लेख : अखेर संयमाचे फळ मिळाले!

45

>> दिलीप जोशी 

गेल्या आठवडय़ात म्हणजे 15 जुलै रोजी चांद्रयान-2चं यशस्वी प्रक्षेपण पाहण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत उत्सुकतेने अनेक जण जागे होते. परंतु प्रक्षेपणाच्या थोडाच काळ आधी क्रायोजेनिक इंजिनातील इंधन गळतीची शंका आल्याने ते पुढे ढकलण्यात आलं. अन्यथा आजच्या लेखाचं शीर्षक ‘आत्मबळाची भरारी’ असं ठरवलं होतं. खैर, झालं ते योग्यच झालं. कदाचित तशा परिस्थितीत यानाचं उड्डाण केल्याने अपयश आलंही नसतं, परंतु धोक्याची पुसटशी शंका किंवा अगदी सूक्ष्म गफलतही या प्रचंड खर्चाच्या प्रकल्पाला मातीमोल ठरवू शकते ही झाली एक गोष्ट, पण त्याबरोबरच आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अशा अपयशाने निर्माण होणारी सार्वत्रिक निराशा. म्हणूनच अपयशाची चाहूल लागली असेल तर क्षणभर थबकणंच सुज्ञ जन पसंत करतात. ‘शुभस्य शीघ्रम’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे शुभ गोष्ट तत्काळ करावी, त्याला विलंब लावू नये. त्याचप्रमाणे ‘अशुभस्य कालहरणम्’ असंही म्हटलेलं आहे. ‘अशुभ’ किंवा अघटित काही घडण्याची शक्यता वाटत असेल तर थोडा संयम बाळगावा, ‘कालहरण’ करावं. म्हणजे काही वेळ जाऊ द्यावा आणि मग पुन्हा ईप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत.

इस्रोच्या वैज्ञानिकांनी ऐनवेळी असाच योग्य निर्णय घेतला आणि चांद्रयान-2चं प्रक्षेपण रोखलं. यापूर्वीही एकदा ते लांबवण्यात आलं होतं. त्यानंतर 15 जुलैची पहाटेची वेळ ठरली होती. तीही हुकली, पण म्हणून निराश होण्याचं काहीच कारण नाही. आतापर्यंत चंद्रावर ‘स्वारी’ करण्यासाठी निघालेल्या 131 मोहिमांपैकी 67 प्रक्षेपणातच यश मिळालेलं आहे. अमेरिकेसारख्या तंत्रज्ञानात अत्यंत प्रगत असलेल्या देशाच्याही अनेक मोहिमा फसल्या आहेत. अपोलो-13चं प्रक्षेपण बिनसलं तेव्हा तर त्यात संभाव्य चांद्रवीर होते. त्यांना सहीसलामत पृथ्वीवर आणण्यात यश आलं याचंच जास्त कौतुक झालं आणि ते योग्यच होतं.

तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरीसुद्धा कुठेतरी कधी अनाकलनीय सूक्ष्म कमतरता राहू शकते. अवकाशात पाठवण्याच्या यानांच्या बाबतीत तर विलक्षण अचूकतेला महत्त्व असतं. आपल्या चांद्रयानाचंच पहा. त्याची कक्षा पृथ्वीच्या धुवीय भागांना फेऱ्या घालणारी (पोलर ऑर्बिट) आहे. प्रत्येक फेरीत आत्यंतिक अचूकपणे कक्षाबद्दल करत यान फिरत ठेवायचं; नंतर चांद्रकक्षेत जाणारा ‘कोन’ साधायचा, त्यानंतर त्याचा वेग थोडा कमी करून ते चंद्राभोवती फिरण्यात यशस्वी झालं की, ‘लॅन्डर’ (चंद्रावर उतरणारं) मूळ यानापासून विलग करायचं. त्यापुढची पायरी म्हणजे ते चंद्रावर ठरल्या जागी यशस्वीरीत्या उतरवायचं आणि त्यातील रोव्हर किंवा छोटी गाडी चांद्रपृष्ठावर फिरवायची! बरं, हे सगळं इथे पृथ्वीवर बसून ‘रिमोट कंट्रोल’ने साध्य करायचं. आपण रिमोट कंट्रोलने साधे टीव्ही चॅनल बदलताना दहावेळा चुकतो. तशी एकही गफलत अशा मोठय़ा प्रकल्पात होतच नाही. हजारदा तपासणी करून अचूकतेची खात्री करून घेतलेली असते. हे सगळं खरं असलं तरीसुद्धा क्वचित कुठेतरी उणीव राहू शकते. यावेळी त्या उणिवेची जाणीव वेळीच झाली म्हणून बरं झालं. योग्य संयमाने चांद्रयान सावरलं. आता 22 तारखेला नव्या तारखेनुसार हे प्रक्षेपण झालंदेखील.

