आभाळमाया – अवकाशयानाचा पुन्हा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक , [email protected]

अवकाशस्थ गूढरम्य्य गोष्टींची चर्चा करीत असताना मध्येच एक चांगली बातमी आली. हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ‘आरएलव्ही-एलईएक्स’ म्हणजे ‘रियुजेबल लाँच व्हेईकल’चं ‘लँडिंग एक्स्पेरिमेंट‘ 2 एप्रिलच्या सकाळी 7.10 ते 7.40 या अर्ध्या तासात कर्नाटकातील चित्रदुर्ग विमानतळावर यशस्वीरीत्या पार पडलं. ‘इस्रो’च्या यशात त्यामुळे नव्याने भर पडली.

शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाणाचा वापर करून अवकाशात यानं सोडण्याचं वैज्ञानिक काwशल्य रशियाचा ‘स्पुटनिक’ हा कृत्रिम उपग्रह 4 ऑक्टोबर 1957 ला अवकाशात पृथ्वीभोवती परिक्रमा करू लागला तेव्हाच सिद्ध झालं. त्यानंतर अशाच अग्निबाणांचा वापर करून पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सेपंदाला 11 किलोमीटर वेगाने भेदून अवकाशात उपग्रह सोडण्याची स्पर्धाच रशिया आणि अमेरिकेत सुरू झाली. ते लोण मग जगभर पसरलं. आधुनिक जगात आधुनिक तंत्रज्ञान लपून राहत नाही. दडवून ठेवताही येत नाही. इथपर्यंत (म्हटलं तर) ही प्रगती झाली आहे. त्यामुळे ज्याला ‘स्पेस प्रोग्राम’ आर्थिकदृष्टय़ा परवडेल त्या देशाला अन्नधान्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंत स्वयंपूर्ण होण्याशिवाय गत्यंतरच नाही. एकाच वेळी अनेक गोष्टींमधल्या आधुनिकतेकडे लक्ष द्यावं लागतं. अन्यथा देश काळाच्या मागे राहतो.

गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आपली अवकाश संशोधन करणारी ‘इस्रो’ ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. एकेकाळी रशियाच्या सहाय्याने का होईना, आपला अंतराळवीर राकेश शर्मा यांना अवकाश सफर घडवून आणण्याचा निर्णय सरकारने 1984 मध्ये घेतला आणि ज्याला आपण ‘मोराल बूस्टिंग‘ किंवा देशाचा आत्मविश्वास वाढवणारी ती घटना ठरली. त्यानंतर आपण स्वतः उत्तम दर्जाचे अग्निबाण (रॉकेट) आणि कृत्रिम उपग्रह बनवून अवकाशात सोडू लागलो. इतपंच नव्हे तर प्रगत समजल्या जाणाऱया देशांचेही उपग्रह अवकाशात योग्य कक्षेत स्थिर करण्याचं प्रावीण्य आपल्या संशोधकांनी दाखवलं. आता तर एकाच वेळी 104 कृत्रिम उपग्रह आपण 23 फेब्रुवारी 2023 रोजी अवकाशात सोडून एक वेगळाच ‘पराक्रम’ केला. ‘इस्रो’च्या स्थापनेपासूनच्या काळात देशात अनेक सरकारं आली, पण आपला ‘स्पेस प्रोग्राम’ दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत गेला.

चांद्रयान-2 ला शेवटच्या क्षणी आलेलं अपयश पचवून ‘इस्रो’ पुन्हा नव्या जोमाने कार्यरत झाली आहे. चंद्रावर माणूस पाठवणे, सूर्याजवळच्या कक्षेत यान पाठवणे किंवा मंगळाच्या मोहिमेची आखणी करणे अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे.

यापुढच्या काळात अवकाशात केवळ अमुक ठिकाणी यान गेलं. एवढय़ावरच न थांबता प्रायोगिक अवकाश कार्यक्रमाला जगभर आता ‘व्यावसायिक’ स्वरूपही येत आहे. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात ‘नासा’ सातत्याने अवकाश संशोधनात गुंतलेली असतानाच इलान मस्क यांच्यासारखे महत्त्वाकांक्षी उद्योजक (‘टेस्ला’ कारवाले) आता अंतराळ काबीज करायला निघालेत. चंद्र-मंगळावर वसाहती करणं कितपत शक्य होईल ते काळ ठरवेल आणि इथे जाऊनही माणूस नावाचा प्राणी पृथ्वीवर चाललंय तसंच वर्तन करीत राहिला तर त्या ग्रहांचं कठीणच.

गंमत जाऊ द्या, पण परग्रहावरच्या कायमी वसाहतींपेक्षा अंतराळ संशोधनाचे अनेक फायदे आहेत. ते नाकारता येणार नाहीत. थेट परग्रहावरची वसाहत हा बराच पुढचा टप्पा असला तरी इच्छुक प्रवाशांना अंतराळात फेरफटका घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चाललेत. त्यासाठी अवकाशात जाऊन पृथ्वीवर परत येणारी यानं लागतील. तशी ती अमेरिकेकडे आहेतच, पण आता आपणही ‘हायपरसॉनिक’ आणि ‘लँडिंग एक्सपेरिमेंट’द्वारे अंतराळात सोडलेलं यान सुखरूप पृथ्वीवर परत आणण्यात यश मिळवलंय.

याचे दोन टप्पे होते. आपलं पहिलं यशस्वी यान आरएलव्ही टीडी म्हणजे ‘रियुजेबल लाँच व्हेईकल’ 23 मे 2016 रोजी ‘इस्रो’ने अवकाशात पाठवलं. मात्र ते पारंपरिक रॉकेट ‘बुस्टर’च्या प्रेरणेने अंतराळात 56 किलोमीटर दूर गेलं. नंतर बुस्टर सुटल्यावर त्याची झेप 65 किलोमीटरपर्यंत गेली. साधारण तेरा मिनिटांच्या या वेगवान यशस्वी प्रयोगानंतर हे पुनर्वापरायोग्य यान बंगालच्या उपसागरात ठरल्या जागी सुखरूप उतरलं (अगदी अलीकडे अमेरिकेचं चांद्रयान उतरलं तसंच), परंतु समुद्रात ‘स्प्लॅश-डाऊन’ झाल्यावर अंतराळयात्रींना बोटीतून किनाऱयावर आणावं लागतं.

यावर उपाय म्हणून थेट जमिनीवरच उतरणारं यान उत्तम. आपल्या अशाच ‘रियुजेबल लँडिंग एक्स्पेरिमेंटने 2 एप्रिल 2023 रोजी यश प्राप्त केलं. हे अंतराळयान एका हेलिकाप्टरद्वारे उंच (4-5 कि.मी.) नेण्यात आलं. तिथे त्याचं या हेलिकॉप्टरपासून विलगीकरण झाल्यावर कॉम्प्युटर कमांड मिळताच ते स्वयं दिशाचलित (ऑटोनेव्हिगेशन) होऊन वेगाने यशस्वीपणे चित्रदुर्ग विमानतळावर परतलं. ही दोन्ही यानं मानवविरहित होती. त्यांचं उड्डाण यू-टय़ूबवर पाहायला मिळतं. यापुढचा काळ वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने देशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सर्वसामान्यांमध्येही सर्वंकष वैज्ञानिक दृष्टी आली तर आपल्या पुढच्या पिढय़ांना ते फायदेशीर ठरेल.