ठसा – प्रा. अच्युत विनायक विश्वरूपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सच्चिदानंद शेवडे

काही वर्षांपूर्वी नागपूर येथील तात्या टोपे नगर गणेशोत्सव मंडळाकडून व्याख्यानासाठी शशांक विश्वरूपे यांचा फोन आला होता. त्यानुसार नागपुरात गेलो. एअरपोर्टवर शशांक विश्वरूपे आले होते. त्यांच्या घरी गेलो आणि अचंबित झालो.

संस्कृत ही देवभाषा आहे असे आपण म्हणत असतो. आपल्या महान अशा वेदोपनिषदांची आणि रामायण व महाभारतासारख्या काव्येतिहास ग्रंथांची प्राचीन भाषा आहे, असे अभिमानाने सांगतो. तथापि ती भाषा शाळेत व क्वचित महाविद्यालयात शिकणे आणि शिकविण्यापुरते सोडले तर या भाषेत संवाद साधणारे, करणारे अगदी क्वचितच सापडतील. त्यामुळे ती संवादाची भाषा नव्हेच असे बोलले जाते, पण संस्कृत ही संवादाची भाषाही होऊ शकते ही गोष्ट विश्वरूपे कुटुंबाने सिद्ध केली. त्यांची दोन मुले, सुना, तीन नातवंडे आपापसात केवळ संस्कृतमध्येच संवाद साधत होती. ‘संस्कृत बोलणारे कुटुंब’ अशी त्यांची नागपुरातील खास ओळख आहे. हे सर्व सहज शक्य करणारे कुटुंबप्रमुख होते. प्रा. अच्युत विनायक विश्वरूपे अलीकडेच त्यांचे निधन झाले.

य ऐनद्यष्टाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरोः जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते?

(श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, तसे आचरण इतर लोक करतात. असा श्रेष्ठ मनुष्य जे प्रमाण घालून देतो, त्याचे आचरण सगळे करतात.)

असे आपल्याकडे सांगितले आहे, ते विश्वरूपे कुटुंबाने प्रत्यक्षात उतरवले आहे. अन्यथा इतिहासाचा विभागप्रमुख असलेला हा प्राध्यापक संस्कृत भाषेत संभाषण करण्याकडे आणि आपल्या कुटुंबालाही त्यात सहभागी करण्याकडे का ओढला जाईल?

त्याचीही एक गोष्ट आहे. प्रा. अच्युत विश्वरूपे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पांढरकवडा येथे झाले. पुढे इतिहास विषय घेऊन नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालयातून एमए आणि एमफिल केले. 1965 मध्ये तिथेच प्राध्यापक म्हणून रुजू झाले. एके दिवशी स्टाफ रूममधील चर्चेत इंग्रजी लिटरेचर शिकविणाऱया प्राध्यापकांनी संस्कृतला ‘मृत भाषा’ संबोधले. संवादात न येणारी भाषा म्हणून त्यांनी तसे म्हटले असावे. तो क्षण प्रा. विश्वरूपेंचे आयुष्य बदलून टाकणारा ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या प्राध्यापकांच्या मतखंडनार्थ त्यांनी जमेल तशा रीतीने संस्कृत संभाषणाच्या प्रयत्नांना प्रारंभ केला. त्या वेळी केवळ सहा महिन्यांच्या असलेल्या आपल्या मुलापासून (ऍड. मल्हार) त्यांनी सुरुवात केली. डॉ. प्रा. गुणाकर (नानासाहेब) पिंपळापुरे आणि डॉ. के. रा. जोशी या दोन विद्वानांची मदत घेऊन एक-एक वाक्य घेऊन व त्याचा अनुवाद करीत चिकाटीने प्रयत्न चालू ठेवले. पण लवकरच व्याकरणाचा पद्धतशीर अभ्यास नसल्यामुळे हे ज्ञान फारच तुटपुंजे असल्याची जाणीव झाली. मग दुसऱया मुलाच्या (शशांक) जन्माच्या वेळी त्यांनी संस्कृत घेऊन एमए केले. अर्थात या सर्व खटापटीला एलएडी कॉलेजला इतिहास अध्यापिका असलेल्या नंदा विश्वरूपे या सुविद्य पत्नीची तितकीच मोलाची साथ मिळाली. पुढे मुले मोठी होत असताना घरात शिरले की, संस्कृतमध्येच बोलायचे हा दंडक घातला. आजही वकील असलेले मल्हार व उद्योजक असलेले शशांक हे संस्कृतमध्येच संभाषण करतात.

काही वेळा हेवा वाटावा असे हे कुटुंब आहे. कारण यांना सुनासुद्धा दुधात साखरेने विरघळावे तशा मिळाल्या. मल्हारची पत्नी शिल्पा असिस्टंट प्रोफेसर, तर शशांकची पत्नी सुवर्णा संस्कृतमध्ये एमए आहे. स्वाभाविकच नातवंडेसुद्धा घरात आली की, संस्कृतमध्ये बोलतात. एकूण ‘कुटुंब रंगलय संस्कृतात’ असे म्हणता येते.

एकदा गंमत झाली. आता फिजिओथेरपिस्ट असलेली शशांकची कन्या ऐश्वर्या ही बालकमंदिरात असताना तिची मान आखडल्यामुळे दुखत होती. तिचे रडणे बघून शिक्षिकेने कारण विचारताच तिने ‘‘माझ्या ग्रीवेत पीडा होते आहे’’ असे सांगितल्यावर काहीच न कळल्यामुळे गांगरलेल्या शिक्षिकेने घरी फोन केला. शशांक तातडीने शाळेत गेले. कन्येने बाबांना ‘‘मम ग्रीवे पीडा भवति’’ असे सांगितले. त्यावर शशांकने मानदुखी आहे असे सांगितल्यावर शिक्षिकेचा जीव भांडय़ात पडला. यावर घरी एक निर्णय घेण्यात आला की, मुलांची आजी त्यांच्याशी मराठीत बोलेल व अन्य सगळे जण संस्कृतमधून. त्यामुळे दोन्ही भाषांचा सराव राहील. त्यामुळे मराठी ही आमची मातृभाषा, तर संस्कृत ही पितृभाषा असल्याचे थट्टेने शशांक सांगतात.

प्रा. विश्वरूपेंचे ऋग्वेदाचा कालनिर्णय, आर्यांचे मूळ वसतिस्थान व संस्कृत ही सर्व भाषांची जननी हे अभ्यासाचे आणि तळमळीचे मुख्य विषय होते. तसेच कापूस व स्वस्तिक हे कसे भारतातून विदेशात गेले या विषयावरसुद्धा त्यांनी प्रचंड काम केले आहे. त्यांच्या संगणकात यातील बऱयाच गोष्टींच्या नोट्स आम्हाला पाहता आल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत अनेक विषय समजून घेण्याचा आनंदानुभव आम्ही अनेक वेळा घेतला आहे. त्यांचे काम ग्रंथरूपाने येणे ही खरी श्रद्धांजली ठरेल.

[email protected]