
कोरोना महामारीच्या रोगामुळे जणू सर्व जगच भयाच्या सावटाखाली गेले. आपल्या आयुष्यातील जवळपास दोन वर्षे या संकटाने खाऊन टाकली संपूर्ण देश एका परीने, काही काही कालावधीसाठी बंद होत होता आणि यामुळे सर्व सण आणि उत्सव हे साजरे करणे आपण जणू विसरून गेलो होतो. आता हळूहळू का होईना मोकळीक मिळू लागली आहे. यामध्ये सर्वांचा अत्यंत आवडता सण दिवाळी सुरू झालेला आहे. हा सण दिव्यांचा, तेजाचा, प्रकाशाचा, आनंदाचा असा असल्यामुळे आपण सर्वजण तो अत्यंत उत्साहात साजरा करीत असतो. मुळात आपली संस्कृती ही तेजाची आराधना करणारी आहे. या देशाचं नावच भारत आहे. भा म्हणजे तेज आणि त्याच्या उपासनेत नित्य असणारे ते भारतीय! असे आपण असल्यामुळे दिवे लावणे ही आपली परंपरा आहे, दिवे फुंकरून विझवणारी नव्हे!
दिवाळी हा दीपोत्सव जागोजागी कंदील व पणत्या लेवून सजलेला दिसतो. घरात होणारे वेगवेगळे खमंग पदार्थ हे रसनेला पाणी सुटणारे असे होत असतात. हलक्याशा चाहुलीने थंडी असते आणि अशा वेळेला तेला-तुपातले पदार्थ सहजपणे चालतात आणि पचतातही!
दिवाळीचा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी उत्साहाचा असतो. वसुबारसने दिवाळीचा आरंभ होतो. ज्याप्रमाणे ही गोवत्स द्वादशी आहे तसेच हिला गुरुद्वादशीसुद्धा म्हणतात. वसू या शब्दाचा एक अर्थ संपत्ती असासुद्धा आहे. हिंदुस्थानी संस्कृतीने धन अथवा लक्ष्मीला त्याज्य मानलेले नाही. संतश्रेष्ठ तुकोबा आम्हाला सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी’ याचा अर्थ धन हे उत्तम व्यवहार करून म्हणजेच प्रामाणिकपणे मिळवावे आणि ते चांगल्या कार्याला खर्ची घालावे. हा दिवस गाई-वासराचाही असतो. सवत्स धेनूचे पूजन केले जाते. तिला गोडधोड खायला घातले जाते. हिंदुस्थानी संस्कृतीचे हेच वैशिष्टय आहे की, आम्ही पशूंचीसुद्धा काळजी घेतो. बैलपोळा अथवा नागपंचमी यासारखे कित्येक सण याची साक्ष देतील. गाय ही प्राचीन काळी संपत्ती मानली जात होती. कित्येक राजे हे यज्ञामध्ये सहस्रावधी गाई दान करीत असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. त्यानंतर धनत्रयोदशी हा दिवस. ज्याला काहीजण धनतेरस असेही संबोधतात. भगवान धन्वंतरींची या दिवशी जयंती असल्याचे मानले जाते. व्यापारी मंडळी आपल्या वह्यांची-चोपडय़ांची पूजा करतात आणि अर्थातच आगामी वर्ष उत्तम जाण्याची प्रार्थना करतात. वैद्य मंडळी भगवान धन्वंतरींची पूजा करतात. धने आणि गूळ यांचा प्रसाद हा दिला जातो.
