
>> कर्नल अभय बा. पटवर्धन
महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये नक्षल विरुद्ध प्रशासन स्थितीचे संदर्भ बदलत चाललेले दिसून पडतात. नक्षल्यांनी याच इलाख्यातून आंध्र आणि छत्तीसगढ राज्यात भक्कम कॉरिडोर निर्माण करून मागील तीस वर्षे महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारला बेजार केले होते. 13 नोव्हेंबरच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षली संख्येवरून त्यांचा गडचिरोलीमधील लोकांवरचा प्रभाव ओसरू लागला असल्याचे ‘सी-60’ कमांडोंनी केलेल्या मोठय़ा कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
नक्षली एकेकाळी ज्या भागात मुक्तपणे वावरत असत त्याच भागात वाढलेला पोलिसी कारवायांचा दबदबा, शरणागतांसाठी पुनर्वसनाच्या आकर्षक योजना इत्यादी कारणांमुळे नक्षली सशस्त्र चळवळीच्या मार्गापासून दूर जात आहेत. शिवाय, बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवामुळे या जिह्यातला सशस्त्र चळवळीचा संदर्भही कमी होत चालला आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील गडचिरोली जिह्यात कोटगुल ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत पोलीस व ‘सी 60’ कमांडोंनी नक्षली चळवळीतील वरिष्ठ नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 माओवाद्यांचा खातमा केल्याची पुष्टी गडचिरोली पोलिसांनी केली. मिलिंद ऊर्फ दीपक ऊर्फ ज्योतिराव ऊर्फ श्रीनिवास तेलतुंबडे, सीपीआय (एम) सेंट्रल कमिटीचा सचिव, एमसीसी इन्चार्ज आणि दंडकारण्याच्या महाराष्ट्र, छत्तीसगढ भागातील सामरिक महत्त्वाचा नेता होता. सूत्रांनुसार हे सर्व नक्षली आगामी नक्षल सप्ताहासंदर्भात पोलिसांविरुद्ध विध्वंसक अॅक्शन प्लॅन आखण्यासाठी आणि तो प्लॅन कसा कार्यान्वित करायचा याच्या विचारविनिमयासाठी जंगलात जमले होते. या चकमकीत गडचिरोली पोलिसांचे रवींद्र नैताम, सर्वेश्वर आत्राम, महरू कुळमेथे आणि टिकाराम कटांगे जखमी झाले.
13 नोव्हेंबर रोजी पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेली चकमक नक्षलग्रस्त गडचिरोली जिह्यातील सर्वाधिक काळ चाललेली चकमक होती. चकमक सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होऊन संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत चालली. कमांडो रात्रीच जंगलात घुसले आणि नक्षली ठिकाणापासून योग्य अंतरावर आल्यानंतर त्यांनी चहूबाजूंनी स्ट्राइक फॉर्मेशनमध्ये आगेकूच (टॅक्टिकल अॅडव्हान्स) सुरू केली. लपलेल्या जागेतून येणाऱया शत्रूची टेहळणी करणाऱया पहारेकऱयांना (लूकआऊट मेन) आगेकूच करणाऱ्या पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी एकदम जबरी फायरिंग सुरू केली. विशेष प्रशिक्षित सी सिक्स्टी कमांडोंच्या 100 जवानांनी या चकमकीत नक्षली हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी तुफान गोळाबारी झाली. नक्षल्यांनी ग्रेनेड लाँचरही वापरले. ज्या प्रमाणात नक्षली फायरिंग होत होती, त्यावरून तेथे कोणीतरी फार मोठा नक्षली नेता आल्याचा अंदाज पोलिसांना आला आणि तो खराही ठरला.
