आभाळमाया – ‘गुरू’वरचं वीज-पाणी

>> दिलीप जोशी

आम्ही शाळा-कॉलेजात असताना भूगोलाचे शिक्षक खगोलाविषयीसुद्धा थोडी माहिती सांगत. तो काही अभ्यासक्रमातला विषय नव्हता; परंतु ‘भू’गोल ज्या ‘ख’गोलाचा अविभाज्य भाग आहे त्याबद्दल ‘जनरल नॉलेज’ आपल्या विद्यार्थ्यांना असावं असं त्यांना वाटायचं. वास्तविक पृथ्वीची रचना आणि देश-विदेश, समुद्र, हवामान, पीक-पाणी वगैरे गोष्टी शिकल्या की भूगोलाचा पेपर सोडवता यायचा. परंतु पेपरच्या पलीकडे जाऊन अधिक काही ज्ञान विद्यार्थ्यांना गोष्टीच्या स्वरूपात देण्याने मूळ विषयात अधिक रुची निर्माण होते याचा अंदाज अनेक शिक्षकांना असायचा. आताही असे शिक्षक असतीलच. तर, मूळ मुद्दा खगोलातल्या सत्य गमती ऐकताना त्यावेळी आश्चर्य वाटायचं. सर सांगायचे, बरं का, आपल्या पृथ्वीला एक तर गुरूला नऊ ‘चंद्र’ आहेत. गॅलिलिओने त्यापैकी चार पाहिले होते.

पुढे जगाच्याच खगोलशास्त्र्ाात प्रगती होत गेली. 1610 च्या जानेवारी महिन्यात गॅलिलिओने गुरूचे चार चंद्र न्याहाळले. त्याला चार शतकं उलटून गेली. 1973 मध्येच पायोनियर-10 हे यान गुरू ग्रहाच्या जवळून गेलं आणि गुरूचं खरं रूप समजू लागलं. त्याला चार किंवा नऊ नव्हे तर तीस-चाळीस ‘चंद्र’ (उपग्रह) असल्याचं निष्पन्न झालं. आताच्या संशोधनानुसार ही संख्या 80 पर्यंत पोहोचली आहे.

परंतु गॅलिलिओने पाहिलेले चार चंद्रच गुरूच्या सर्व उपग्रहांमध्ये मानाचं स्थान टिकवून आहेत. आयो, युरोपा, गॅलिलीड आणि कॅलिस्टो हे चार चंद्र. आपल्या पृथ्वीचा चांदोबा 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे, तर गुरूच्या चंद्रांपैकी कॅलिस्टो जरा त्याच्यापासून दूरवरून फिरतो. गुरू ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर सुमारे 77 कोटी किलोमीटर असून पृथ्वीपासून तो 62 कोटी किलोमीटरवर आहे.

पृथ्वीच्या 11 पट मोठा असलेल्या, सौरमालेतील या ग्रहाला आपल्या प्राचीन खगोल अभ्यासकांनी दिलेलं ‘गुरू’ (मोठा) हे अत्यंत योग्य नाव केवळ डोळय़ांनी केलेल्या निरीक्षणावरून कसं दिलं हे एक कोडंच आहे. गुरू सूर्याभोवती सुमारे 12 वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. मात्र त्याचा दिवस तासाचाच असतो. गुरूचा अक्ष केवळ तीन अंशांनी कललेला आहे. (पृथ्वीचा साडेतेवीस.) गुरूवरून एखादं अवकाशयान (रॉकेट) उडवायचं असल्यास सेकंदाला 60 किलोमीटर इतका मुक्तीतेस (एस्केप व्हेलॉसिटी) त्याला द्यावा लागेल. याचा अर्थ गुरूचं गुरुत्वाकर्षणही प्रचंड आहे.

आता त्याच्या चार चंद्रांबद्दल. यापैकी ‘आयो’ गुरूपासून 4,21,600 किलोमीटर अंतरावर, युरोपा 6,70,900 आणि गॅलिमिड 10 लाख 70 हजार, तर कॅलिस्टो जवळपास 19 लाख किलोमीटरवरून गुरूभोवती फिरतो. यापैकी ‘आयो’ या उपग्रहाचा व्यास 3642 किलोमीटर असून त्यावर उफाळणारे ज्वालामुखी आहेत. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आणि गुरूचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) यांची सतत ‘टक्कर’ होऊन त्यातून सुमारे 4 लाख व्होल्ट एवढी प्रचंड वीजनिर्मिती होत असते. पृथ्वीवरच्या जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्रात कॉइल फिरवून वीजनिर्मिती करावी तशी प्रक्रिया इथे निसर्गतः घडते. इथे कॉइलमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होऊन मग त्याचे वितरण होते. गुरूवर तशी व्यवस्था असण्याचं कारणच नाही, पण पुढे एखादा कल्पक उद्योजक तिथली वीज बॅटरीबद्ध करून इकडे आणण्याचा खटाटोपही करील. ‘आयो’च्या रचनेमुळे निर्माण होणारा 50 लाख ऑम्पिअरचा करंट मात्र तिथल्याच वातावरणात राहतो. आयोवरच्या मोठय़ा ज्वालामुखींमधून निर्माण होणारे ‘आयन’ (विद्युतभारित) गुरूच्या मॅग्नेटिक फिल्डशी टक्करतात तेव्हा निर्माण होणारी ही ऊर्जा अफाट आहे. ते सौरकुलातील सर्वांत मोठे ‘वीज केंद्र’ म्हणायला हवं.

गुरूचा आणखी एक उपग्रह ‘युरोपा’ हा ‘आयो’च्या अगदी विरुद्ध म्हणजे बर्फाचा गोळा आहे. त्यावर मोठय़ा प्रमाणावर पाणी आहे. त्यामुळे तिथे वसती करण्याच्या कल्पनाही केल्या जातात. युरोपा बराचसा सपाट आणि सौम्य आहे. आयो, युरोपा आणि गॅलिमीड हे तीन उपग्रह एका लयीत (ऱिहदममध्ये) फिरतात, पण दूरचा कॅलिस्टो यांच्याशी काहीसा फटकून वागतो. आपल्या सौरकुटुंबात अशा अनेक विनाशकारी गोष्टी आहेत. त्याची हळूहळू थोडक्यात माहिती घेऊ.

आपली प्रतिक्रिया द्या