
गुरू म्हणजे मोठा, लघू म्हणजे लहान. अंतराळात सूर्याभोवती फिरणाऱया मंगळ-गुरू यांच्यामध्ये असलेला असंख्य लघुग्रहांचा पट्टाच आहे, पण गुरू म्हणजे सूर्यमालेतील सर्व ग्रहांच्या वस्तुमानाची गोळाबेरीज केली तर जेवढा मोठा ग्रह तयार होईल तेवढा आहे. म्हणूनच तो खऱया अर्थाने गुरू!
सूर्यापासून सुमारे 77 कोटी आणि पृथ्वीपासून 62 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला हा अवाढव्य ग्रह सेकंदाला 13 किलोमीटर वेगाने सुमारे 12 वर्षांत सूर्याभोवती परिक्रमा करतो. ज्याच्या व्यासात अकरा पृथ्वी मावतील एवढा वायुरूप देह सांभाळत गुरूचं मार्गक्रमण अव्याहत सुरू असतं. या ग्रहावर 86 टक्के हायड्रोजन, 13 टक्के हिलियम आणि 2 टक्के मिथेन आहे. त्याचं दुर्बिणीतून पहिलं दर्शन अर्थातच गॅलिलिओने 1609 मध्ये घेतलं आणि आता ज्ञात असलेल्या त्याच्या छोटय़ा-मोठय़ा सुमारे शंभर ‘चंद्रां’पैकी आयो, युरोपा, गनिमिड आणि कॅलिस्टो हे चंद्रही पाहिले. आपल्यालाही ते चार-पाच इंच व्यासाच्या दुर्बिणीतून सहज दिसतात. नैसर्गिक उपग्रहांची एवढी फौज बाळगून असलेल्या गुरूचं रूप त्याच्या वातावरणात काही ठिकाणी रौद्रभीषण आहे. त्याच्यावरचा ‘रेड स्पॉट’ हे एक शतकानुशतकं चाललेलं महावादळ आहे. 1,42,984 किलोमीटर व्यासाचा हा महाग्रह सूर्याभोवती फिरताना निसर्गरम्य पृथ्वीची ‘ढाल’ बनून अनेक धूमकेतू आणि अशनींच्या संभाव्य आपत्तीपासून रक्षण करत आला आहे.
या ‘गुरुकृपे’चा अनुभव 1994 मध्ये जेव्हा शूमेकर लेव्ही-9 हा धूमकेतू गुरूवर आदळला तेव्हा आला. बरेच धूमकेतू गतकाळात गुरूवर आदळले असणारच, पण शूमेकर लेव्ही-9 चं आदळणं चित्रित केलं गेलं. दुर्बिणीतून ती टक्कर पाहायचा प्रयत्न आम्हीही वांगणी येथून केला होता, पण दिवस पावसाचे होते.
गुरूवरून अंतराळात रॉकेट सोडणं शक्य नाही, कारण तो वायुरूप आहे, पण सोडायचंच झालं तर त्याला सेकंदाला 60 किलोमीटर एवढय़ा वेगाने अवकाशात झेप घ्यावी लागेल. -108 सेल्सियस तापमानाच्या वातावरणात कोण रॉकेटचा विचार करणार? तो केवळ कल्पनेतच होऊ शकतो.
स्पेस एज सुरू झाल्यावर अमेरिकेने व रशियाने अंतराळ मोहिमांचा आवाका वाढवला. बुध, शुक्र हे पृथ्वीचे अंतर्ग्रह तसंच पलीकडचा शेजारी मंगळ यांच्या मोहिमांची आखणी झालीच होती. त्यात बऱयापैकी यश येत असतानाच 1959 मध्ये अमेरिकन संशोधकांना गुरूचे ‘वेध’ लागले. तोपर्यंत माणूस चंद्रावर गेलेला नव्हताच, पण गागारिन स्पेसमध्ये जायलाही दोन वर्षे होती, पण मोठय़ा अंतराळ मोहिमांचा विचार, आराखडा खूप आधीच करावा लागतो.
अखेर गुरूचं दुर्बिणीतून प्रथमतः दर्शन घेणाऱया महान शास्त्र्ाज्ञ गॅलिलिओ गॅलिली याचंच नाव धारण करून ‘गॅलिलिओ’ यान गुरूच्या दिशेने 18 ऑक्टोबर 1989 रोजी उडालं. या यानाकडे मंगळापुढच्या बहिर्ग्रहाला ‘भेटण्या’आधी बुध, शुक्राला परिक्रमा करत वेग वाढवून ‘मार्गक्रमणा’ करायची होती. साधारण अडीच हजार किलो वजनाच्या रॉकेटवरचा कृत्रिम उपग्रह घेऊन ते उडणार होते. उड्डाणानंतर लगेच त्यावरील मॅग्नॅटोमीटर, प्लाझ्मा वेव्हमापक, कॉस्मिक डस्टची नोंद घेणारी यंत्रणा कार्यान्वित झाली.मजल दरमजल करत ‘गॅलिलिओ’ 8 वर्षे 1 महिना आणि दिवसांच्या अथक प्रवासानंतर गुरूजवळ पोचलं. तोवर त्याच्या मार्गातील नोंदी 30 किलो वजनाच्या उपग्रहाने करून डेटा पृथ्वीवर धाडायला सुरुवात केली होती. 62 कोटी किलोमीटरचं अंतर ‘सरळ’ नव्हतं. विविध ग्रहांना वळसे घालता घालता गॅलिलिओचा एकूण प्रवास 4,63,17,78,000 किलोमीटर एवढा प्रचंड झाला. ‘गॅलिलिओ’ने पाठवलेल्या 6,50,000 ओळींच्या सांकेतिक नोंदीतून 16,15,000 ओळींचा ‘डेटा’ (माहिती) उपलब्ध झाला.
ही सगळी अमेरिकेच्या ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’ची करामत होती. अंतराळ मोहीम आखताना किती बारीकसारीक विचार करावा लागतो त्याची कसोटीच होती, पण मानवी मेंदूने सूर्यमालेचा शोध आणि बोध घेण्याचा निश्चय केल्याने संशोधकांनी साऱया गोष्टी काटेकोरपणाने जुळवून आणल्या. तरीही अंतराळात गेलेल्या यानाच्या एवढय़ा प्रचंड प्रवासात अनंत नैसर्गिक व कृत्रिम (बिघाडाचे) धोके होतेच, परंतु ‘गॅलिलिओ’ यशस्वी ठरलं. आपला गुरू आपल्याला अधिक चांगला समजला. हे यश महत्त्वाचं.






























































