साय-फाय – रुग्णाचा डिजिटल क्लोन

>> प्रसाद ताम्हनकर

कल्पना करा की, तुम्हाला एक दुर्धर आणि गंभीर असा आजार झालेला आहे. या रोगावरती शस्त्रक्रिया अथवा तत्सम एखाद्या उपचार पद्धतीची तातडीने आवश्यकता आहे. मात्र या उपचारात तुमच्या जिवाला प्रचंड धोकादेखील आहे. अशा वेळी तुमच्याकडे तुमचा एक ‘क्लोन’ उपलब्ध असेल तर? आणि त्याच्यावर सर्वात आधी या उपचारांची परीक्षा घेऊन, त्याच्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून, मग तुमच्यावर त्या अनुषंगाने उपचार करणे शक्य झाले तर?

एखाद्या साय-फाय चित्रपट अथवा कादंबरीतील वाटणारी ही अद्भुत कल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल लॅबोरेटरी ऑफ मटेरीयल सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी (ईएमपी)मधील संगणक शास्त्रज्ञांनी डाटा सायन्सच्या मदतीने एखाद्या रुग्णाचा ’डिजिटल क्लोन’ ज्याला मराठीत ‘जुळे’ म्हणता येईल, ते तयार करण्यात यश मिळवले आहे. रुग्णाच्या या डिजिटल क्लोनवर विविध उपचारपद्धती, औषधे यांची परीक्षा करणे शक्य होणार असून, त्यानंतर या क्लोनकडून उपचार पद्धतीला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार प्रत्यक्ष रुग्णावर काय उपचार करायचे ते ठरवणे सोपे जाणार आहे.

मानवाच्या दीर्घायुष्याच्या दृष्टीने या शोधाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या ‘डिजिटल ट्विन’च्या मदतीने शास्त्रज्ञांना अनेक रोगांवर ‘ट्रायल ऍण्ड एरर’ पद्धतीने उपचार करणे शक्य होणार आहे. अनेक आनुवंशिक रोग, कॅन्सरसारखा दुर्धर आजार यांच्यावरील संभाव्य उपचार व अचूक निदानासाठी या डिजिटल क्लोनची अमूल्य अशी मदत होणार आहे. भविष्यातील अनेक नव्या उपचार पद्धतीच्या शोधासाठी देखील हे तंत्रज्ञान बहुमूल्य मदत करणार आहे, असा संशोधकांचा विश्वास आहे.

काही विशिष्ट अशा गणितीय सिद्धांतांच्या मदतीने संशोधकांनी रुग्णाची ही डिजिटल क्लोन आवृत्ती बनवण्यात यश मिळवले आहे. यासाठी रुग्णाचे वय, लिंग, जीवनशैली, रक्तगट, उंची, वजन अशा सर्व प्रकारच्या तपशिलवार माहितीची गरज असते. त्यानंतर रुग्णाची अचूक डिजिटल कॉपी बनवणे शक्य होते. यानंतर या डिजिटल क्लोनवर रुग्णासाठी निश्चित केलेल्या उपचारपद्धतीचा वापर सर्वप्रथम या क्लोनवर केला जातो. या उपचारांच्या दरम्यान रुग्णाच्या शरीरात चयापचयाची क्रिया कशी घडेल याचा अभ्यास केला जातो. मुख्य म्हणजे उपचारादरम्यान वापरली जाणारी औषधे रुग्णाच्या मेंदूतील वेदनेची जाणीव करून देणाऱ्या हिश्शापर्यंत किती प्रमाणात आणि किती वेळात पोचतात याचादेखील अभ्यास केला जातो.

या उपचारादरम्यान हे डिजिटल क्लोन वेगवेगळ्या प्रकारे उपचारांबद्दल आपली प्रतिक्रियादेखील देऊ शकण्यास सक्षम आहेत. या क्लोनच्या अनुभवांना, प्रत्यक्ष रुग्णाला येत असलेल्या अनुभवांशी पडताळून, त्यानुसार उपचार पद्धतीत सहजपणे सुधारणा घडवून आणणे आता सोपे होणार आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार भविष्यात सेन्सरच्या मदतीने प्रत्यक्ष रुग्णाकडून उपचारादरम्यान मिळणारे संकेत, जसे की, त्याचा रक्तदाब, हृदयाचे ठोके, ऑक्सिजनचे प्रमाण हे ‘रिअलटाइम’मध्ये त्या रुग्णाच्या डिजिटल क्लोनसोबत ‘सिंक’देखील करता येणे शक्य होणार आहे.

हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात एक क्रांती आणणार असल्याचा विश्वास अनेक तज्ञ सध्या व्यक्त करत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाने कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार झालेल्या व्यक्तीला ‘योग्य प्रमाणात’ औषधाचा डोस देण्यासारखी महत्त्वाची कामेदेखील सुलभ होणार आहेत. एखाद्या रुग्णाला कोणते औषध किती प्रमाणात दिल्यास त्याच्या उपचार पद्धतीत अचूकता येईल, हे तपासण्यासाठी आता डॉक्टर या औषधाचा प्रयोग कमी-जास्त मात्रेत रुग्णाच्या डिजिटल क्लोनवर करून बघू शकणार आहेत. यामुळे उपचार पद्धतीत अधिक अचूकता तर येणारच आहे, पण काही महागडय़ा उपचार पद्धतींवर विनाकारण होणारा खर्चदेखील टाळता येऊ शकणार आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या