लेख – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जलविषयक धोरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. सचिन बादल जाधव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान द्रष्टे नेते व युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित, शोषित, पीडित आणि वंचित बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढत राहिले. प्रस्थापितांची निकराने सनदशीर मार्गाने अविरत संघर्ष केला. हिंदुस्थानी समाज रचनेला एक वेगळा आयाम दिला. त्यांना एकाच वेळी परिस्थितीशी संघर्ष आणि वेगवेगळ्या आघाडय़ांवर लढा द्यावा लागला आहे. त्यांचे विचार व व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत आणि जलविषयक धोरण हे विविध धोरणांपैकी एक आहे.

हिंदुस्थान हा एक विकसनशील व कृषिप्रधान देश आहे. अधिकांश हिंदुस्थानी लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषी क्षेत्र हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय पर्यायाने देशाचा विकास साधणार नाही. याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नक्कीच होती. म्हणून वाढीव कृषी उत्पादनासाठी आवश्यक घटकाच्या सुविधांची जेवढी गरज होती, तेवढीच आवश्यकता ही पाण्याची होती. त्याअनुषंगाने कृषी क्षेत्राचा विचार करताना त्यांनी पाणी व सिंचनाचे नियोजन कसे करावे, यासाठी जल व्यवस्थापन व शेती विकासासाठी पूरक असा आराखडा तयार केला होता. तसेच त्यांनी नदीजोड प्रकल्प व धरण निर्मितीवरसुद्धा तितकाच भर दिला होता. म्हणून आज देशात पाण्याचे नियोजन दिसते आहे. तसेच नदीजोड प्रकल्प व धरण निर्मितीबाबत जे धोरण अवलंबिले जाते, त्याची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात तेव्हाच रोवली होती.

जमीन आणि पाण्याचे मानवी जीवनासाठी आवश्यकता लक्षात घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जल व्यवस्थापनाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले. हिंदुस्थानातील पाण्याची व्यवस्था, सिंचन व्यवस्था, जलवाहतूक, नौकानयन, वीजनिर्मिती, पाणी व वीज वितरण, प्रकल्प बाधितांचे निराकरण आदी महत्त्वपूर्ण बाबींवर प्राधान्यक्रमाने अधिकच भर दिला होता. त्यांनी देशातील पाणीप्रश्नाचा दूरगामी सर्वकंश विचार सुरुवातीपासूनच केला होता.

सध्या देशात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी 59 प्रतिशत पाण्याचा वापर केला जातो. देशाची वाढती लोकसंख्या आणि सोबतच तितकीच वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेतली तर 2050 पर्यंत पाणी वापरण्याचे हेच प्रमाण 86 प्रतिशत पर्यंत वाढेल, असा सर्वसाधारण अंदाज आहे. ही बाब बाबासाहेबांनी त्याच वेळी हेरली होती. म्हणूनच पाण्यासारख्या मूलभूत घटकाबाबत त्यांनी चिंतन केले. विविध प्रकल्पाचा अभ्यास केला. देशासाठी भविष्याचा वेध घेत जलविषयक नीतीची मांडणी केली. देशातील विविध धरणांची निर्मितीसोबतच नदीजोड प्रकल्प तसेच पाणी आणि ऊर्जा वृद्धीला बळ दिले. त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.

बाबासाहेबांनी जल व्यवस्थापनाबाबत घेतलेले धोरणात्मक निर्णय तसेच हिंदुस्थानातील पाणी व्यवस्था, सिंचन, जलवाहतूक, नौकानयन, वीज निर्मिती आणि वितरण, सोबतच प्रकल्पबाधितांचे प्रश्न आदी बाबतीतचे त्यांचे धोरण आणि प्रयत्न हे निश्चितच अद्वितीय आहेत. त्यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे अनेक छोटे-मोठे पाटबंधारे, धरण प्रकल्प आदी डॉ. आंबेडकरांमुळे मार्गी लागले आहेत, हे कोणीच नाकारणार नाही. जल नियोजनाबाबत असे त्यांचे विचार धोरण व निर्णय लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुस्थान जलनीतीचे खरे जनक आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणून आज देशात त्यांचे जलविषयक धोरण राबविण्याची नितांत गरज आहे.