नाद- मराठी – किलबिल… किलबिल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी गीत-संगीत सर्वार्थाने समृद्ध आहे. भक्तिसंगीत, नाटय़ संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, लोकगीत आणि बालगीत असे त्याचे अनेक आविष्कार आपल्याला भुरळ घालतात. आमच्या लहानपणी बालगीतांना चाली लावून ध्वनिमुद्रित स्वरूपात  येण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती. तशी मुलांवर चित्रित झालेली ‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे’ (वासंती- कुंकू) किंवा ‘मी म्हणेन तुजला दादा दादिटल्या- (लता मंगेशकर-) अशी चित्रपट गीतं होती. नाटय़ संगीतातही खटय़ाळ गाणी ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ अशी पदं यायची, परंतु केवळ बालगीतांचं वेगळं दालन खुललं नव्हतं. ‘येरे, येरे, पावसा’ किंवा ‘उठा उठा चिऊताई,’ अशी बालगीतं क्रमिक पुस्तकात मात्र असायची. पुढे श्रीनिवास खळे आणि मीनाताई खडीकर यांनी बालगीतंच स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित केली. मीनाताईंची ‘चॉकलेटचा बंगला’ किंवा ‘सांग सांग भोलानाथ’ अशी बालगीतं आजही खूपच लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे श्रीनिवास खळे आणि सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेली बालगीतंही गाजली आहेत. त्यांच्या बालगीतातला आवाज मुख्यत्वे सुषमा श्रेष्ठ यांचा आहे.

1960 मध्ये जन्मलेल्या सुषमा श्रेष्ठ या पूर्णिमा श्रेष्ठ म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांचे वडील नेपाळमधून आधी कोलकाता आणि नंतर मुंबईला आले. भोलानाथ श्रेष्ठ हे संगीतकार होते. त्यामुळे संगीत-गायनाचा वारसा सुषमा श्रेष्ठ याना घरातूनच मिळाला. त्यांचा भाऊ निषादही सगीतकार झाला. सुषमा श्रेष्ठ यांनी मात्र बालवयातच हिंदी चित्रपट ‘अंदाज’ मध्ये ‘है ना बोलो बोलो’ हे गीत गाऊन आपल्या गानकौशल्याची चुणूक दाखवली. शम्मी कपूर आणि हेमा मालिनी यांच्या या चित्रपटात मास्टर अलंकारसह एका छोटय़ा मुलीवर हे गाणं चित्रित झालंय. ‘है ना बोलो बोलो, पापा को मम्मी से; मम्मी को पापा से प्यार है’ या गाण्याचं अमाप कौतुक झालं आणि सुषमा श्रेष्ठ हे नाव एकदम प्रकाशात आलं. शंकर-जयकिशन यांचं संगीत असलेल्या गाण्यात पापा-मम्मींचे स्वर रफी आणि सुमन कल्याणपूर यांचे आहेत, पण गाणं गाजले ते बालगीत म्हणूनच.

त्यानंतर सुषमा श्रेष्ठ यांना हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकारांकडे गाण्याची संधी लाभली. नौशाद, मदन मोहन, सलील चौधरी, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, बप्पी लाहिरी, राजेश रोशन, रवींद्र जैन अशी किती नावं घ्यावीत. या प्रसिद्ध संगीतकारांनी दिलेल्या संधीचं सुषमा श्रेष्ठ यांनी सोनं केलं. ‘तेरा मुझसे है पहले ये नाता कोई,’ ‘क्या हुआ तेरा वादा,’ ‘तू तू तारा…’ अशा कितीतरी गाण्यांनी सुषमा श्रेष्ठ यांची कारकीर्द गाजली. दूरदर्शनच्या ‘भारत की शान’मध्ये त्या ‘स्टार’ ठरल्या आणि ‘फिल्म फेअर ऍवॉर्ड’ मिळवणाऱ्या सर्वात तरुण गायिकाही.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठीत त्यांनी प्रामुख्याने बालगीतं गायली. सी. रामचंद्र यांच्याकडे हिंदी गाणं गायलेल्या सुषमांच्या स्वरातील गोडवा अण्णांना जाणवला आणि त्यांनी त्यांच्याकडून जी बालगीतं गाऊन घेतली ती नक्कीच आठवतील. शांताबाई शेळके यांनी लिहिलेली ‘आई गं, बघ ना कसा हा दादा, मला चिडवायचं हाच याचा धंदा किंवा ‘टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा’ अथवा ‘ मारू बेडूक उडी, गडय़ांनो घालू या लंगडी’ ही गाणी सी. रामचंद्र यांनी सुषमा श्रेष्ठ यांच्याकडून गाऊन घेतली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ  झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती,’ हे शांता शेळके यांचं बालगीत आजही लहान मुले सादर करतात. याशिवाय ‘पाऊस आला वारा आला, पान लागले नाचू, थेंब टपोरे गोरे गोरे, भरभर गारा वेचू’ या त्यांच्या गाण्याचे शब्द शांताबाईंचे आणि संगीत खळे काकांचे. याच तिघांचे आणखी एक गाजलेलं बालगीत म्हणजे ‘विहीणबाई-विहीणबाई उठा आता उठा’ हे गाणंही खूपच प्रसिद्ध झालं. सुषमा श्रेष्ठ यांनी नंतरच्या काळात काही भक्तिगीतं आणि भावगीतंही गायली. ‘देव माझा निळा निळा’ हे वसंत बापट यांचं भानुकांत लुकतुके यांच्या संगीतातलं त्यांचं भक्तिगीत तसेच याच तिघांचं प्रसिद्ध भावगीत म्हणजे ‘या बकुळीच्या झाडाखाली.’ ‘प्रीतीचा साज हा आज मी ल्याले’ या वंदना विटणकर यांच्या प्रणयगीताला संगीत दिलं बाळ बर्वे यांनी आणि स्वर सुषमा श्रेष्ठ यांचा. त्याचप्रमाणे अशोकजी परांजपे यांचं त्यांनी गायलेलं आणि शांक-नील यांनी संगीत दिलेलं भावगीत आहे, ‘साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते, त्या कोवळय़ा क्षणांना नव्हतेच काही नाते.’

सुषमा श्रेष्ठ यांची ही गाणी रेडिओवर लागतातच, पण नेटवरही उपलब्ध आहेत. वेळ मिळेल तेव्हा जरूर ऐका. पन्नाशीतल्या लोकांना ती पुनरानुभवाचा आनंद देतील आणि बालगीतं नव्या उमलत्या पिढीलाही ‘आपली’ वाटतील.

>> अरुण जोशी