लेख – आभाळमाया – हवामानाचा लेखाजोखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

गेल्या महिन्यात 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिवस होता. याच दिवशी 1950 मध्ये युनोने ‘वर्ल्ड मीटिअरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्यापूर्वी इंटरनॅशनल मीटिअरॉलॉजिकल संस्था होती. 1951 पासून नव्या संस्थेचं कार्य वेग घेऊ लागलं, परंतु 23 मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून पाळला जावा असं 1961 मध्ये ठरलं. या संस्थेने गेल्या साठ वर्षांत जगातील बदलत्या हवामानाचा सतत अभ्यास केला.

हवामान आणि पर्यायाने पर्यावरणाचं रक्षण म्हणजे माणसासह पृथ्वीवरच्या सर्व जैविक घटकांचं रक्षण कसं आहे ते पटवून देणारी प्रदर्शनं ठिकठिकाणी आयोजित केली. व्याख्यानं, परिषदा यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जनता आणि विविध देशांतील सरकारं या सर्वांना जागृत करण्याचं त्यांचं काम आजही सुरूच आहे. ‘सूर्य-पृथ्वी आणि वातावरण’, ‘मेघमाला समजून घेताना’ पिंवा ‘हवामान आणि तुम्ही’ अशा अनेक थीम पिंवा बोधवाक्यांद्वारे हवामानाचं महत्त्व जगाला वेळोवेळी सांगण्यात आले. या वर्षीचं बोधवाक्य आहे ‘द ओशन, अवर क्लायमेट अॅण्ड वेदर’किंवा ‘आपलं वातावरण आणि महासागर’.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 75 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. त्यापैकी महत्त्वाचा वाटा पॅसिफिक, अॅटलॅण्टिक, अरबी आणि हिंदी महासागराचा आहे. याशिवाय लहानमोठे उपसागर, सामुद्रधुनी वगैरे आहेतच. आपल्या हवामानावर या विशाल जलसाठय़ाचा सतत परिणाम होत असतो. किंबहुना महासागर नसते तर शुष्क पृथ्वीवर जीवसृष्टीच अवतरली नसती. त्यामुळे समुद्राच्या पर्यावरणाचा विचार हा पर्यायाने आपल्या सुखाचा विचार ठरतो.

आज आपण जागतिक हवामानाचा अंदाज जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो अशी यंत्रणा उपलब्ध आहे. अगदी विसाव्या पूर्वार्धापर्यंत हवामानाविषयीचे आडाखे स्थानिक असायचे. त्या त्या प्रदेशातील माणसांना परंपरागत अनुभवाने हवामानाचा अंदाज असायचा आणि त्यावर आधारित शेतीचा व्यवसाय चालायचा. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ यातील ‘नेमेचि’ म्हणजे निश्चितपणे, ठरावीक काळातच पाऊस येणार याची खात्री असायची आणि तसेच घडायचे. एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत पर्यावरणाचा बेसुमार ऱहास झाला नव्हता. तेव्हा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतुचक्र ठरल्याप्रमाणे फिरत असे. हा लेख लिहीत असताना नागपूरमध्ये मार्चमध्येच धुवांधार पाऊस पडतोय आणि आणखी चार दिवस देशात आणि राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पावसाची चिन्हे आहेत. पन्नास वर्षांपूर्वी असं क्वचितच घडायचं. दिवाळीत पाऊस आला तर लोकांना आश्चर्य वाटायचं. आता तो होळीच्या काळातही येऊ लागला आहे.

वाढतं शहरीकरण, जंगलतोड, यंत्रयुगाने फायद्याबरोबरच आणलेले तोटे आणि त्यातून झालेले प्रदूषण यातून निसर्गही लहरी झाला आहे. समुद्राचं पाणी तापून त्याची वाफ आकाशात जाऊन पावसाळी ढग तयार होतात ही शालेय जीवनात समजलेली गोष्ट. मात्र त्याचं एक कोष्टकही असायचं. मार्च ते मे महिन्यात उन्हाळा खूप झाला की, जूनच्या 7 तारखेला पाऊस यायचा. कारण तोपर्यंत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात समुद्रावर निर्माण झालेले पावसाळी ढग आपल्या दिशेने येऊ लागायचे. गेल्या काही वर्षांत ‘ग्लोबल वॉर्मिंग’ने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली आणि समुद्राचं पाणीही तापत चाललं. त्यातून अवकाळी पावसाची निर्मिती झाली आणि घनदाट जंगलांची संख्या कमी होत असल्याने पुठेही केव्हाही जलधारा बरसायला लागल्या.

हल्ली सगळं वातावरणच बिघडलंय, आमच्या वेळी असं नव्हतं, असं जेव्हा वयस्कर माणसं सांगतात तेव्हा त्यात पर्यावरणीय तथ्य असतं. असे ज्येष्ठ म्हणतात की, पूर्वीसारखी थंडी पडतच नाही, पाऊसही वाटेल तेव्हा पडतो. ही वेळ का आली याचा विचार करायला हवा. विज्ञानाने आता बरीच प्रगती केलेली आहे. पृथ्वीबाहेर अवकाशात जाऊन पृथ्वीवरच्या प्रदेशांची, महासागरांची आणि पावसाळी ढग पिंवा चक्रीवादळांची माहिती आता आधीच मिळू शकते.

बरोबर 61 वर्षांपूर्वी 1 एप्रिलला अमेरिकेचा पहिला हवामानविषयक यशस्वी उपग्रह अवकाशात झेपावला. त्यापूर्वीचा उपग्रहाच्या कक्षेत अस्थिरता आली होती, परंतु टायरॉस-1 उपग्रहाने चांगली कामगिरी केली. जागतिक हवामानाचा अंदाज सांगणारे अनेक देशांचे उपग्रह नंतरच्या काळात अवकाशात भ्रमण करू लागले त्याची ही नांदी होती. उपग्रहाची माहिती आणि डॉप्लर यंत्रणेचा वापर करून प्रगत देशांत नेमका किती वाजता, पुठे पाऊस पडेल पिंवा बर्फ पडेल हे सांगितलं जातं आणि ते 99 टक्के खरं ठरतं. मात्र अंदाज वर्तवणारी यंत्रणा काय घडणार तेच सांगणार, पर्यावरणाचं रक्षण आपल्यालाच करायला हवं ते आपल्याच भल्यासाठी.

[email protected]