
>>मधुमंजिरी गटणे
2022च्या उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असतानाच ‘खळाळता अवखळ झरा’ हे मुखपृष्ठापासूनच डोळ्यांना थंडावा देणारं पुस्तक कुमार वाचकांच्या भेटीला आलं आहे. एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेल्या, मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर स्वच्छ, नितळ निळ्या पाण्यात आनंदाने जलविहार करणारा बालचमू चितारलेला आहे. या कथासंग्रहात एकूण 16 कथा असून बाळू आणि शमी हे भाऊबहीण यातल्या बहुतेक कथांतली प्रमुख पात्रं आहेत. कधी ही पात्रं स्वतःच आपली कथा सांगतात, तर कधी ती त्रयस्थाच्या तोंडून सांगितली जाते. बाळूदादा हा साधारण आठव्या-नवव्या यत्तेत, तर शमी त्याच्यापेक्षा दोनेक वर्षांनी लहान असावी असं ते शाळेत शिकत असलेल्या, कथांत उल्लेखित केलेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भांवरून समजते.
शहाण्या, समजूतदार मुलांचं जे कल्पनाचित्र प्रत्येक पालकाच्या मनात असतं, त्या चित्रातून कथांत उतरलेली, संवेदनशील, आपल्या वागण्याने सहजच बालवाचकांवर संस्कार घडवणारी ही बालपात्रं आहेत. पारध्याने पिंजऱयात बंदिवान केलेल्या सगळ्या पक्ष्यांना भाच्याने मुक्त केल्यावर पारध्याला दाम अदा करायला तत्पर असणारा मामा ‘स्वातंत्र्याचे मोल’ कथेद्वारे भेटतो. उदबत्त्या विकून कुटुंबाला हातभार लावणाऱया रमेशला नकळत ओरडल्याचा पश्चात्ताप होणाऱया प्रेमळ गुरुजींची गाठ बाळू ‘पावसाची कविता’ कथेत घालून देतो. मजूरकन्या सीता हिला आपल्यासारखंच शाळेत जाता यावं हा शमिताचा आग्रह समजून घेऊन त्यासाठी मदत करणारे पालक ‘मदतीचा चिमुकला हात’ कथेत दिसून येतात. या सर्वच व्यक्ती कविमनाच्या, मनातील ऋजुता जपणाऱया आहेत.
मराठी भाषेची गोडी ‘म्हणींची गंमत, गप्पांची संगत’ कथेतील म्हणींच्या खेळाच्या रूपाने अथवा ‘भाषेची गोडी’ कथेतील विविध प्राण्यांच्या आवाजाला बहाल केलेल्या नामाभिधानांच्या रूपाने अथवा ‘श्रावणसरी आल्या दारी’ कथेतील मराठी कवी आणि त्यांची टोपणनावे याविषयीच्या संवादरूपाने समजावून देण्याचा लेखकाचा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे. सर्कस हा प्रकार आता दुर्मीळ होत चालला आहे, पण त्यातल्या विदूषकाच्या हसऱया मुखवटय़ामागचा उदास चेहरा ओळखून त्याच्या कलेला आपल्या कृतीद्वारे सन्मान प्रदान करण्याचं काम बाल नायक-नायिका करतात, तेव्हा बालकांच्या थोर कृतीचं कौतुक वाटतं. सुशिक्षित, पांढरपेशा घरांप्रमाणेच कामकरी, कष्टकरी वर्गातील पात्रं कथांमध्ये डोकावतात. या वर्गातील कष्टकरांच्या, मुलांच्या अडचणींचा सामनाही मुलांना समजेल अशा रीतीने व्यक्त केला आहे. या व्यक्तींच्या समस्या दूर करायला बालके पुढे सरसावतात. ‘कमलची जिद्द’, ‘मदतीचा चिमुकला हात’, ‘सुंदर लखलखीत मन’ या कथांतून हे प्रतीत होतं.अशाच संवेदनशीलतेची समाजाला सर्वच काळांत गरज असते.
खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा
लेखक ः एकनाथ आव्हाड
प्रकाशक ः मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठ: 96, मूल्य: रुपये 195/-




























