या जागेत मोठय़ा प्रमाणात नक्षली नेते होते, त्यापैकी काही अंधारात निसटून गेले असण्याची शक्यता आहे. मात्र मिलिंद तेलतुंबडेला वाचविण्यासाठी नक्षल्यांनी प्राणपणाने लढा दिला. त्याच्या रक्षणार्थ असलेल्या सहाही पुरुष/महिला अंगरक्षक त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मारले गेले. रात्री नक्षली कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या शंभर कमांडोंच्या मदतीला रातोरात सी सिक्स्टी जवानांच्या 16 तुकडय़ांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली. एका तुकडीत 32 जवान असतात. सूत्रांनुसार नक्षली धानोरा तालुक्यातील कोटगुल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात असल्याची, त्यात टिपागढ व कोरची दलम आणि विस्तार प्लॅटूनचे नक्षल सदस्य असल्याची आणि त्याचे नेतृत्व गडचिरोली डिव्हिजनल कमिटीचा मेंबर सुखलाल परचाकी करत असल्याची पक्की खबर गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. 26 नक्षल्यांना देवाघरी धाडणारी ही चकमक गडचिरोलीच्या इतिहासातील दुसरी मोठी घटना आहे. 23 एप्रिल 2018ला याच सी सिक्स्टी कमांडोंनी 40 नक्षल्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ठार केलं होतं.
नक्षल्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी 1992मध्ये गडचिरोलीत स्थानिक आदिवासींच्या विशेष कृती दलाची स्थापना केली. त्याचे सी सिक्स्टी हे नामकरणही झाले. कारण त्यात साठ कमांडो प्रशिक्षित पोलीस होते. या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला. कारण त्यांचे स्थानिक भाषेवरील प्रभुत्व, लोकसंस्कृती, समाज आणि भूभागाची योग्य माहिती या सर्व गोष्टी. परिणामी गनिमी युद्धतंत्रात महत्त्वाच्या असतात. सी सिक्स्टीच्या संख्येत पुढे नियमित भर पडत गेली आणि त्यांना नक्षलवाद्यांचा बीमोड करणारे खुंखार दल हे बिरूद मिळाले. सध्या या पथकात जवळपास एक हजार जवान असले तरी त्याचे नाव मात्र तेच आहे. त्यांना गनिमी युद्धनीतीचे प्रशिक्षण एनएसजी सेंटर, बीएसएफ कमांडो स्कूल आणि आर्मी जंगल वॉरफेअर स्कूलमध्ये देण्यात येते, आधुनिक व प्रगत शस्त्र पुरवली जातात तसेच प्रोत्साहनपर बढती आणि बक्षिसेदेखील दिली जातात.
‘सी-60’ पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षल्यांना वाटत असल्यामुळे सी सिक्स्टीमध्ये भरती होऊ पाहणाऱया उमेदवारांना परावृत्त करण्यासाठी नक्षल्यांनी निवडक उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारणे सुरू केले. सी सिक्स्टीच्या खबऱयांचे नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाईट पह्नचे विस्तारलेले जाळे, केंद्रीय निमलष्करी दलाचे पाठबळ आणि वाढविण्यात आलेली गस्त यामुळे आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्षल्यांवरचा दबाव वाढला आहे. ही कारवाई केवळ एक चकमक नव्हती, तर तो एक योजनाबद्ध हल्ला होता असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.
.
महाराष्ट्र सरकारने ‘सी-60’ फोर्सला नेहमीच योग्य ती आर्थिक व साधनसामग्रीची मदत केल्यामुळे त्याची कार्यक्षमता अबाधित राहते. त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट्स, नाईट व्हिजन ग्लासेस, ड्राय रेशन आणि आधुनिक शस्त्रास्त्र दिली जातात. 1990च्या दशकात साध्या एसएलआर रायफली असणाऱया सी-60 जवानांकडे आज एके 47/56 रायफल्स आहेत. अंकित गोयलनी या ऑपरेशनचे मूलभूत व बारीक प्लॅनिंग केले. फोर्स केव्हा लॉन्च करायचा, त्याला लक्ष्यापर्यंत कसे पाठवायचे आणि किती कुमक केव्हा व कशी पाठवायची याची काटेकोर आखणी व राबवणी त्यांनी केली. सौम्या मुंडेंनी या प्लॅनला साधकबाधक रीतींनी प्रत्यक्षात उतरवले. सदैव अशा जांबाज अधिकाऱयांचे नेतृत्व लाभल्यामुळेच सी सिक्स्टी कमांडो व गडचिरोली पोलीस महाराष्ट्रातील नक्षली दबावाचा अस्त करण्यात सफल झाले आहेत असे म्हटल्यास ते चूक होणार नाही.
महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये नक्षल विरुद्ध प्रशासन स्थितीचे संदर्भ बदलत चाललेले दिसून पडतात. नक्षल्यांनी याच इलाख्यातून आंध्र आणि छत्तीसगढ राज्यात भक्कम कॉरिडोर निर्माण करून मागील तीस वर्षे महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारला बेजार केले होते. 13 नोव्हेंबरच्या चकमकीत ठार झालेल्या नक्षली संख्येवरून त्यांचा गडचिरोलीमधील लोकांवरचा प्रभाव ओसरू लागला असल्याचे ‘सी-60’ कमांडोंनी केलेल्या मोठय़ा कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे नक्षल्यांना मोठा धक्का बसला असणार यात शंकाच नाही. 2017 ते 20मध्ये पोलिसांनी 76 नक्षल्यांचा खातमा केला तर त्यांनी 22 पोलिसांना देवाघरी धाडले. याच काळात 180पेक्षा जास्त नक्षल्यांनी शरणागती पत्करली. अलीकडील भूतकाळात स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर नक्षल्यांना देत असत. सांप्रत ते पोलिसांना नक्षल्यांचा ठावठिकाणा सांगतात. आता जनमानसाचा कल गडचिरोली पोलिसांच्या बाजूने झुकलेला दिसून येतो.
मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील नक्षली चळवळीला मोठा फटका बसला आहे. दंडकारण्यामध्ये त्यांचे प्रभाव क्षेत्र आपुंचित होत आहे. कारण पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या (पीएलजीए) प्रतिकाराची तीव्रता आणि विस्तार क्षमता, दोन्ही कमी झाले आहेत. नक्षली पक्ष आणि गनिमांमधील रुंदावत जाणारी दरी, नवीन सदस्यांची कमी होत असलेली संख्या आणि चळवळ सोडून शरण जाणाऱ्यांची वाढती संख्या या सगळ्यामुळे नक्षल्यांवर निदान महाराष्ट्रात तरी कठीण काळ आल्याचे प्रत्ययाला येते. सशस्त्र संघर्षांमध्ये गुप्त वार्तेला प्रचंड महत्त्व असते आणि नक्षलविरोधी लढय़ात स्थानिक लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांना आता चांगली फळे मिळत आहेत हे या चकमकीतून उजागर झाले आहे. गडचिरोली पोलीस आणि सी सिक्स्टी कमांडोंना या नवीनतम चकमकीत मिळालेल्या उज्ज्वल यशाची परंपरा अशीच कायम व अबाधित राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
‘सी-60’ कमांडोंच्या या घवघवीत यशाला वरिष्ठ अधिकाऱयांचे मार्गदर्शन, बिनादबाव योग्य जवानांचे चयन व कठोर प्रशिक्षण, असाधारण कार्यक्षमता, प्रशासकीय पाठिंबा आणि पोलीस अधीक्षकांचे नियोजन आणि अंमलबजावणी कारणीभूत आहे. ‘सी-60’ची निवड व प्रशिक्षण स्तर उच्च दर्जाचा आहे. नक्षल्यांशी लढा देण्याची तीव्र आंतरिक इच्छा असलेले स्थानिक पोलीस आणि युवकच यात घेण्यात येतात. याच्या प्रशिक्षणाचा स्तर देशातील वरिष्ठ दर्जाच्या कमांडोंच्या समकक्ष असतो हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. हे युवक या फोर्समध्ये ठरावीक कालखंडासाठीच येतात आणि नंतर आपल्या पॅरेण्ट युनिटमध्ये परत जात असल्यामुळे हा सदैव तारुण्याने मुसमुसलेला फोर्स नेहमीच अनुभवी अधिकाऱयांखाली कार्यरत असतो. या फोर्सकडे खबऱ्यांचे विस्तारित जाळे असल्यामुळे त्यांना माहितीची वानवा नसते. सी सिक्स्टी स्पेशल इंटलिजन्स युनिट नक्षलीसंबंधी माहितीची उपलब्धता व पृथक्करण करून योग्य ते निर्देश देते.


























































