संस्कृती रक्षक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> माधव डोळे

हिंदुस्थानच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालकणारे लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ञ ही पद्मश्री सदाशिक गोरक्षकर यांची बहुआयामी ओळख. संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेट मिळवणाऱ्या प्रा. गोरक्षकर यांनी संग्रहालयांना स्वायत्तता मिळवून देण्याच्या मागणीचा सतत पाठपुरावा केला. संग्रहालये प्रेक्षकांपर्यंत नेऊन पोहोचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

कला, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचं प्रेम हे खरं तर उपजतच लागतं. या प्रेमापोटीच संशोधनवृत्ती वाढीस लागते. जी तुमची जगण्याची दृष्टीच बदलते. इतिहासाबद्दल अभ्यासू दृष्टिकोन बाळगत प्राचीन इतिहास, कला संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र या विषयांची आवड जनमानसात रुजविणारे सदाशिव गोरक्षकर. ज्यांनी आयुष्यभर संशोधनवृत्ती जोपासत इतिहासात उमटलेली हिंदुस्थानची कला, संस्कृती याचा वेध घेतला.

सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी एम.ए., एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थेट बडोदा गाठले. तेथील संग्रहालय विभागात रितसर प्रशिक्षण घेतले. जुनी नाणी, धातूंच्या मूर्ती, कागदपत्रे, दुर्मिळ पुस्तके, पुरातन वस्तू याचा ध्यास त्यांना लागला. गोरक्षकर यांच्या कारकीर्दीला खरी चालना मिळाली ती प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये. त्याचं नामकरण नंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे झाले. फिल्म इन्स्टिटय़ूटची चांगली नोकरी सोडून ते मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये सहाय्यक अभिरक्षक म्हणून रुजू झाले. 21 वर्षे त्यांनी या म्युझियममध्ये काम केले. या कालावधीत त्यांनी या वास्तूचा कायापालट केला. म्युझियम म्हणजे केवळ चार भिंती नाहीत किंवा त्यातील वस्तू नव्हेत. त्यातील दुर्मिळ वस्तू, चित्रे, शिल्पे, नाणी, मूर्ती हा अनमोल ठेवा त्यांनी जिवंत केला. संग्रहालय क्षेत्रात डॉक्टरेट पदवी मिळविलेल्या सदाशिवरावांनी या म्युझियमचा कायापालट केला. त्याचीच पावती म्हणून 1974 मध्ये त्यांना संचालकपदी नेमण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये त्यांनी अनेक उपक्रम केले.

संग्रहालयाचे काम करीत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे संग्रहालय साकारले. या संग्रहालयात चित्रकलेचे अनेक दुर्मिळ नमुने आज दिसतात, त्याचे श्रेयदेखील गोरक्षकर यांनाच जाते. त्यांच्या आग्रहामुळेच पेस्तनजी बोमनजी, लालबहादूर धुरंधर, बाबूराव पेंटर, आबालाल रहिमान अशा दिग्गज कलाकारांची चित्रे या संग्रहालयात मोठय़ा दिमाखात उभी आहेत. विशेष म्हणजे इंग्रजांच्या काळातील ‘बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट’च्या शैलीतील चित्रांचे अनेक दुर्मिळ नमुन्यांचे जतन करण्यात आले आहे. गोरक्षकर यांनी केवळ स्वतःसाठी नव्हे तर कला, संस्कृती आणि इतिहासाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱया तरुण संशोधकांना मार्गदर्शन केले. आयुष्यभर केलेल्या संशोधनाचा व अभ्यासाचा ठेवा त्यांनी पुस्तकरूपाने जतन करून ठेवला आहे. त्यांनी लिहिलेली राजभवन्स इन महाराष्ट्र, ऍनिमल्स इन इंडियन आर्ट, द मेरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया, डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र, कालिदास ऍण्ड द महायोगी ऑफ घारापुरी ही पाच पुस्तके म्हणजे महाराष्ट्र व देशाच्या संस्कृतीचे संचित आहे.
कला समीक्षक, लेखक, संग्रहालय तज्ञ, इतिहास तज्ञ, उत्तम प्रशासक, धातू मूर्ती कला अभ्यासक अशा अनेक बाबी सदाशिव गोरक्षकर यांच्या आयुष्याशी एकरूप झाल्या होत्या. लौकिक अर्थाने त्यांना 86 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं, पण त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण संशोधनासाठी खर्च केला.

एक माणूस किती विविध क्षेत्रांत काम करू शकतो याचे ते दुर्मिळ उदाहरण होते. प्रसिद्धीपासून पराङमुख असलेल्या गोरक्षकरांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. 2003 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा बहुमान मिळाला. 2016 मध्ये चतुरंग संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला. ज्ञानसाधना कॉलेजमध्ये झालेल्या दुसऱया कोकण परिषदेच्या वेळेस त्यांना सन्मानित करण्यात आलं. ठाणे जिह्याचा इतिहास लक्षात घेता तिथं एखादं वस्तुसंग्रहालय उभं करावं अशी त्यांची इच्छा होती.

आयुष्यभर देश-विदेशात भ्रमंती करणाऱ्या हा ऋषितुल्य संशोधक आपल्या अखेरच्या काळात वासिंदजवळील भातसई इथे निसर्गाच्या सान्निध्यात राहत होता. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग सतत दुसऱयांसाठी केला. पोलीस संग्रहालय, सावरकर संग्रहालय, देवळाली येथील आर्टिलरी संग्रहालय, सर्वोच्च न्यायालयाचे शतक महोत्सवी प्रदर्शन अशा 16 संग्रहालयांच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. इतिहासाचा ओढा असूनही नागरी विकासाकडेदेखील त्यांचं तेवढंच लक्ष होतं. एमएमआरडीएच्या तसेच महानगरपालिकेच्या जतन समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रकुल संघटनेनेदेखील त्यांचा गौरव केला. कला, संस्कृती आणि इतिहासाचा गोरक्षकररूपी दीपस्तंभ पुढील अनेक पिढय़ांना मार्गदर्शनाचा प्रकाश देत राहील.

[email protected]