
>> बदीऊज्जमा बिराजदार ([email protected])
मुस्लिम मराठी गझलकार ‘माझ्या देहाची धरती माता, हा कुराण ही माझी गीता’ या श्रद्धेनं गझललेखन करताहेत. सामाजिक सद्भाव हाच त्यांच्या लेखनाचा मूलभूत पाया आहे, परंतु दुर्दैवानं देशभरात विघटनवादी प्रवृत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांच्या धार्मिक उन्मादामुळे राष्ट्रीय एकात्मतेला, अखंडतेला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे सामाजिक सहिष्णुतेचे रंग उडत चाललेत. संविधानातील स्वातंत्र्य, समता अन् बंधुत्व या त्रिसूत्रींचा सर्वांनी अंगीकार करावा, एवढीच मुस्लिम मराठी गझलकारांची रास्त अपेक्षा आहे.
नववे अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे 28 व 29 जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने…
इथल्या मातीत जन्मलेले मुस्लिम मराठी गझलकार जातिधर्माच्या जाळय़ात कधीच गुंतून पडलेले नाहीत. हिंदू-मुस्लिम भेदभावाचा वाराही त्यांना कधीच स्पर्श नाही करत. देशापेक्षा कुठलाच पंथ मोठा नाही, अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या मनात सतत देशाभिमानाची ज्योत तेवत असते. हिंदुस्थानातल्या तमाम मानवांचे जीवन प्रकाशमान व्हावे, ही त्यांची आंतरिक तळमळ आहे. ते मातृभूमीचा हार्दिक सन्मान करतात.
मुस्लिम मराठी गझलकारांचा देशाभिमान पाहिल्यानंतर ही गोष्ट स्पष्टपणे समोर येते की ते इथल्या मातीशी, संस्कृतीशी किती एकनिष्ठ आहेत. मातीच्या कणाकणाशी त्यांचा इमान शाबूत आहे. हे मुळातून जाणून घेणं अत्यंत निकडीचं आहे. प्रस्तुत लेखातील गझलकार मान्यवर असून त्यांची अनेक मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध आहेत.
या मातीचा ओलावा माझ्या रोमारोमात भरून आहे. या मातीशी, देशाशी माझे अतूट नाते आहे. या मातीशी माझी नाळ घट्ट जुळलेली आहे. मी मुस्लिम असलो तरी याच मातीतून जन्माला आलोय. संविधानावर अचल निष्ठा आहे. या मातीशी माझे इमान आहे. याचे अनेक दाखले देताना ज्येष्ठ गझलकार बदीऊज्जमा खावर (दापोली-रत्नागिरी) म्हणतात.
नाते माझे मरूनसुद्धा हे संपणार नाही
मातीत याच माझ्या, माझे इमान आहे
हिंदुस्थानातील प्रत्येक राज्यातील मुसलमान इथल्या मातीशी, भाषेशी, संस्कृतीशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्या त्या प्रादेशिक भाषेत त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलीय. मरणही माझे भुईला पुंकवाचे दान आहे असं जेव्हा गझलकार लिहितो तेव्हा ते मातीवरचं, भाषेवरचं, देशावरचं प्रेमच असतं. यात हिंदू-मुस्लिम असा प्रश्न येतोच कुठं? याचा प्रत्यय कलीम खान (आर्णी-यवतमाळ) यांच्या शेरावरून येतो.
मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदुस्थान आहे
मरणही माझे भुईला पुंकवाचे दान आहे!
हिंदुस्थानसारखी सुजलाम सुफलाम धरती जगाच्या पाठीवर कुठंच आढळून नाही येत. विविधतेतील एकता हे इथलं खरं ऐश्वर्य आहे. एकतेमुळेच दुनियेत हिंदुस्थानचे मोठे स्थान आहे. सलोखा ही आपली फार मोठी ताकद आहे. माझ्या आतला आवाजसुद्धा हिंदुस्थान असाच आहे. एकतेचा रथ असाच अखंडितपणे दौडत रहावा. एका हिंदुस्थानीने दुसऱ्या हिंदुस्थानीशी आपुलकीनं वागावं यात देशाचं मोठेपण आहे असं प्रा. डॉ. जुल्फी शेख (नागपूर) यांना वाटतं.
