
>> अनंत आंगचेकर
झुंजार व लढवय्या कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी आपले आयुष्य कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्यात घालवले. प्रसंगी रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध होईपर्यंत पोलिसांचा मारही खाल्ला होता. तुरुंगवासही भोगला होता. तेच जॉर्ज 1977 साली जनता पार्टीच्या राज्यात केंद्र सरकारात प्रथमच उद्योगमंत्री झाले होते. तेव्हा हिंदुस्थानातील तमाम कामगारांना आपला नेता उद्योगमंत्री झाल्याचा प्रचंड आनंद होता. परंतु तो आनंद फार काळ टिकला नाही. 1978 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांनी मासिक फक्त 100 (शंभर) रुपये पगारवाढीसाठी संप पुकारला होता. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार होते. केंद्रात आणि राज्यात आपलीच सरकारे असल्यामुळे कामगार खूश होते. मुख्यमंत्री शरद पवार यांनी संपात तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथी बंगल्यावर कामगार नेते, गिरणी मालक आणि सरकार यांची बैठक बोलावली होती. या बैठकीचे वैशिष्ट्य असे होते की, मुंबईतील गिरणी मालक कधी नव्हे ते त्या वेळी गिरणी कामगारांना दरमहा 75 रुपये पगारवाढ द्यायला तयार झाले होते. मात्र त्याच बैठकीत केंद्रीय उद्योगमंत्री असलेले जॉर्ज फर्नांडिस अचानक उपस्थित झाले. सगळ्यांना आनंद झाला, मात्र तो आनंद क्षणभरच टिकला. जॉर्जभाईंनी टेबलावर हात मारत ‘एवढी पगारवाढ मला मान्य नाही, सर्व सरकारी गिरण्या नुकसानीत चालत आहेत. मी एवढी पगारवाढ देऊ शकत नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले होते. जॉर्ज यांची ही भूमिका पाहून इतर कामगार नेते हादरले होते. शेवटी हो, ना करता करता सरकारी गिरणी कामगारांसह सर्वच कामगारांना दरमहा 45 रुपये पगारवाढ देण्याचे ठरले. अर्थात ही एक गोष्ट सोडली तर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या झुंजार व लढाऊ कामगार नेता मी पाहिला नाही.
































