नरक चतुर्दशी हा भगवंतांनी नरकासुराच्या वरती मिळवलेल्या विजयाचा दिन मानला जातो. यावेळी त्यांची पत्नी सत्यभामा हीदेखील सोबत होती. दुष्ट, अधम, अधर्मी अशा वृत्तींचा वध करणे अथवा नाश करणे हे आपल्याकडे योग्य मानले गेले आहे. ’अहिंसा परमो धर्मः’ हे आमच्याकडे ठाऊक आहेच, पण त्याचबरोबर ’धर्म हिंसा तथै वच’ असेही वचन आहे हे लक्षात ठेवायला हवे. नरकासुराला मारून त्याच्या कैदेत असलेल्या अनेक राजांची भगवंतांनी सुटका केली. त्याचप्रमाणे त्याच्या कैदेतील सोळा हजार एकशे कुमारिकांना त्यांनी सोडवले. दुसऱयाच्या कैदेत अथवा शत्रूच्या कैदेत राहिलेल्या अशा मुलींसमोर घरवापसी हा पर्याय आजच्या काळातसुद्धा शिल्लक नाही, तर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी तो पर्याय कसा असेल? अशावेळी तळे नाही तर विहीर जवळ करणे अथवा विष खाणे एवढाच पर्याय त्यांना उरतो, हे लक्षात घेऊन भगवंतांनी त्यांना आपल्या भार्या बनवले. खरेतर एका परीने हे त्यावेळचे मोठे सामाजिक कार्य होते. कारण त्यामुळे त्या सर्व मुली पुढे संभाव्य असलेल्या बदनामीपासून वाचल्या हे इथे लक्षात घ्यायला हवे. काहीजण याचा वेगळा आध्यात्मिक अर्थही लावतात. भगवंतांचे एक नाव हृषिकेश असे आहे. हृषिक म्हणजे सर्व प्रकारची इंद्रिये होय. त्यांचा असलेला ईश अर्थात स्वामी म्हणजे ऋषिकेश होय. त्यामुळे शरीरात असलेल्या 1,60,108 नाडय़ांचा अधिपती म्हणजे भगवंत होय! इथे त्यांची पूर्वी झालेली आठ लग्नेसुद्धा विचारात घेतलेली आहेत.
त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस येतो. धन अर्थात लक्ष्मीचे पूजन करणे हे आपण करतोच. कारण आपण तिचे उपासक आहोत. व्यापारी वर्ग नवीन वह्या-चोपडय़ा काढतात. कारण दुसऱया दिवसापासून नवीन विक्रम संवत चालू होते. त्यामुळे त्या नव्या वह्यांची पूजा करणे हेच त्यांचे काम असते.
बलिप्रतिपदेला भगवंतांनी बळीराजाला आश्वसन दिले होते की, पुढचा इंद्र बनेपर्यंत मी तुझ्या सन्निध राहीन. त्याला पाताळाचे राज्य सोपवले. पाताळ म्हणजे काहीतरी वाईट लोक नव्हे बरं का! श्रीमद्भागवत ज्यांनी वाचले त्यांना सप्तस्वर्ग लोकांप्रमाणे सप्तपाताळ लोक आपल्याकडे असल्याची कल्पना नक्कीच असेल. अतल, सुतल, तलातल, पाताल वगैरे सात प्रकारचे पाताळ असल्याची आपल्याकडे कल्पना आहे. यातील पातळाचे वर्णन म्हणजे मुबलक पाणी, सर्व प्रकारची समृद्धी, उत्तम निसर्ग आदी प्रकारांनी केले आहे. पाताळ म्हणजे पृथ्वीचा खालचा भाग असे म्हणायचे असेल तर हिंदुस्थानच्या खाली म्हणजेच पृथ्वीच्या गोलाच्या पलीकडे असलेली अमेरिका म्हणायला लागेल! अस्तू, विस्तारभयास्तव त्याच्या खोलात अधिक जात नाही. त्या बलीच्या नावाने हा दिवस ओळखला जातो. या दिवशी पत्नी ही पतीला ओवाळते आणि तो एखादी उत्तम गोष्ट ओवाळणीत देतो.
अखेरचा दिवस हा भाऊबीजेचा होय. यमुना हिने आपल्या भावाला तिच्या घरी जेवायला बोलावले होते. त्याप्रमाणे यम तिच्या घरी गेला. त्याची आठवण म्हणून या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जेवायला जातो आणि तिला ओवाळणी म्हणून एखादी चांगली भेट देतो.
एकूण हा सण सर्वजणांची आठवण ठेवत म्हणजे अगदी यमाचीसुद्धा आठवण ठेवत साजरा केला जातो. अशी ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि आपल्या देशासाठी शांतीची जावो!!


























































