ठसा – डॉ. अशोक नेवासकर

>> मिलिंद देखणे

नगर जिल्हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. सहकाराबरोबरच साहित्यिकांची नगर जिह्यामध्ये जोड आहे. अनेक साहित्यिक नगर जिह्यात होऊन गेले. त्यामध्ये इतिहासाचे संशोधक असलेले डॉ. अशोक नेवासकर यांचा आवर्जुन उल्लेख केला पाहिजे.

डॉ. नेवासकर यांचे नुकतेच निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. प्रा. नेवासकर यांनी सुमारे 32 वर्षे नगर महाविद्यालयात इतिहासाचे अध्यापन केले. ‘कल्चरल आर्किओलॉजी ऑफ अहमदनगर’ हा ग्रंथ लिहिणारे प्रा. डॉ. प्रमोद गद्रे यांचा सहवास त्यांना लाभला. अनेक धार्मिक पुस्तकेसुद्धा त्यांनी लिहिली आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी इतिहासाचे लेखनसुद्धा केले आहे.

विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नाथसंप्रदायाच्या संशोधनाकरिता वाहून घेतले. त्याआधी काही काळ त्यांनी पुरातत्व विभागातही काम केले. उत्खनन मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. नगर जिह्यामध्ये त्यांनी विविध विषयांचा अभ्यास केला. इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. हे लेख वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखांचा मोठा फायदा झाला. महाविद्यालयांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली, त्या इतिहासाच्या पीएच.डी.मध्ये मोलाचे मार्गदर्शन त्यांनी सातत्याने त्या विद्यार्थ्यांना केले व हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले.

उत्तुंग विचार तसेच धार्मिक कार्याची त्यांना आवड होती. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचे मोठे योगदान सातत्याने राहिले आहे. जिह्यामध्ये अनेक साहित्यिक आहेत. त्या साहित्यिकांमध्ये डॉ. नेवासकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. नगरला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये त्यांची काही धार्मिक पुस्तकेसुद्धा प्रकाशित झाली होती. नगर जिह्याचा इतिहास तसेच देश व राज्याचा इतिहास अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडला आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास (दोन भाग), अशी लढाई झाली नाही (पानिपतची अप्रसिद्ध बखर), युरोपीय राष्ट्रवाद व साम्राज्यवाद, नेपाळमधील नाथ संप्रदाय, सिद्ध श्रीदेवेन्द्रनाथ ः कार्य व साधना, प्राचीन भारत, सद्गुरू सत्संगातील अमृतानुभव आदी ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. सद्गुरू श्रीदेवेन्द्रनाथांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले होते. ‘अलख निरंजन’ या दिवाळी अंकाचे संपादन ते करत.

अहमदनगर महाविद्यालयात अध्यापन करत असताना नगर जिह्यातील तालुक्यांची पाहणी करण्याची विशेष मोहीम हाती घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून पुस्तिका प्रकाशित केल्या. जिल्हा इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 1994 मध्ये भडगाव येथे झालेल्या खान्देश इतिहास परिषदेचे विभागीय अध्यक्षपद प्रा. नेवासकर यांनी भूषवले. नगर (बोल्हेगाव) येथील श्रीनवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टचे ते संस्थापक विश्वस्त होते. श्रीगोंद्याला झालेल्या इतिहास परिषदेत प्रा. नेवासकर यांचा सन्मान करण्यात आला होता.

फ्रान्सस्थित डॉ. शशी धर्माधिकारी यांनी महायुद्धातील राजबंद्यावर नगरच्या किल्ल्यात आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नेवासकर उपस्थित होते.

प्रा. नेवासकर यांचे डोळे जन्मतःच अधू होते. तथापि, त्यावर मात करून त्यांनी प्रवास करत आपले संशोधन पूर्ण केले. पीएच.डी. करणाऱया अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. अखेरचा काही काळ त्यांचे वाचन व लेखन बंद झाले होते. पत्नीकडून ते पुस्तकं वाचून घेत. विविध शिलालेखांचे ठसे काढून त्यांचा अभ्यास प्रा. नेवासकर यांनी केला होता. हे पुस्तक प्रसिद्ध व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.
गोरखपूर येथे महायोगी श्रीगोरक्षनाथ शोधपीठ व दीनदयाळ उपाध्याय विश्वविद्यालयाने अलीकडेच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पत्रकार व अभ्यासक मिलिंद चवंडके यांना निरोप देण्यासाठी आनंदोत्सव ट्रस्टच्या कार्यक्रमास प्रा. नेवासकर उपस्थित राहिले होते. हा शोधनिबंध तयार करण्यासाठी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. हा त्यांचा अखेरचाच जाहीर कार्यक्रम ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या