
>>रविंद्र वडनेरकर<<
नानामहाराजांच्या स्मरणार्थ दरवर्षी दादर येथील शारदाश्रम विद्यालयाच्या हॉलमध्ये एकदिवसीय उत्सव केला जातो. त्यासाठी नानामहाराजांचे नातू डॉ. बाबामहाराज व त्यांचे कुटुंबीय मुद्दाम हजर असतात. या वर्षी रविवार, 27 जानेवारी रोजी हा उत्सव वर सांगितलेल्या ठिकाणी होणार आहे.
सद्गुरू नानामहाराज एक दत्तावतारी संतपुरुष होऊन गेले, परंतु जे सद्गुरू असतात ते कधीच ‘होऊन गेले’ या संज्ञेत बसत नाहीत. कारण असे संतमहात्मे हे कोणतीही जात-पात, धर्म बघत नाहीत. एकदा अशा विभुतींच्या संपर्कात समाज- मग तो कोणीही असो, कुठेही राहणारा असो – त्यांच्या संपर्कात आला की, मग त्यांच्या सुखात आनंदात सहभागी होतो व दुःखात त्याला दुःखांपासून सुखापर्यंत नेत असतो. तसा सतत प्रयत्न असतो व त्या गोष्टीला नानामहाराजही अपवाद नाहीत. ते आजही आपल्यात आहेत.
आपल्या भारतवर्षात काही प्रमुख देव-देवतांना आपण मानतो. त्यातीलच एक म्हणजे दत्तप्रभू. दत्तप्रभूंचे एक विशेष म्हणजे त्यांनी मानवी रूपात ठिकठिकाणी संतपुरुषांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे तसेच त्यांच्या तपश्चर्येप्रमाणे संतपद दिले आहे व लोकांना, समाजाला त्यांचा फायदा व्हावा हा एकमेव उद्देश आहे. नानामहाराज हे त्यातीलच एक अधिकारी संत आहेत. त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती आजही त्यांच्या संपर्कात म्हणजे प्रत्यक्ष नसले तरी आहेत.
महाराजांचे मूळ गाव मध्य प्रदेशातील उज्जैन जिह्यातील तराणा नावाचे गाव. तिथे कठोर तपश्चर्या लहान वयातच करून सद्गुरूप्राप्ती करून घेतली. सावंतवाडीतील ‘माणगाव’चे टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. नंतर महाराजांच्या (नानामहाराजांच्या) तपश्चर्येचा लाभ जसजसा समाजाला होत गेला तसा लोकांचा विश्वास वाढला. अगदी तळागाळांतील भक्तांपासून ते इंदूरचे राजे होळकरांपर्यंत महाराजांची सेवा रुजू होत असे व त्यामध्ये राजांनी राजवाडाही देऊ केला, परंतु त्यांनी आपली साधना गरीब समाजाला डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी देऊ केलेले ऐश्वर्य नाकारले. तराणा हीच आपली कर्मभूमी ठेवली. नंतर मात्र त्यांनी इंदूर येथे वास्तव्य केले. ते भक्तांच्या सोयीसाठी इंदूरला आले व तिथेच स्थायिक झाले.
महाराजांनी अनेक प्रदेशात प्रवास केला. तिथे भक्तांसाठी अनेक सुविधा प्राप्त करून दिल्या. भक्तांच्या अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्यांनी प्रेम दिले. शांत स्वभाव असल्यानेच त्यांच्या भक्तांनी ‘शांती-पुरुष’ हे मासिक दर महिन्याला नागपूरहून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्यामध्ये महाराजांनी आचरणात आणलेल्या गोष्टी, नियम, व्यवहार, शिकवणूक व त्याद्वारे होणारे फायदे सामान्य जनांपर्यंत पोहोचविणे हा एकमेव उद्देश आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनातही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून एक सामान्य माणूस खूप काही साधू शकतो. त्याला फक्त योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन महाराज आजही कोणताही चमत्कार किंवा अघोरी उपाय न करता करीत असतात व त्यामुळे आपोआपच त्याची पावले इंदूर, गाणगापूर अथवा मुंबई, नागपूर, जळगाव, पुणे वगैरे ठिकाणी निर्माण झालेल्या स्थानांवर पडतात. श्रद्धेने हात जोडले जातात व प्रार्थना केल्यावर महाराज प्रार्थना पोहोचल्याची पावती देतात.
दत्त संप्रदायात गाणगापूर हे गाव सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण तिथे प्रत्यक्षात दत्तगुरूंची उपस्थिती असते. हे गाव कर्नाटकात जरी असले तरी सोलापूरहून अगदीच जवळ आहे. तिथेच नरसिंहसरस्वतींच्या निर्गुण पादुका आहेत. मंदिरातील या पादुकांचे दर्शन म्हणजेच प्रत्यक्ष दत्तदर्शन असते. तिथून 4 किलोमीटर अंतरावर भीमा-अमरजा नद्यांचे संगमस्थान आहे व या संगमावरही सुंदर मंदिर आहे. त्याच्या समोरच सद्गुरू नानामहाराजांनी 1984 साली स्वतःच्या देखरेखीखाली 18 खोल्यांची धर्मशाळा, मोठे सभागृह, भोजनगृह उभे केले.
आज असंख्य भक्तांना त्यांचा लाभ होत आहे. आजच्या काळात आता वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्याने रहदारी वाढली, राहण्याच्या सुविधा वाढल्या, परंतु नानामहाराजांच्या साधना भवनात त्या आता कमी पडू लागल्या आहेत. जागा मोठी आहे व आता तिथे महाराजांचे नातू डॉ. प्रदीप तराणेकर यांनी त्याच साधना भवनात अधिक खूप चांगल्या सुधारणा येणाऱया भक्तांसाठी केलेल्या आहेत. त्याचा दत्तभक्तांनी नक्की लाभ घ्यावा. नानामहाराजांना गेल्या वर्षीच ब्रह्मलीन होऊन 25 वर्षे झाली, परंतु आजही दिवसेंदिवस महाराजांचा भक्तपरिवार सर्वदूर वाढतच आहे.































































