लेख – श्री गुरुदेव दत्त आणि भावार्थ

1299

>> विलास पंढरी

जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर गुरू लागतोच. ‘‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः,  गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः’’  परब्रह्म म्हणजेच गुरू. अशी गुरूंची थोरवी या श्लोकात सुंदर वर्णिली आहे. गुरुदेव दत्तांना तर सद्गुरू म्हटले जाते. आज म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. दत्ताची उपासना करणे म्हणजे दत्ताप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांच्याकडून सतत शिकणे अन् शिकण्याचा निश्चय करणे!

 दत्तांची तीन नावे आणि त्यांचा अर्थ पुढीलप्रमाणे

  1. 1. दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा! प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो, हालचाल करतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’ हेच सत्य आहे. आपल्याला याची जाणीव झाली तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्तजयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.
  2. अवधूत : जो अहं धुतो तो अवधूत! दत्तजयंतीला आपण प्रार्थना करूयात, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी मला दे, ज्यामुळे सगळं जग सुखी होईल.’
  3. दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा! जो सर्वव्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत तो दिगंबर! आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ते तूच आम्हाला शिकव.’

परिवाराचा भावार्थ

गाय :  दत्तांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.

कुत्रे :  हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक आहेत.

औदुंबर वृक्ष :  दत्तांचे पूजनीय रूप! या वृक्षात दत्ततत्त्व अधिक आहे.

मूर्तीविज्ञान 

गुरुदेव दत्तांच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढीलप्रमाणे –

कमंडलू आणि जपमाळ :  हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.

शंख आणि चक्र :  श्रीविष्णूचे प्रतीक आहे.

त्रिशूळ आणि डमरू :  शंकराचे प्रतीक आहे

झोळी :  ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

प्रमुख तीर्थक्षेत्रे

माहूर :  ता. किनवट, जि. नांदेड, महाराष्ट्र.

गिरनार :  जुनागडजवळ, सौराष्ट्र. याला 10 सहस्र पायऱ्या आहेत.

कारंजा :  श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्तमंदिर उभारले.

औदुंबर :  श्री नृसिंह सरस्वती यांनी चातुर्मासात येथे निवास केला होता. हे स्थान महाराष्ट्रातील भिलवडी स्थानकापासून 10 कि.मी. अंतरावर कृष्णाकाठी आहे.

 नरसोबाची वाडी :  हे महाराष्ट्रात असून श्री नृसिंह सरस्वती येथे 12 वर्षे राहिले होते. येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे.

गाणगापूर :  हे पुणे-रायचूर या रेल्वेमार्गावर कर्नाटकात आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे नृसिंह सरस्वती यांनी 23 वर्षे वास्तव्य केले होते.

 

अद्वैत भक्तीचे प्रतीक

>> नामदेव वसंत सदावर्ते

विश्वाचा उद्धार करण्यासाठी निर्गुण-निराकार परमेश्वरांनी पूर्णावतार घेतला. मार्गशीर्ष मासातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्त समयी गुरुदेव दत्तांचा अवतार प्रकट झाला. संत जनार्दनाचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, औदुंबरी वस्तीस असलेले जटाधारी, त्रिशूळ-डमरू हाती असलेले दत्तगुरू गोदातीरी राहतात. संपूर्ण अंगावर विभूती, काखेत झोळी व मस्तकावर अर्धचंद्र असलेले दत्तप्रभू तेजोमय दिसतात. अशा दत्तरूपाला अहोरात्र मनी आठविल्यास जीवन आनंदरूप होते.

असे हे दत्तप्रभू दीनदयाळ असून भक्तांच्या रक्षणासाठी सतत तत्पर असतात. असे दत्तरूप हृदयी साठवावे. हाती कमंडलू असलेल्या दत्तरूपाचे मनाला अखंड ध्यान लागो. गुरुरायाच्या चरणी विनवणी करताच हृदयात क्षमाशांती निर्माण होते. जगाची माऊली असलेले दत्त महाराज सतत आपल्या सान्निध्यात आहेत अशी ज्यांच्या मनाची खात्री असते, अशा निष्ठावान भक्तांच्या हृदयात दत्त निवास करतात. त्याच्या देहमनावरील घात-आघातांचे दत्तप्रभू निवारण करतात. अशी दत्तमाऊली कृपाळू आहे!

श्रीदत्त हे ‘गुरुकृपा’ झाली तरच ओळखता येतात. ओळख होताच ते भक्ताच्या हृदयमंदिरात बसतात. दत्तचरणी गोडी लागल्यावर, शुद्धभक्तीने दत्तपूजन केले तर भवभयाची बेडी तुटून जाते. ‘सोहम्’गुढी उभारून सहजरूप पूर्णानंदाची प्राप्ती होते. जिकडे तिकडे दत्तमूर्तीच दिसू लागते. मनाची स्थिरता प्राप्त झाल्यावर दत्तदर्शनाचा वेध घेता येतो. परब्रह्माचा पुतळा असा दत्त ‘आत्मदृष्टी’ने पाहता येतो, मात्र त्यासाठी श्रीगुरुदेवांची ‘कृपा’ असावी लागते. हिंदुस्थानी संस्कृती अद्वैतभक्तीचा पुरस्कार करते. श्रीदत्त महाराज हे त्याचे सर्वोत्तम प्रतीक आहे. उत्पत्ती, स्थिती व लय यांचे स्वरूप असलेले ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांचे एकत्रीकरण दत्तप्रभूंमध्ये पाहावयास मिळते. श्रीदत्तप्रभूंच्या सहा हातात तीन देवांची प्रतीके आहेत. ब्रह्मदेवाचे कमंडलू व माळ, श्रीविष्णूंचे सुदर्शनचक्र व गदा, श्रीशिवशंकराचे त्रिशूळ व डमरू. व्याघ्रांबर परिधान केलेल्या श्रीदत्तांजवळ चार वेद श्वानाच्या रूपात असून सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू त्यांच्याजवळ आहे.

‘सरस्वती गंगाधर’ यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्र’ ग्रंथाचे पारायण दत्तभक्तवर्गात अत्यंत प्रिय आहे. गुरुचरित्राचे एकूण त्रेपन्न अध्याय असून 7385 ओव्या आहेत. एक, तीन व सात दिवसांत गुरूचरित्राचे पारायण करण्याची पद्धत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पूर्वी सात दिवस गुरुचरित्र पारायणास प्रारंभ करतात. हा ग्रंथ ‘सिद्धग्रंथ’ असल्याने त्याच्या पारायणात अत्यंत पावित्र्य पाळले जाते.

एकनाथ महाराजांनी गुरुदत्तस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे.

नाम निजभावें समर्थ । जेथे नाम तेथे दत्त ।।1।।

वाचे म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ।।2।।

दत्त नामाचा निज छंद । नामी प्रकटे परमानंद ।।3।।

एका जनार्दनी दत्त । सबाह्य स्वानंदे भरीत ।।4।।

आपली प्रतिक्रिया द्या