनिमुद्रित (प्री-रेकॉर्डेड) गाण्यांच्या कॅसेटचं पर्व सुरू झालं. त्या काळातल्या आमच्यासारख्या नवतरुणांना त्याचं फार आकर्षण होतं.

एक छोटासा टेपरेकॉर्डर घेऊन त्यावर सलगपणे हवी ती गाणी टेप करणं आणि केव्हाही ऐकणं ही एक क्रांतीच होती. तसे रेकॉर्ड प्लेअर आधीही होतेच. एडिसनने शोध लावलेल्या फोनोसारखा ग्रामोफोन आमच्याकडेही होता. त्यावर मेणाच्या तबकडय़ा (प्लेट्स) कुठेही नेऊन वाजवता यायच्या. कारण त्याला चावी असायची. किल्ली फिरवून ‘ऊर्जा’ भरली की, एक रेकॉर्ड वाजायची, परंतु हे यंत्र सहज कुठेही (प्रवासात वगैरे) नेण्यासारखं नव्हतं. शिवाय तबकडय़ा तुटण्याची धास्ती. त्यानंतर आले ते इलेक्ट्रिक रेकॉर्ड प्लेअर. त्यात आवाजातील कमीजास्तपणा, उत्तम स्पीकर वगैरेची सोय असायची. 1890 नंतरचा हा ‘फोनो’ बराच काळ वाजत गाजत राहिला. त्यानंतर ती जागा रेकॉर्ड प्लेअरने घेतली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘आवाजी’ संशोधनात प्रगती होऊन मॅग्नेटिक ‘टेप’वर आवाज ध्वनिमुद्रित करण्याचं तंत्र चांगलंच विकसित झालं आणि ‘आनंद’ सिनेमात शेवटी दिसतो तसे मोठय़ा ‘स्पूल’चे टेपरेकॉर्डर आले. आजही आमच्याकडे तसा व्हॉल्व्ह असलेला टेपरेकॉर्डर आहे आणि फोनोसुद्धा! परंतु याच ‘स्पूल’ला अगदी छोटं रूप देऊन ते एका चपटय़ा आयताकृती डबीसारखं करण्याचं तंत्रज्ञान लाऊ ओटेन्स यांनी विकसित करून ‘चमत्कार’ घडवला.

21 जून 1926 ते 6 मार्च 2021 असं प्रदीर्घ जीवन अनुभवणाऱ्या या डच इंजिनीअरने आपली संशोधक बुद्धिमत्ता पणाला लावून केवळ दहा सेंटिमीटर लांब, सहा सेंटिमीटर रुंद आणि जेमतेम अर्धा सेंटिमीटर चपटी कॅसेट बनवली. त्याच्या आतली टेप आणखीच लहान, परंतु त्यावर दोन्ही बाजूला मिळून 90 मिनिटांचं रेकॉर्डिंग व्हायचं. हा सारा प्रकार वापरायला सोपा होता. त्याने बघता बघता रेकॉर्ड प्लेअरची जागा घेतली आणि अमेरिकेत त्याचा लक्षावधी खप झाला. ओटेन्स फिलिप्स कंपनीसाठी काम करत. या छोटय़ा टेपरेकॉर्डरवर गाणी तसंच घरगुती कार्यक्रम किंवा इतरही ध्वनिमुद्रण कोणालाही करता येणं शक्य झालं. 1980च्या सुरुवातीला आम्हीही असा छोटा रेकॉर्डर आणून त्यावर अनेक दुर्मिळ गाणी टेप केली आणि नंतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती ध्वनिमुद्रित करण्यासाठी त्याचा वापर करता आला. विशेष म्हणजे त्यातील बरंचसं रेकॉर्डिंग आजही चांगल्या स्थितीत आहे… आणि बदलत्या काळाला अनुसरून ‘डिजिटाईज’ही केलं आहे. यानंतरचा टेप-टप्पा होता मिनी किंवा मायक्रो कॅसेटचा. ही कॅसेट पाच सेंटिमीटर लांब, तीन सेंटिमीटर रुंद आणि अर्ध्या सेंटिमीटरपेक्षाही कमी अशा चपटय़ा आकाराची असायची. ते रेकॉर्डर तर सहज खिशात राहत. गंमत म्हणजे दहा सेंटिमीटरच्या कॅसेट बनवतानासुद्धा ओटेन्स यांनी त्या आकाराचा लाकडाचा ठोकळा बनवून या आकाराची टेप खिशात मावेल असं प्रात्यक्षिकासह दाखवून दिलं होतं.

मात्र नंतरच्या काळात फ्लॉपी, सीडी, पेन ड्राईव्ह असं ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान कॉम्प्युटर युगाचा संदेश घेऊन आलं. फोनोच्या ‘प्लेट’ पाहणाऱयांना ‘टेपरेकॉर्डर’ नवा वाटला होता तसाच हा नवा बदल ‘टेप’ वापरणाऱयांना वाटला. त्यांचा जमानाही नकळत जुना झाला, परंतु संशोधनाच्या  प्रत्येक पायरीवर घडणारे बदल हे जुन्यातलं ‘सोनं’च असतं. या ऑडिओ कॅसेटनंतर ‘व्हीसीआर’द्वारे चलतचित्राची नोंद करता येऊ लागली. त्याचं रूप रंगीत झालं. मग कॉम्प्युटर युग अवतरल्यावर फ्लॉपी, सीडी, व्हीसीडी, पेन ड्राईव्ह अशी उक्रांती होत आता तर सेलफोनमध्ये (मोबाईल) सर्वच एका क्षणात होत असल्याने ‘रेकॉर्डिंग’चं अप्रूपही राहिलं नाही. नेटवर जुनं-नवं सगळंच उपलब्ध झाल्याने रेकॉर्ड-कॅसेट-टेपचा संच बाळगण्याची गरज संपली. अनेकांकडे आज अशा शेकडो कॅसेट पडून आहेत, पण टेपरेकॉर्डरच नाहीत अशी स्थिती आहे. लाऊ ओटेन्स यांच्या जीवनातच हे सारे बदल घडले. खऱ्या संशोधकाला कोणत्याही संशोधनाचा पुढचा टप्पा पाहायला आवडतो. अगदी आपल्या संशोधनापलीकडे कोणी प्रगती केली तर त्यांना आनंदच होतो. मात्र त्यांचं त्या त्या काळातलं कार्य ‘मैलाचा दगड’ होऊन संशोधनातील उक्रांतीची जाणीव करून देतं. ओटेन्सच्या जाण्याने त्यातल्या एका टप्प्याचा जनक काळाआड गेला आहे.

[email protected]