
>> वैश्विक, [email protected]
दुर्बिणीतून शनी ग्रह एकदा पाहणारे आमचे प्रेक्षक त्याचं विलोभनीय, वलयांकित (कडी असलेलं) रूप पुनःपुन्हा पाहायला उत्सुक असतात. कदाचित त्यांच्या मनातली शनीबद्दलची ‘धास्ती’ ओसरलेली असते. खगोल अभ्यासातला शनी ग्रह आहेच तसा सामान्य प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा आणि संशोधकांना आव्हान देणारा! हा शनीसुद्धा पहिल्यांदा दुर्बिणीतून पाहिला तो गॅलिलिओनेच. त्याच्या पश्चात दुर्बिणींमध्ये कितीतरी बदल झाले आणि शनीचं खरं स्वरूप हळूहळू उलगडत गेलं. आपल्याकडे प्राचीन काळी झालेल्या खगोल अभ्यासात काही ग्रहांचं वर्णन योग्य प्रकारे येतं. उदाहरणार्थ, तेजस्वी दिसणाऱया ग्रहाला शुक्र, सर्वात मोठय़ा ग्रहाला गुरू आणि हळूहळू चालणाऱया (शनैः शनैः चरति सः) ग्रहाला ‘शनैश्चर’ असं नाव देण्यात आलं. राहू-केतू बिंदू असल्याची कल्पना भास्कराचार्यांना होती. अर्थात सूर्य तारा आहे. पृथ्वी सूर्यमालेतला तिसरा ग्रह आहे आणि शनीपलीकडेही युरेनस, नेपच्यून आणि मंडळी आपल्या सौरसंकुलाचे सभासद असून चंद्र केवळ उपग्रह आहे याची कल्पना नव्हती.
खगोलशास्त्र्ााला आधुनिक गणिती आणि दुर्बिणीद्वारे प्रत्यक्ष निरीक्षणाचं परिमाण लाभल्यावर पूर्वीच्या संकल्पनांमध्ये बरेच बदल झाले. तसे टॉलेमी, कोपर्निकस यांच्याही नोंदीबाबत झालेच.
1957 मध्ये माणसाने रशियन स्पुटनिक – 1 च्या यशस्वी प्रयोगातून अंतराळही पादाक्रांत करायला सुरुवात केल्यावर त्या भरारीने न थबकणारी गती घेतली. अनेक देशांचे कृत्रिम उपग्रह आणि यानं आज अवकाशगामी झाली आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जे स्वप्नवत वाटत होतं असं अपूर्व यश माणसाला अंतराळ प्रवास आणि संशोधनाबाबत लाभलं आहे. मात्र तो विराटाचा धांडोळा घेताना आपलाच ग्रह आपल्याला सुरक्षित ठेवता आला नाही तर ती अवघ्या जीवसृष्टीची शोकांतिका ठरेल. पुढे नेमपं काय घडेल ते आताच सांगणं कठीण, पण संशोधक मात्र त्यांचं काम चोख करत असतात.
1959 मध्येच अमेरिकेला पृथ्वीपलीकडच्या दूरच्या ग्रहांचा खूप जवळ जाऊन अभ्यास करण्याची स्वप्नं पडू लागली. त्यात रशियावर मात करण्याचा हेतू असला तरी संशोधन हे संशोधनच असतं. त्यामुळे वैज्ञानिक उत्साहाने कामाला लागले आणि पायोनियर-10 आणि 11 ही याने ग्रहमालेच्या इतिहासातली गुरू-शनीपर्यंत गेलेली पहिली यानं ठरली. अर्थात संकल्पना प्रत्यक्षात येण्यात बराच काळ लोटला होता. केप कार्नेव्हल येथून पायोनियर – 11 हे यान अवकाशात झेपावले ते 26 एप्रिल 1973 रोजी.
या यानावर जी उपकरणं बसवली होती, त्यामध्ये या दूरस्थ ग्रहांचं मॅग्नेटिक फिल्ड, दोन ग्रहांच्या मधल्या भागातलं अंतराळी द्रव्य, सौर वाऱयांचा परिणाम, शनिकडय़ांचे अंतरंग, या बलाढय़ ग्रहांचे चंद्र अशा अनेक गोष्टींची नोंद करणारी यंत्रणा बसवली होती. शनीची एकूणच वलयांकित रचना कशी आहे हे खूप जवळून न्याहाळायचं होतं. अंतराळी इतिहासातला हा खूपच महत्त्वाचा टप्पा होता. पृथ्वी सोडल्यावर मंगळाला परिक्रमा करून या लाल (अंगारक) ग्रहाचं जवळून दर्शन आणि नोंद झाल्यावर पायोनियर – 11 चं यश अधोरेखित होऊ लागलं. मात्र त्यापूर्वी पोचलेलं पायोनियर – 10 हे यान गुरूचा वेध घेतच होतं. 1974 मध्ये गुरूजवळून तर 1979 मध्ये ते शनीजवळ पायोनियर – 11 पोचलं. ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याही वेळीच दुरुस्त करण्यात आल्या. पायोनियर – 11 ने शनीची कडी खूपच जवळून पाहिली, अभ्यासली. 1सप्टेंबर 79 रोजी त्याने शनीचा ‘जीनस’ हा चंद्र पाहिला. त्यापासून हे यान केवळ 2500 किलोमीटर अंतरावर गेलं होतं. पायोनियर 10 काय पिंवा 11 काय, या यानांचा दूरस्थ प्रवास अवघडच होता. मात्र उत्तम तंत्रज्ञानाने एक मोठं यश ‘नासा’ला मिळालं आणि जगाला शनी ग्रहाविषयी प्रचंड माहिती मिळाली. तब्बल 22 वर्षे या यानाचं निरीक्षणाचे कार्य सुरू होतं. अखेर 29 सप्टेंबर 1995 रोजी नासाने हा यशस्वी प्रकल्प थांबवला. यान मात्र त्याला मिळालेल्या अक्षय गतीच्या बळावर पुढे जातच राहिलं. 2019 मध्ये ते ढाल पिंवा ‘स्कटम’ या तारकासमूहाच्या दिशेने जात असल्याची नोंद झाली. त्याला इतर कोणत्याही अवकाशी वस्तूचा अवरोध होत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास असाच सुरू राहील.






























































