वेळ वाया गेला!

498

>> शुभदा गोवर्धन

कुत्रा तुमच्या बरोबरीचा आहे का? ही ‘सामना’मधील (10 सप्टेंबर) बातमी वाचून गंमत वाटली. पशूंनाही मनुष्याप्रमाणे कायदेशीर समानता मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱया याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले. प्राणी माणसाच्या बरोबरीचे असून त्यांनाही आत्मा आणि बुद्धी असते, परंतु माणसाप्रमाणे त्यांची बुद्धी विकसित नाही, प्राणी आणि माणूस समान असून प्राण्यांनादेखील माणसाप्रमाणे कायदेशीर समानता देण्याची मागणी करत एका पशुप्रेमीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच प्राण्यांना कायदेशीर अधिकार देण्याची विनंती या प्राणीप्रेमी व्यक्तीने केली होती. ही गोष्ट नवल म्हणावी लागेल, कारण देशात बाकीच्या जिल्हा व सत्र, उच्च न्यायालय अशा पायरीपायरीने याचिका दाखल करून नंतर त्या फेटाळण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या जातात असे या पशुप्रेमीबाबत काहीही ऐकिवात नाही त्यामुळे प्राण्यांना समानता व कायदेशीर अधिकार देण्याबाबतची याचिका थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली याबाबत आश्चर्य वाटले. त्याचप्रमाणे ही याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली हेदेखील याचिकाकर्त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. कारण देशातील सर्वच न्यायालयांमध्ये, अगदी सर्वोच्च न्यायालयातदेखील महत्त्वाचे असंख्य खटले सुनावणीस असताना एका पशुप्रेमीची याचिका येते ही गोष्ट नक्कीच नवलाची आहे. पशू, पक्षी, प्राणी यांच्याबाबत प्रत्येकाच्या मनात जरी भूतदया असली तरी त्याला माणसाच्या बरोबरीने समानता आणि अधिकार मिळणे कितपत रास्त आहे? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळूनच लावली. एवढेच नव्हे, तर तुमचा कुत्रा तुमच्या बरोबरीचा आहे का, असा खोचक सवालदेखील याचिकाकर्त्याला केला हे चांगले झाले. परंतु या सर्व घडामोडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो वेळ वाया गेला त्याला काय म्हणावे?

आपली प्रतिक्रिया द्या