
>> प्रशांत गौतम
डॉ. आर. बी. तथा रघुनाथ भास्कर भागवत, हे मराठवाडय़ाच्या वैद्यकीय क्षेत्राचे पितामह होते. शिस्तप्रिय, मितभाषी आणि सचोटीने वागणारे एक ऋषितुल्य असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आपण गमावला आहे. वैद्यक क्षेत्रात, डॉक्टर, मित्र व विद्यार्थी परिवारात ते ‘आरबी’ या लघु नावानेच जास्त प्रसिद्ध होते. त्यांचा मूळ ‘पेशा’ हा वैद्यक क्षेत्राचा असला तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक शिस्तप्रिय शिक्षक, उत्तम खेळाडू, कुस्तीपटू, बॅडमिंटनपटू, संगीताचे मर्मज्ञ जानकार रसिक असे अनेक पैलू दडलेले होते. मध्य प्रदेशात इंदौर येथे 20 जून 1930 साली जन्म झालेल्या आर.बी.चे बालपण व शिक्षण पुण्यात झाले. 1957 ते 1960 या कालावधीत त्यांनी पुण्यात मानद फिजिशियन म्हणून सेवा दिली. त्याच वर्षी ते संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) रुजू झाले. 1965 मध्ये ते प्रोफेसर व मेडिसिनचे विभागप्रमुख होते. 1984 साली त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. निरामय आयुष्यासाठी ते वयाच्या नव्वदीपर्यंत सायकल वापरत असत. संभाजीनगर शहरातील सार्वजनिक कार्यक्रमांनाही त्यांची आवर्जून हजेरी असायची. सार्वजनिक कार्यक्रमासाठी ते सायकलवरच येत असत. 1960 साली ते संभाजीनगरात आले आणि आपल्या मितभाषी मृदू स्वभावाने ते शहरातीलच एक बनून गेले. डॉ. आर. बी. आपल्या कामात किती एकरूप होते याची एक भावपूर्ण आठवण त्यांचे अनेक विद्यार्थी आजही सांगतात. 1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात सात सप्टेंबर रोजी त्यांचे बंधू स्कॉड्रन लिडर सुरेशचंद्र भागवत यांना वीरमरण आले. त्याची तार घाटीत पोहचली. डॉ. भागवत त्या वेळी वर्गावर शिकवत होते. तार त्यांच्या सहकाऱयाने सरांच्या टेबलावर ठेवली. त्यांनी वाचून तशीच खिशात ठेवली आणि तासिका पूर्ण केली. त्यानंतरच ते वर्गाबाहेर पडले. सेवानिवृत्तीनंतर भागवत यांनी आपले डॉक्टर आणि उद्योग क्षेत्रातील मित्रांना एकत्र आणून, कमलनयन बजाज हॉस्पिटल उभारणीत फार मोठे योगदान दिले. बजाज रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होते. आर. बी. हे डॉक्टरांचेही मार्गदर्शक होते. त्यांचा विद्यार्थी परिवार खूप मोठा होता. 1977 मध्ये त्यांच्या अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून भागवत यांना तिकडे निमंत्रित करून मोठा सन्मान, सत्कार केला होता. संभाजीनगरात सांगीतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी रसिक नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून त्यांनी बसवराज, राजगुरू, मल्लिकार्जुन मन्सूर, प्रभूदेव सरदार, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, परवीन सुलताना, किशोरी अमोणकर, मालिनी राजूरकर यांच्या बहरदार संगीत मैफलींचे आयोजन केले होते. डॉ. भागवत आपल्या महाविद्यालयीन जीवनात चांगले कुस्तीपटू होते. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या सोबत कुस्ती खेळण्याची एक संधी मिळाली होती. बॅडमिंटन या खेळप्रकारात त्यांना उत्तम गती होती. रोटरीच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रमांशी जोडले गेले होते. 1980 – 81 च्या सुमारास त्यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला होता. 2009 साली त्यांचे ‘हे तो प्रचितीचे बोलणे’ या शीर्षकाचे आत्मकथन प्रसिद्ध झाले. ‘सृजनाचा सोहळा’ या पुस्तकात डॉ. भागवत यांचे व्यक्तिमत्त्व, कार्य आणि प्रवासावर आधारित डॉ. उर्मिला चाकूरकर यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. आपल्या विद्यार्थ्याने ज्ञानपिपासू व्हावे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. एवढा गंभीर प्रकृतीचा माणूस हा जीवनाकडेही खेळकर दृष्टीने बघायचा. खेळकरपणेच ते जीवनाचे तत्त्वज्ञानही अगदी सहज सांगत असत. शरीर हे एक इन्स्टमेंट आहे. फिट राहिले तरच आपण रुग्णांना व्यवस्थित न्याय देऊ शकू. यानुसार आचार्य भागवतही शरीराने वयाच्या 92 व्या वर्षी तंदुरुस्त होते.’ खरोखरच त्यांच्या जाण्याने आपण ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे.





























































