लेख – अंतराळ कचऱ्यावर इस्रोचा उतारा

>> महेश कोळी

जगभरातील अवकाश संशोधक अंतराळात फिरणाऱ्या कचऱ्याच्या समस्येविषयी चिंताक्रांत झाले आहेत. सॅटेलाईटस् आणि रॉकेटस्च्या निरुपयोगी भागांच्या कचऱ्याच्या समस्येवर अलीकडेच भारतीय वैज्ञानिकांनी एक मोठी उपलब्धी मिळवली आहे. इस्रोनेपीएसएलव्ही सी-56’च्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून सिंगापूरचे सात उपग्रह  अंतराळात उच्च कक्षेमध्ये स्थापित केले. हे करत असताना या रॉकेटचे निरुपयोगी भाग 300 किलोमीटर खालील कक्षेमध्ये आणण्याच्या प्रयत्नांनाही इस्रोला यश लाभले आहे. त्यामुळे अंतराळातील कचरा कमी करण्याच्या प्रयत्नांना एक नवी दिशा मिळाली आहे. त्याचबरोबर उपग्रहांच्या भ्रमणातील अडथळेही यामुळे दूर होणार असल्याने त्यांचे कार्य  अधिक प्रभावी बनणार आहे.

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचऱ्याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेट्सचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात कचरा निर्माण करण्यास हातभार लावताहेत. यादृष्टीने भारतीय अवकाश संशोधकांनीदेखील दमदार यश मिळवले आहे. अंतराळातील कचरा स्वच्छ करण्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञही काम करत आहेत. अवकाशातील या संकटाने उग्ररूप धारण करण्यापूर्वीच वेळेत पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

पृथ्वीवरच्या वाढत्या कचऱ्यामुळे प्रदूषणाला आणि पर्यावरणाला हानी निर्माण होत असताना अंतराळातील कचरादेखील डोकेदुखी ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जगातील बहुतांश देशांकडून अवकाशात उपग्रह सोडले जात आहेत, पण एखाद्या उपग्रहाने कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या उपग्रहाचे पुढे काय होते, याबाबत अनेकांना माहिती नसते. प्रत्यक्षात एकतर हे उपग्रह अंतराळात भरकटत राहतात किंवा समुद्रात येऊन पडतात.  अशा उपग्रहांची विल्हेवाट लावण्यासाठी जगभरातील अनेक नामांकित अंतराळ संस्था अहोरात्र प्रयत्न करत असून यात भारतही मागे नाही. काही दिवसांपूर्वीच अंतराळातील वाढता कचरा कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी यशस्वी प्रयत्न केले. ‘इस्रो’ने उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही-सी 56) प्रक्षेपित करून सिंगापूरच्या सात उपग्रहांना अवकाशातील वरच्या कक्षेत स्थापन केले. हे उपग्रह स्थापित झाल्यानंतर त्याबरोबरच्या रॉकेटच्या निरुपयोगी भागांना 300 किलोमीटरपर्यंत खालच्या कक्षेत आणण्यात इस्रोला यश आले. यामुळे ‘स्पेस जंक’ कमी करण्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे.  तसेच अंतराळातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उपग्रहांच्या कार्यातील अडथळेही दूर होणार असल्याने त्यांची कार्यक्षमताही वाढण्यास हातभार लागणार आहे.

पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याच वेळी तीन हजारांपेक्षा अधिक निक्रिय उपग्रह हे कचरा वाढविण्यास आणि नव्याने प्रक्षेपित होणाऱ्या उपग्रहाच्या कामात अडथळा आणत आहेत. परिणामी त्यांची टक्कर होण्याचीच भीती अधिक आहे. शिवाय अवकाशातील कचरा हा सुमारे 34 हजार तुकडय़ांत असून त्याचा आकार हा दहा सेंटीमीटरपेक्षा अधिक आहे. एवढेच नाही तर लाखो तुकडे हवेत तरंगत आहेत आणि ते एखाद्या वस्तूला धडकले तर मोठी हानीदेखील होऊ शकते. अर्थात अंतराळातील अभियानाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत जेवढे तुकडे आदळले,  त्यातून कोणतीही जिवितहानी झालेली नाही, पण भवेष्यात जिवित आणि वित्तहानीची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कालावधी पूर्ण केलेल्या उपग्रहांना परत आणण्याचे अभियान सुरू केले आहे. या क्रमवारीत शास्त्रज्ञांनी उपग्रह ‘मेघा-ट्रापिस-1’चे (एमटी) अवघड अभियान पूर्ण करत त्यास पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणत प्रशांत महासागरात पाडले. या यशाबाबत इस्रोने म्हटले की, या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि त्याचे हिंद प्रशांत महासागरावर विघटन केले. याशिवाय भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची (ए-सॅट) निर्मिती आणि यशस्वी चाचणी केली आहे. या चाचणीत एक निकामी उपग्रह नष्ट केला. अंतराळात क्षेपणास्त्रातून साधलेले लक्ष्य हे भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे यश मानता येईल.

