
अमित घोडेकर,[email protected]
हल्ली मुलं खेळ खेळायला एकत्र जमतात… नाही… नाही… सुखावून जाऊ नका… खोखो, कबड्डीसाठी नव्हे… तर पबजी खेळायला…
अँग्री बर्ड्स, सब वे सर्फर, टेंपल रन, कॅण्डी क्रश, लुडो आणि आता पबजी ही नावं कसली आहेत हे कुणाला सांगायला नको. कारण ही नाव अगदी लहान मुलांच्याही तोंडपाठ झाली आहेत. मोठे तर मोठे अगदी शाळकरी मुलंसुद्धा ‘ए उद्या 11 वाजता पबजी खेळायचं बरं का, घरी कोणी नाही’ अस सांगून गेम खेळायचं वेळापत्रक बनवून ठेवतात. हा गेम म्हणजे कुठला मैदानी खेळ नाही बरं का… नाहीतर तुम्हाला वाटायचं की मैदानावर जाऊन विटीदांडू किंवा कबड्डी, खोखोसारखा एखादा खेळ असेल हा, पण नाही. पबजी हा आहे मोबाइलवर खेळला जाणारा एक ऑनलाइन गेम… आणि सध्या सगळं जग या गेमच्या प्रेमात पडलं आहे.
गेल्या वर्षी लहान मुले कशी ‘ब्लू व्हेल’ नावाच्या गेम्सना बळी पडली होती? त्यात अनेक लहान मुलांचा हकनाक जीवदेखील गेला आहे. आता या सगळ्यात एक नवीन गेम आला आहे तो म्हणजे पबजी. हा पबजी म्हणजे हळूहळू विषबाधा होण्यातला एक प्रकार आहे. हा गेम म्हणजे मल्टीप्लेयर या प्रकारातील गेम आहे.
संगणक तसेच खऱयाखुऱया माणसाबरोबर खेळत असता तो इतका लोकप्रिय झाला की लोक एकमेकांचा वेळ किंवा अपॉइंटमेंट घेऊ लागले आणि हा गेम खेळू लागले. हा गेम एवढा भयंकर आहे की लोकांना जेवण, झोपणे, अगदी नैसर्गिक विधींचाही विसर पडला आहे. अनेक लोक तासनतास भ्रमिष्टासारखे हा गेम खेळत असतात.
हिंदुस्थानात एकजण नुकताच हा खेळ सतत 10 दिवस खेळत होता. त्याने त्यातील बऱयाच पायऱया पार केल्या, पण अखेर 10 दिवसानंतर या व्यक्तीचे मानसिक संतुलन एवढे बिघडले की त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. या घटनेमुळे त्याच्या घरातील लोकांना प्रचंड धक्का बसला आहे.
अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये गेम खेळणारी व्यक्ती त्या गेमच्या मायाजाळात एवढी अडकून जाते की आपल्या आजूबाजूला घडणाऱया सगळ्या गोष्टी ती विसरून जाते आणि गेमलाच खरे आयुष्य समजून तसेच करत राहते.
गेल्या वर्षी खरं तर ‘ब्लू व्हेल’ हा गेम आपल्यासाठी सावधगिरीचा एक संदेश होता, पण त्यापासून अजूनही कुणी काहीही शिकलेले नाही. हे पबजीमुळे दिसून येते. अजून तरी पबजीमुळे कोणत्याही व्यक्तीचा जीव गेलेला नाही, पण आभासी जगातील गेमच्या मायाजाळात किती अडकायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे. यातून जर लवकर बाहेर पडलो नाही तर मात्र आपलं काही खरं नाही.





















































