चिनी हेरगिरी, जशास तसे वागा!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

चीनतर्फे हिंदुस्थानचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह काही हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालींवर गुप्तपणे पाळत ठेवण्याचा आणि त्यासाठी हेरगिरी करीत असल्याचा आरोप झाला आहे. लोकशाहीवादी देशांनी एकत्र यावे. याशिवाय हिंदुस्थानच्या सैन्यदलांचा सर्वोत्तम विद्यापीठे, स्टार्ट-अप कंपन्या आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी संवाद वाढवून आपल्या देशातील बौद्धिक संपदेचा वापर राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्यापक प्रमाणात करायला हवा. शत्रू आणि मित्र जर आपली माहिती मिळवत असतील, तर आपणही त्यांची माहिती मिळवलीच पाहिजे, आणि त्या माहितीवर आधारित खंबीर निर्णय घेतले पाहिजेत.

सध्या देशापुढे दोन मोठे प्रश्न उभे आहेत. चिनी व्हायरसचा म्हणजे कोरोनाचा फैलाव आणि 365 दिवस चीनशी होणारी लढाई. आता नवे चिनी कारस्थान समोर आले आहे. हिंदुस्थानच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशातील अतिमहत्त्वाच्या हजारो व्यक्तींच्या हालचालींवर चीन गुप्तपणे नजर ठेवत असल्याचा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राने केला आहे.

चींनसाठी हेरगिरी करणारी झेनुआ डाटा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी चीन सरकार आणि लष्करासाठी काम करते. ओव्हरसीज की इन्फर्मेशन डाटाबेस या नावाने हिंदुस्थानसह अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि अन्य काही देशांतील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांची माहिती चीनने गोळा केली आहे. सर्वच प्रबळ देशांचे आर्थिक, राजकीय, लष्करी आणि शक्य त्या अन्य मार्गाने खच्चीकरण करून जगावर राज्य करण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने चीन झपाटला आहे. ही हेरगिरीद्धा त्यासाठी सुरू आहे. त्यातूनच हिंदुस्थानात अराजक माजवून आर्थिक प्रगती थांबवण्याचा चीनचा इरादा आहे.

नवनव्या आघाडय़ांवर चिनी युद्ध

हिंदुस्थानात चीन नवनव्या आघाडय़ांवर हेरगिरीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छुपे युद्ध खेळत असतो. त्यात मतदार याद्यांत फेरफार घडवून आणण्यापासून ते फेक न्यूज, माहिती तंत्रज्ञानात हस्तक्षेप, खोटय़ा प्रचारापर्यंत अनेक गोष्टी आहेत. आता अशा स्थितीत हिंदुस्थानातल्या वृत्तपत्रांनी चीन करीत असलेली हेरगिरी उघडकीला आणली आहे. ‘झेनुआ’ने जगभरात 20 ठिकाणी माहिती गोळा करण्याची यंत्रणा उभारली असून त्यापैकी अमेरिका आणि दक्षिण कोरियातील दोन केंद्रांचे तपशील उघड झाले आहेत. ‘आयबीएम’ कंपनीत काम करणाऱया वांग शुफैने 2018 साली शेनजेन येथे स्थापन केलेल्या या कंपनीत 50 कर्मचारी काम करतात. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर करून ही कंपनी पाच अब्ज बातम्या आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट स्कॅन करून त्यातून मिळणाऱया माहितीच्या आधारावर सुमारे 24 लाख लोक आणि संस्थांवर पाळत ठेवते. या कंपनीने परदेशातून मिळवलेल्या महत्त्वाच्या माहितीच्या डेटाबेसच्या तपासणीचे काम चालू आहे.

पाळत ठेवलेल्या हिंदुस्थानी व्यक्तींमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय, सैन्यदलांच्या विविध दलांचे आजी-माजी प्रमुख, न्यायाधीश, महत्त्वाचे संपादक, स्टार्ट-अप कंपन्यांपासून मोठे उद्योजक, कलाकार आणि खेळाडूंचा समावेश आहे. या माहितीच्या साठय़ातील केवळ 10 टक्के नावे उघड झाली असून त्यात 52 हजार अमेरिकन, 35 हजार ऑस्ट्रेलियन, 9,700 ब्रिटिश, पाच हजार कॅनेडियन आणि अन्य देशांच्या महत्त्वाच्या लोकांची नावे आहेत.

