
>> वैश्विक
परवा रात्रभर आकाशदर्शन करताना, सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उल्कावर्षाव पाहायला मिळेल ही अपेक्षा फोल ठरली. 1999 मध्ये ताशी 250 उल्का याच सिंह राशीतील उल्कावर्षावात (18 नोव्हेंबर) आम्ही पाहिल्या होत्या. त्या तुलनेत ताशी दहा-बारा उल्का दिसणं काहीच नव्हतं. अर्थात शहरी भागातून ज्यांनी कधीच उल्कावर्षाव अनुभवलेला नाही त्यांच्यासाठी हेसुद्धा एक अप्रूपच होतं. आकाशदर्शनात असे अनुभव येतच असतात. उल्कावर्षाव मनोहारी दिसला नाही तरी पहाटेच्या आकाशात, तूळ राशीच्या पार्श्वभूमीवर शुक्र ग्रहाचं तेजस्वी दर्शन झालं. दुर्बिणीतून तर त्याच्या चंद्राप्रमाणे कलासुद्धा दिसतात. तसाच नवमी-दशमीच्या चंद्रासारखा शुक्र पाहता आला आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचं स्मरण झालं. त्यात असं म्हटलं होतं की, शुक्र ग्रहावरच्या दाट कार्बनच्या ढगांमध्ये सूक्ष्म जीव असण्याची शक्यता आहे. यासाठी शुक्र ग्रहाचं स्वरूप थोडं जाणून घ्यायला हवं. आपल्या सूर्यमालेतील बुधानंतरचा दुसरा ग्रह शुक्र आहे. तोसुद्धा पृथ्वीचा एका बाजूचा शेजारी आहे. सूर्यापासून सुमारे 10 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या शुक्राचं ‘वागणं’ एकूण ग्रहापेक्षा काहीसं वेगळं आहे. इतर सर्व ग्रह पृथ्वीसकट पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरतात. म्हणूनच आपल्याला सूर्योदय पूर्वेला व सूर्यास्त पश्चिमेला दिसतो. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशाने कललेला आहे तसा शुक्राचा अक्ष 177 अंशांनी कललेला असल्याने शुक्रावर सूर्योदय पश्चिमेला दिसतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे शुक्र ग्रहाचा ‘दिवस’ त्याच्या ‘वर्षा’पेक्षा मोठा असतो. 177 अंश कललेला स्वतःच्या अक्षाभोवती एक गिरकी घ्यायला साधारण पृथ्वीएवढाच व्यास असलेल्या शुक्राला 243 दिवस लागतात (पृथ्वी हे काम 24 तासांत करते). शुक्राची सूर्याभोवतीची परिक्रमा मात्र 224 दिवसांची असते. म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण झाली तरी शुक्राचा दिवस काही पूर्ण होत नाही.
एवम् गुणविशिष्ट तेजस्वी शुक्राला इतकं ‘तेज’ कुठून प्राप्त होतं? याचं कारण शुक्र ग्रहावर 96 टक्के कार्बनचं आवरण आहे. थोडक्यात, शुक्र ग्रह कार्बनच्या दाट मेघमालेने वेढलेला आहे. त्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या किरणामुळे शुक्र ग्रह चमकताना दिसतो. त्यामुळे त्याला ‘शुक्राची चांदणी’ असं काव्यात म्हटलं गेलं असावं.
यावरून आठवलं की, एका स्थानिक साहित्य संमेलनात आमच्या खगोल संस्थेचाही एक माहितीचा विभाग होता. त्यात आमची खगोलीय प्रकाशनं होतीच, पण त्याचबरोबर वाङ्मयातील ग्रहताऱ्यांचा वर्णन आणि विज्ञानातील सत्यात याविषयीसुद्धा स्पष्टता केली होती. कवितेतला शुक ‘तारा’ प्रत्यक्षात ग्रह आहे. ‘धूमकेतूसारखा उगवलास’ असं अचानक येणाऱ्या व्यक्तीला म्हटलं जातं, परंतु सर्व ‘धूमकेतू’ अवकाशात ठराविक काळानेच दिसतात. हॅलोचा दर 76 वर्षांनी येतो. चंद्र ‘सुंदर’ असल्याचं विज्ञानात सिद्ध झालेलं नाही. त्यावरची विवरं (खड्डे) आता सर्वांना ठाऊक आहेत. अर्थात ही गमतीची तुलना होती, पण अशाच माध्यमातून वैज्ञानिक सत्यता हळूहळू लोकांच्या नात उतरते असा आमचा अनुभव आहे.
आता प्रश्न शुक्राभोवतीच्या दाट कार्बन-क्लाऊडमध्ये ‘सजीव’ असतील का? असतील तर ते अतिसूक्ष्म ‘मायक्रॉन’सारखेच असणार. कुठेतरी ‘जीवसृष्टी’ असल्याची बातमी आल्यावर सर्वसामान्यांना पृथ्वीसारखी प्रगत वस्ती असेल असं वाटतं. त्याचा मागमूसही अजून लागलेला नाही. तशी शक्यता असलेली ‘सुपर अर्थ’ आपल्या सूर्यमालेपासून 6 प्रकाशवर्षे अंतरावरच्या एका ताऱ्याभोवती फिरत आहे. पृथ्वीसारखा, पण पृथ्वीपेक्षा चारपट मोठ्या या ग्रहावर बर्फ, पाणी, आढळलंय असं म्हणतात, पण त्या ग्रहाचं अंतर ताऱ्यापासून दूर असल्याने त्यावर पडणाऱ्या प्रकाशाची प्रखरता आपल्या सूर्यप्रकाशाइतकी तीव्र नाही. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या वनस्पती आणि प्राणिसृष्टीचं वैविध्य तिथे असण्याची शक्यता कमीच, परंतु विराट विश्वात ‘आपल्यासारखं’ किंवा आपल्यापेक्षाही प्रगत कुणीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘त्या’ अज्ञात प्रगत सजीवाशी संपर्क साधण्यासाठी किंवा विश्वात आपण एकटेच असलो तर आपलं अद्वितीयत्व टिकवण्यासाठी आपला पाणीदार, हिरवागार ग्रह ‘टिकवणं’ ही आपली जबाबदारी आहे एवढं मात्र नक्की.






























































