वेब न्यूज – आता पाळा ‘CyberDog’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. या पाळीव प्राण्यांना अगदी घरातील एक सदस्य असल्यासारखे प्रेम हे लोक करत असतात. कुत्री, मांजरी, लव्हबर्डस्सारखे पक्षी, विविध प्रकारचे मासे हे सामान्यतः घरोघरी आढळणारे पाळीव जीव होय. मात्र कोरोनाच्या काळात अनेक मोठय़ा शहरांमध्ये सोबती म्हणून रोबोट्सची मागणी वाढल्याचे आश्चर्यकारक चित्रदेखील बघायला मिळते आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक एकटे पडलेले लोक हे सोबतीसाठी मानवापेक्षा यंत्रांना अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. हा आश्चर्यकारक अभ्यास समोर आल्यानंतर या व्यवसायाकडे मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांचे लक्ष गेले नसते तरच नवल! या संधीचा फायदा घेत आता ‘शाओमी’ (Xiaomi) या जगातील एक मोठय़ा मोबाईल उत्पादक असलेल्या कंपनीने अनोखा असा ‘रोबोडॉग’ अर्थात यांत्रिक कुत्रा तयार केला आहे. या रोबो गॅजेटला ‘Cyber Dog’ असे नाव देण्यात आले आहे. एखाद्या छोटय़ाशा कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे गोड दिसणारा हा रोबोडॉग कोणालाही चावत नाही हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ होय. शाओमीने या रोबोडॉगची किंमत सध्या 9999 युआन, म्हणजेच हिंदुस्थानी चलनात साधारण 1.15 लाख इतकी ठेवलेली आहे. या रोबोडॉगची निर्मिती का करण्यात आली आहे, याबद्दल कंपनीने कोणतेही कारण दिलेले नाही, तसेच कंपनी हे रोबोडॉग कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना विकणार आहे, याचा खुलासादेखील ‘शाओमी’तर्फे करण्यात आलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनी या रोबोडॉगचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादनदेखील करणार नसून सध्या फक्त अशा प्रकारच्या फक्त 1000 रोबोडॉगचे उत्पादन करण्यात येणार आहे. सुरुवातीला हे रोबोडॉग फक्त इंजिनीअर्स, शाओमीचे फॅन्स आणि रोबोटिक्सच्या क्षेत्रात रुची ठेवणाऱया लोकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तीन किलोग्रॅम वजनाचा हा रोबोडॉग प्रतिसेकंद 3.2 मीटर इतक्या वेगाने चालू शकतो. यामध्ये एक कॅमेरा, अल्ट्रावाईड इग्पेब लेन्स, विविध सेन्सर्स, GPSआणि Intel RealSense D450 डेप्थ सेन्सिंग कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्यांच्या मदतीने आजूबाजूचे वातावरण तसेच अडथळ्यांचा अभ्यास करून हा रोबोडॉग हालचाली करणार आहे.