आवाज अंतरीचा हिंदुस्थान आहे
दुनियेत एकतेचे मोठेच स्थान आहे
हिंदुस्थानची परंपरा महान आहे. संस्कृती श्रेष्ठ आहे. जाज्वल्य इतिहास आहे. म्हणून साऱ्या जगात देशाची शान आहे. याची जगणूक सर्वांनीच जीवापाड केली पाहिजे. या भूमीवर शतदा प्रेम करावं अशी ही भूमी आहे. राष्ट्र प्रथम! राष्ट्राचं गान, प्रतिज्ञा मनात रुजवून घेतली पाहिजे. आपला जन्म इथल्या मातीत झालाय. आपण हिंदुस्थानवासी असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असं अनिसा शेख (दौंड-पुणे) गौरवानं सांगतात.
झालाय जन्म माझा मातीत भारताच्या
मी भारतीय याचा मज अभिमान आहे
देशात कुठंही बॉम्बस्पह्ट झाला की, आपल्यावरच आळ येईल या असुरक्षित भावनेनं मुस्लिम समाज प्रसंगी भयभीत होऊन जातो. बॉम्बस्पह्ट करणाऱ्या अतिरेक्यांशी इथल्या विवंचनाग्रस्त मुस्लिमांचा काडीचाही संबंध नसतो. ते अतिरेक्यांना कधीच पाठीशी नाही घालत. किंबहुना त्यांच्या भ्याड कृत्याचा ते जाहीर निषेध नोंदवतात. तरीही ‘सब घोडे बारा टके’ असे समजून हिंदुस्थानी मुसलमानांकडे अविश्वासानं पाहिलं जातं. अतिरेक्यांनी आपल्या देशाला कितीही घाबरविण्याचे प्रयत्न केले तरी त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. देशाचे विभाजन होणार नाही. देशप्रेम माझ्या रक्तात भिनलंय, असं मुबारक शेख (सोलापूर) यांनी अतिरेक्यांना स्पष्ट शब्दांत बजावलंय.
देश नष्ट झाला नाही अतिरेक्यांनो!
देश मी! कधी माझे ना विभाजन आहे
ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन गुलामगिरीच्या शृंखलेतून भारतमातेची सुटका केली त्या शहीद वीर जवानांचाही गझलकाराला अभिमान वाटतो. त्याची आरती करत त्या सर्वांना प्रणाम करतो. त्याची पवित्र स्मृती मनात जागी ठेवतो. आपल्या वीर जवानांचं निरंतर स्मरण करणे हेच खऱ्या देशभक्तीचं द्योतक आहे.
आपण सारे हिंदुस्थानी वर्षानुवर्षे एकदिलानं राहत आलो आहोत. एकमेकांच्या सणावारात आपण आनंदाने सहभागी होत असतो, भाईचारा जपत असतो, परंतु काही खोडसाळ लोकांना हा सलोखा बघवत नाही. ते दुही माजविण्याचा प्रयत्न करतात, मने कलुषित करून आग लावण्याचा उपद्व्याप करत असतात. जातीचा विषारी भुंगा देशाला आरपार पोखरत असतो. यात देशाची अपरिमित हानी होते. यापासून साऱ्यांनी धडा घेतला पाहिजे. आजच्या असहिष्णुतेच्या काळात साऱ्यांनी मिळून देशाला वाचविणे अपरिहार्य आहे, असं प्रा. डॉ. फातिमा मुजावर (पनवेल) यांना वाटतं. त्याअनुषंगाने त्यांचा हा शेर…
आता असे करू या सारे मिळून आपण
देशास वाचवू या सारे मिळून आपण
देशात आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिमानानं साजरा केला, परंतु दबलेल्या लोकांच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही. दंगलीनं, जाळपोळीनं देश कधीच प्रगतिपथावर जाऊ नाही शकत. माणुसकीची मूल्ये जळून खाक होतात. सामाजिक संतुलन अबाधित ठेवण्यासाठी भेदभाव नष्ट केला पाहिजे. धर्ममार्तंडांच्या, धूर्त राजकीय नेत्यांच्या कुटील कारस्थानाला आपण बळी पडता कामा नये, सौहार्द टिकवण्यासाठी प्रत्येकानं देशाभिमान बाळगला पाहिजे अशी साद मुस्लिम मराठी गझलकारांनी त्यांच्या शेरांतून घातलीय.


























































