
>> वैश्विक, [email protected]
ग्रहमालेचा प्रवास करता करता आपण प्लूटोपर्यंत आलो. मंगळ, गुरू आणि शनी या मधल्या मोठय़ा ग्रहांविषयी अनेकदा लिहिले असल्याने पुनरुक्ती केली नाही. तुलनेने जे ग्रह आणि सूर्याभोवती फिरणाऱया इतर वस्तू यांच्याविषयी कमी माहिती असते त्याचा धावता आढावा आपण घेत आहोत.
आकाराने प्रचंड असलेल्या युरेनस आणि नेपच्यूनपलीकडचा प्लूटो मात्र बराच छोटा आहे. अगदी अलीकडेच त्याच्या ‘छोटेपणा’वर वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केल्याने त्याचे ‘स्टेटस’ बदलले. ते कसे ते पाहण्याआधी त्याच्या शोधापासूनचा थोडा मागोवा घेऊ. 1916 मध्ये लॉवेल या खगोल अभ्यासकाने नेपच्यूनपलीकडचा प्लॅनेट ‘एक्स’ शक्तिशाली कॅमेरा व दुर्बिण वापरून ‘दिसेल’ असे म्हटले. तसे प्रयत्नही सुरू झाले आणि 1929 मध्ये अमेरिकेतील ऑरिझोना राज्यातील फ्लॅगस्टाफ येथे लॉवेल वेधशाळा सुरू झाली. (याच राज्यात अमेरिकेतले प्रसिद्ध अशनी-आघात विवर आहे. ते ‘बॅरिंजर क्रेटर’ म्हणून ओळखले जाते) तर लॉवेल वेधशाळेतून एक तरुण खगोल निरीक्षक चिकाटीने अवकाशाचा वेध घेत असे. त्याचे नाव क्लाइड टॉम्बो. त्यानाच 18 फेब्रुवारी 1930 रोजी प्लूटोचे दर्शन झाले आणि प्लॅनेट ‘एक्स’ सापडल्याचा आनंद सर्वांना झाला.
मात्र, हा नवा ग्रह अतिशय अस्पष्ट असा दिसत होता. साधारणपणे ग्रह दुर्बिणीतून चकतीसारखे दिसतात. प्लूटो एवढा लहान की तो ठिपक्यासारखाच भासत होता. पर्सिकल लॉवेलने त्याला ग्रीक पाताळदेवता ‘प्लूटो’चे नाव दिले. 13 मार्च 1930 रोजी नेपच्यूनचा शोध लागून 149 वर्षे होत होती. त्याचे औचित्य साधून त्याच तारखेला प्लूटोचे नामकरण झाले.
प्लूटोची कक्षा सर्व ग्रहात अधिक लंबवर्तुळाकार आहे. त्याच्या या कक्षेपायी तो कधी कधी नेपच्यूनपेक्षाही सूर्याच्या जवळ असतो. आपल्या अंतग्रहापेक्षा जनक ताऱयापासूनचे अंतर कमी होणारा प्लूटो हा एकमेव ग्रह ठरला. 1999 मध्ये प्लूटो त्याच्या कक्षेत उपसूर्यस्थानी असताना तो नेपच्यूनपेक्षा सूर्याच्या 10 कोटी किलोमीटर जवळ होता, असे निरीक्षण नोंदविण्यात आले; परंतु या दोन्ही ग्रहांच्या कक्षा दूर असल्याने त्यांच्यात कधी टक्कर झाली नाही आणि संभवतही नाही.
हबल अंतराळ दुर्बिण कार्यान्वित झाल्यावर प्लूटोची जास्त माहिती मिळू लागली. त्याचा अक्ष 90 अंशापेक्षा अधिक कललेला असून ही शुक्र, नेपच्यूनसारखी ‘वक्री’ गती म्हणावी लागेल. (शुक्राचा अक्ष तर 178 अंश कलता असल्याने तेथे सूर्योदय पश्चिमेला व सूर्यास्त पूर्वेला घडतो.)
1978 मध्ये प्लूटोच्या फोटोचा अभ्यास करता करता जेम्स क्रिस्ती यांच्या लक्षात आले की प्लूटोचा आकार किंचित लंबगोल आहे. पण प्रत्यक्षात तो प्लूटोचा उपग्रह ‘शेरॉन’ होता. त्याच्यात आणि प्लूटोमध्ये फक्त 19 हजार 600 किलोमीटरचे अंतर आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या तुलनेत खूपच कमी भरेल. (चंद्र- पृथ्वी अंतर 3 लाख 84 हजार कि.मी.) त्यानंतर प्लूटोचे अनेक उपग्रह सापडले. त्यातले महत्त्वाचे म्हणजे शेरॉन, निक्स व हायड्रा. प्लूटोचा व्यास 2274 कि.मी. तर उपग्रह शेरॉनचा 1190 कि.मी. आहे. म्हणजे मूळ ग्रहापेक्षा निम्म्या आकाराचा उपग्रह! प्लूटो आणि शेरॉनचा एकत्रित व्यास आपल्या चंद्राच्या व्यासाएवढा होईल. प्लूटोप्रमाणेच शेरॉनवरही पोलर कॅप (बर्फाच्या) आहेत.
2006 मध्ये प्राग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने खूप चर्चेअंती प्लूटोचे ग्रहपद काढून घेतले आणि त्याला खुजा ग्रह म्हणून घोषित केले. एखादा ग्रह ताऱयाभोवती (लंब) गोलाकार फिरावा, त्याच्या मार्गात मोठे अडथळे नसावेत असे जे काही निकष होते ते सर्व प्लूटो पूर्ण करू शकला नाही. तो सूर्याभोवती लंबवर्तुळात फिरत असला तरी त्याचा मार्ग इतर ग्रहांसारखा रिक्त नाही. हे जाहीर झाले तेव्हा प्लूटो शोधणाऱया क्लाइडची पत्नी म्हणाली, ‘प्लूटोच्या ग्रहपदाविषयी आरंभापासूनच शंका होती. आता ते निश्चित झाले आहे.’ अर्थात प्लूटोला त्याचे काय वाटणार? तो एक निर्जीव गौलक. इमानेइतबारे आपल्या कक्षेत फिरणारा. त्याला बिचारा म्हणा किंवा खुजा म्हणा, तो आहे तसाच राहाणार.






























































