
कॅमिल पारखे <<[email protected]>>
हिंदुस्थानात केवळ गोव्यातच कार्निव्हल साजरा होत असला तरी या राज्यात पर्यटकांना आकर्षित करणारा तो प्रमुख उत्सव नाही. थर्टी-फर्स्ट डिसेंबर कुटुंबीयांबरोबर वा मित्रमंडळींबरोबर घालवण्यासाठी देशभरातील पर्यटकांसाठी गोवा हे एक आवडते ठ़िकाण बनले आहे, पण पूर्णतः पाश्चात्त्य संस्कृतीचा असलेला कार्निव्हल हा उत्सव त्या तुलनेत हिंदुस्थानी पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे.
युरोपातील पोर्तुगाल, स्पेन वगैरे देशांत आणि लॅटिन अमेरिकन देशांत साजऱ्या होणाऱ्या कार्निव्हल या उत्सवाची माहिती इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्यांना झालेली असते. हिंदुस्थानात फक्त गोव्यातच होणारा साजरा हा गमतीदार उत्सव 13 फेब्रुवारीस सुरू होऊन 16 फेब्रुवारीला संपला. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौसामौजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो. थोडक्यात ‘खाओ, फिरो, मजा करो’ असाच या किंग मोमोचा हुकूम होता. त्याच्या जनतेनेही या औटघटकेच्या राजाची आज्ञा (मुकाटय़ाने नव्हे तर) अगदी आनंदाने, हसत-खेळत पाळली.
ख्रिस्ती धर्मातील उपवास काळाच्या म्हणजे लेंट सीझनच्या चार दिवस आधी कार्निव्हल या उत्सवाची सुरुवात होते. फेब्रुवारीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या ‘भस्म बुधवार’ वा ‘अॅश वेन्सडे’ या दिवसापासून हा उपवास काळ सुरू होतो आणि येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मरणाच्या दिवसापर्यंत म्हणजे गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होते.
भस्म बुधवारच्या आदल्या शनिवारी पणजीत कार्निव्हलची सुरुवात झाल्यानंतर रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी कार्निव्हलच्या या मिरवणुका गोव्यातील इतर शहरांत होतात. आज युरोपात, लॅटिन अमेरिकेत कार्निव्हल हा लोकोत्सव म्हणून अगदी उत्साहाने साजरा केला जातो. हिंदुस्थानात केवळ गोव्यात कार्निव्हल साजरा होतो. कारण हे राज्य पोर्तुगीजांच्या अमलाखाली तब्बल साडेचारशे वर्षे होते. या पोर्तुगीज राजवटीचा गोव्यातील एक सांस्पृतिक वारसा म्हणजे हा कार्निव्हल उत्सव.
गोव्यातला कार्निव्हल मी अगदी पहिल्यांदा सत्तरच्या दशकात पाहिला. तेव्हा हा उत्सव बऱ्यापैकी एक लोकोत्सव होता. पणजीत कार्निव्हलची मिरवणूक मांडवीच्या तीरावरून त्या काळच्या सचिवालय वा जुन्या आदिलशाह पॅलेसमार्गे आझाद मैदानापाशी येई. त्यानंतर उंच टेकडीवर असलेल्या पणजी चर्चच्या पायऱ्यांजवळ ही मिरवणूक संपायची. तेथे आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक देखण्या युवतींनी घेरलेला किंग मोमो समोर असलेल्या हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा वाचून गोव्यात आपला चार दिवसांचा अंमल सुरू होत असल्याचे टाळ्यांच्या गजरात जाहीर करत असे.
मिरवणुकीत रांगेने एकामागे एक येणारे सजवलेले चित्ररथ, दोन चित्ररथांमध्ये रंगीबेरंगी कपडे, डोनाल्ड डक, मिकी माऊस यांसारख्या पात्रांचे पोशाख केलेले अनेक युवक आणि युवती आणि त्यांना तालावर नाचवण्यासाठी ट्रकवर असलेले लाइव्ह बँड असे कार्निव्हलचे स्वरूप असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्निव्हलच्या मिरवणुकीत अनेक बंधने होती आणि चित्ररथांची संख्याही तुलनेने कमी होती.
गोव्याच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्पृतिक आणि धार्मिक जीवनाचे प्रतिबिंब या मिरवणुकीत दिसत असते. थोडक्यात गोव्याच्या समाजजीवनावर आधारित असलेल्या मारिओ मिरांडा यांच्या कुठल्याही व्यंगचित्रांत दिसणारी अनेक दृश्ये आणि पात्रे कार्निव्हलच्या या मिरवणुकीत दिसतात. उदाहरणार्थ, चर्चमध्ये लग्नसोहळ्यासाठी सूट घातलेला नवरदेव आणि सफेद गाऊनमधील वधू, केसात ताजे फूल अडकवून आणि टोपलीत मासळी घेऊन आलेली कोळीण, दामूच्या लग्नाला दागदगिने घालून निघालेली आणि नावाडय़ाला पलीकडच्या तीरावर नेण्याची विनंती करणारी, त्या बदल्यात आपले दागिने ‘घे घे घे घे रे, घे रे सायबा’ म्हणणारी देखणी, घराच्या बाल्कनीत गिटार वाजवणारे तरुण-तरुणी किंवा ‘तियात्र’मधील (कोकणी नाटय़) काही पात्रे! गोव्याच्या या समाजजीवनाचे कार्निव्हलच्या मिरवणुकीत प्रतिबिंब दिसत असे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
































