अंतराळात मोठय़ा संख्येने रॉकेट, उपग्रहांची उपकरणे, सुटे भाग कचऱ्याच्या रूपात फिरत आहेत. त्यांची संख्या सुमारे 9 लाख आहे. सरासरी 25 ते 28 हजार किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने निक्रिय उपग्रह, उपकरणे, तुकडे पृथ्वीच्या कक्षेत (एलईओ) फेऱ्या मारत आहेत. अर्थात वातावरणात प्रवेश केल्यानंतर हे तुकडे पूर्णपणे जळून जाणे अपेक्षित आहे. त्यांना केवळ क्षेपणास्त्राद्वारेच नष्ट करता येणे शक्य आहे. मानवनिर्मित कचरा साफ करण्यासाठी जपानची ‘जासा’ आणि अमेरिकेच्या नासासारख्या कंपन्या काम करत आहेत. अनेक देशांच्या खासगी कंपन्या या क्षेत्राकडे भविष्यातील व्यवसाय म्हणून पाहत आहेत. भारताने यादृष्टीने आघाडी घेत ‘एमटी 1’ला नष्ट करून इतिहास घडविला. अंतराळातील वाढत्या कचऱ्याला वेळीच नष्ट केले नाही तर हा कचरा भविष्यात हवा, पाणी आणि पृथ्वीसाठी मोठे संकट ठरू शकते. जपानची कंपनी ‘ऍस्ट्रोस्केल’चे सीईओ नोबू ओकोडा यांच्या मते, त्यांनी 22 मार्च 2020 मध्ये कझाकिस्तानच्या बाइकोनूर येथून सोयुज रॉकेटच्या मदतीने ‘एल्सा डी’ उपग्रह सोडला आणि त्या माध्यमातून अवकाशातील कचरा हटविण्याचे अभियान सुरू केले. खराब उपग्रह आणि यानाचा कचरा बाजूला करण्याचे काम केले जात आहे. जपानचा दुसरा उपग्रह जासा हायइलेट्रोडायनॅमिक हा प्रदक्षिणा करणाऱ्या कचऱ्याच्या वेगाला आवर घालेल आणि कालांतराने त्यास पृथ्वीच्या वातावरणात ढकलून देण्यात येईल. जर्मनीची अंतराळ कंपनी डीएलआरनेदेखील कचरा नष्ट करण्यासाठी लेसर तंत्रज्ञान विकसित केले. अमेरिकेची कंपनी नासाने इलट्रो नेट तयार केले आहे. हे एक प्रकारचे जाळे असून ते कचरा एकत्र बांधून पृथ्वीच्या वातावरणात आणण्याचे काम करेल. पृथ्वीच्या वातावरणात येताच बहुतांश कचरा हा आपोआप जळून नष्ट होणे अपेक्षित आहे. अमेरिकेत सहापेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्या याच अभियानाशी निगडित काम करत आहेत. या जोडीला अंतराळ शास्त्रज्ञ हे अंतराळातील कचरा हा पुन्हा कसा उपयोगात आणता येईल यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. यादृष्टीने स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी ‘लिन स्पेस वन’ नावाचा उपग्रह तयार करण्याची घोषणा केली आहे. हे उपाय मौल्यवान उपग्रहांची धडक टाळण्यासाठी केले जात आहेत. तूर्त अंतराळातील वाढता कचरा हा पृथ्वी आणि मनुष्यजातीसाठी संकटाचे कारण ठरत आहे. कारण तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची टांगती तलवार असते. त्यामुळे हा कचरा तातडीने हटविण्याबबात वेगाने मोहीम राबविण्याची गरज आहे.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)