हेरगिरीतील समान धागे म्हणजे हे देश चीनचे जमिनी किंवा सागरी शेजारी असून चीनच्या महत्त्वाकांक्षांना वेसण घालण्यासाठी उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय आघाडीचा ते भाग आहेत. काळानुसार परराष्ट्र संबंध आणि कूटनीतीचे स्वरूप बदलत आहे. परराष्ट्र संबंधांत पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या क्षेत्रात काम करणारे संशोधक, समाजातील प्रभावशाली व्यक्ती आणि जनमताचे योगदान मोठे आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयात ‘पब्लिक डिप्लोमसी’ आणि ‘डिजिटल डिप्लोमसी’ विभाग तयार झाले आहेत. चीनीं मंत्रालये अन्य देशांच्या नेत्यांच्या समाजमाध्यमांतील पोस्टकडे लक्ष ठेवून असतात.

मोठय़ा आर्थिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्याही असे काम करतात. कोणता तरुण नेता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकेल याची चाचपणी करून त्यांच्याशी संबंध सुधारतात. या नेत्यांच्या अवतीभोवती असणारी माणसं, त्यांच्या वाईट सवयी, भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवले जाते. त्यासाठी डिजिटल संसाधनांचाही वापर केला जातो. चीनच्या गुप्तचर संस्था अशा कामासाठी अधिक प्रगत आणि अचूक संसाधनांचा वापर करतात. ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ आणि ‘ऍमेझॉन’सारख्या कंपन्यांकडे जगातल्या अब्जावधी लोकांची सर्व प्रकारची माहिती असते. ही माहिती जाहिरातदारांना विकून या कंपन्या त्यातून पैसा कमावतात.

चीन सर्वांच्या पुढे

चीन करतोय ते सर्वांच्या अनेक पावले पुढे आहे. चीनमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न 1980च्या दशकात सुरू झाले. चीनची लोकसंख्या मुख्यतः देशाच्या पूर्व दिशेकडील किनारी भागांमध्ये वसली आहे. पश्चिमेकडील तिबेट तसेच उत्तरेकडील इनर मंगोलिया आणि शिनजियांग ही राज्ये आकाराने प्रचंड असली तरी त्यातील लोकसंख्या तुरळक असून ती भिन्नवंशीय आहे. चीनने या लोकसंख्येला सैन्याच्या खाली ठेवले असून डिजिटल युगात त्याला नवीन धार आली आहे.

चीनच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत तेथील सरकार खासगी कंपन्यांकडूनही अशा प्रकारची माहिती गोळा करू शकते. या क्षेत्रात चीन अन्य देशांच्या अनेक पावले पुढे जाऊ शकतो. याचे कारण जगात संगणक, मोबाईल, प्रोसेसर, संगणकीय चिप्स, टेलिकॉम गिअर उत्पादनात चीनच्या कंपन्यांची मक्तेदारी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चिनी ऍप्स जागतिक बाजारपेठेत आहेत.

मौल्यवान माहिती वेगळी काढणे

प्रचंड मोठय़ा प्रमाणावर माहिती गोळा करून तिचे पृथ्थकरण करून त्यातील मौल्यवान माहिती वेगळी काढणे सोपे आहे. आगामी काळात येणाऱया ‘5-जी’ तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वापर वाहतूक, वैद्यकीय उपचार, शिक्षण आणि शासन व्यवस्थेत होणार असल्यामुळे यातून चीनला मिळणाऱया माहितीत वाढच होणार आहे. संगणकाचा वाढता वेग लक्षात घेता, उद्या अब्जावधी लोकांवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवणेही चीनला शक्य होणार आहे. एकंदरच प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान व कुशल मेंदू यांच्या जोरावर आता कुणालाही, कसलीही माहिती मिळवणं फारच सोपं झालं आहे. म्हणून ‘5-जी’ तंत्रज्ञानाकरिता चिनी कंपनी हुवेईवर हिंदुस्थानने बंदी घातली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या