असा ‘संयम’ व्यक्तिगत जीवनातही दाखवण्याचे प्रसंग येतात. सामूहिक बाबतीतही येतात. गेल्याच आठवडय़ात क्रिकेटचा विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड पराभूत होऊन इंग्लंडचा विजय झाला. त्यातील ‘तांत्रिक’ विजयामुळे इंग्लंडच्या विजयापेक्षा न्यूझीलंडच्या पराभवानेच जग हळहळलं. पराभवसुद्धा असा देदीप्यमान हवा. आता मॅच समसमान (टाय) झाल्यावर एका षटकाच्या कामगिरीवर अंतिम निर्णय द्यावा का यावर वाद सुरू आहे. हा ‘ऍकॅडेमिक’ वाद ठीक आहे. ‘वादे वादे’ काही ‘तत्त्वबोध’ झाला तर उत्तमच, पण तोपर्यंत आहे तो नियम स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्स याचं दुःख किती असेल, परंतु त्याने अत्यंत समंजस, संयमी प्रतिक्रिया दिली. विजेत्या इंग्लिश संघाचं त्याने मनापासून अभिनंदन केलं आणि प्रचलित ‘नियमानुसार’ त्यांचं जगज्जेतेपदही मान्य केलं. मात्र आपला संघ अटीतटीच्या सामन्यात तोडीस तोड ठरला याबद्दलही अभिमान व्यक्त केला. त्याने उगाच त्रागा केला नाही, हे कौतुकास्पद.

नंतर लगेच विम्बल्डन टेनिसच्या ग्रॅण्ड स्लॅम एकेरी स्पर्धेत नोवॅक जोकॉविक्ने विजय प्राप्त करून रॉजर फेडरर या टेनिसमधल्या दिग्गजाचा पराभव केला. हे यश उल्लेखनीयच म्हणावं लागेल, पण टेनिसच्या चाहत्यांनी त्याचवेळी अपयशी फेडररचंही कौतुक केलं. 37 वर्षांच्या फेडररच्या नावे ही स्पर्धा 20 वेळा जिंकल्याचा विक्रम आहे. गेल्या काही वर्षांत जोकोविक् हा तेजस्वी तारा या क्रीडांगणात उगवला आहे. हे खरं असलं तरी फेडररचं महत्त्व कमी होणार नाही. क्रिकेटमध्ये ब्रॅडमन, गावसकर, तेंडुलकर यांनी अनुक्रमे शतकांचे विक्रम केले. त्यांच्या संख्येत वाढ झाली म्हणून आधीच्याचा विक्रम कमी ठरत नाही. तो त्या काळाच्या चौकटीत पाहायचा असतो. यासाठीच प्रगल्भता लागते. त्या त्या काळातल्या दिग्गजांचं स्थान कालातील असतं. ‘असा बालगंधर्व पुन्हा नाही होणे’ म्हटलं जातं हे त्याच अर्थाने.

या सगळ्या गोष्टींमधून आपणही कळत-नकळत काहीतरी शिकत असतो. कदाचित पुढच्या काळात फेडरर पुन्हा जगज्जेता टेनिसपटू ठरेल. न्यूझीलंडचा संघ पुन्हा यश खेचून आणेल. हिंदुस्थानी संघही तशीच कामगिरी करू शकतो. चांद्रयान-2ची भरारीही आता यशस्वी झाली. मात्र आत्मबळाच्या भरारीला कधी कधी संयमाचा लगामही गरजेचा असतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या