स्मरण – सत्यजीत रे, चतुरस्र प्रतिभा आणि वास्तववादी दिग्दर्शक

>> आदिनाथ हरवंदे

सत्याजित रे म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो ‘पाथेर पांचाली’ हा चित्रपट. ‘पाथेर पांचाली’ आणि सत्यजित रे हे वेगळे होऊच शकत नाही. 2 मे 1921 हा त्यांचा जन्मदिवस. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजिता’ आणि ‘अपूर संसार’ ही चित्रपट त्रिधारा आणि सिनेसृष्टीतील योगदान कायम स्मरणात ठेवण्यासारखे आहे.

हिंदुस्थानी जीवनाचं वास्तववादी दर्शन घडवणारा पहिला चित्रपट निर्माता दिग्दर्शक ‘सत्यजीत रे’ यांचा जन्म 2 मे 1921 रोजी झाला. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. सुकुमार व सुप्रभा यांचा हा मुलगा. त्यांचे पितृछत्र वयाच्या तिसऱया वर्षी हरपलं, परंतु आईने निग्रहाने मुलाला शिकवलं. कोलकाता विद्यापीठातून बी. ए.ची पदवी मिळवल्यावर आईने आग्रहाने सत्यजीत यांना शांतिनिकेतन या विश्वभारती विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठवलं. तिथं त्यांना प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस आणि बिनोद मुखर्जी यांच्या कलेबद्दल सखोल ज्ञान प्राप्त झालं. त्यावेळी त्यांनी अजंठा, वेरुळ आणि एलिफंटा या स्थळांना भेटी दिल्यानंतर हिंदुस्थानी कलेविषयी कौतुक आणि स्वाभिमान वाढला.

शांतिनकेतनमधून एम. ए.ची पदवी संपादन करून परतल्यानंतर 1943 मध्ये डी. जे. केमर जाहिरात कंपनीत व्हिज्युअल डिझायनरपदी नोकरी मिळाली. कामाचा आनंद लुटत असताना नोकरी सांभाळून डी. के. गुप्तांच्या सायनेट प्रेसमार्फत प्रकाशित पुस्तकांचं मुखपृष्ठ डिझाईन करण्याचं कामही मिळालं. त्यातील विशेष उल्लेखनीय जवाहरलाल नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे होतं. या काळात त्यांच्याकडे विभुतीभूषण बंडोपाध्याय यांचं ‘पाथेर पांचाली’ हे पुस्तक मुखपृष्ठ डिझायनिंगसाठी व रेखाचित्र काढण्यासाठी आलं. ती कादंबरी वाचून रे फार प्रभावित झाले. त्यांच्या नजरेसमोर चित्रपटासारखे प्रसंग तरळू लागले. ते मनात घोळू लागले. 1949 मध्ये त्यांची दीर्घकाळाची प्रेयसी बिजोया दास यांच्याशी ते विवाह बंधनात अडकले. त्याच वर्षी फ्रेंच दिग्दशर्क जीन रेनॉयर ‘द रिव्हर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हिंदुस्थानात आले. रे यांनी त्यांना ग्रामीण भाग निवडण्यासाठी सहाय्य केलं. यादरम्यान त्यांनी मनात ठाण मांडून बसलेली ‘पाथेर पांचाली’ हा चित्रपट काढण्याची आकांक्षा बोलून दाखवली. रेनॉयर यांना ती कल्पना आवडली.

1950 साल उगवलं. डी. जे. केमर यांनी रे यांना सहा महिन्यांसाठी लंडन इथल्या मुख्य कार्यालयात पाठवलं. या कालावधीत रे यांनी 99 चित्रपट पाहिले. यापैकी इटालियन निर्माता इरकोल ग्रॅझयादी यांच्या ‘बायसीकल थीव्ह्ज’ हा चित्रपट पाहून बाहेर पडताना सत्यजित रे यांचा चित्रपट निर्माता होण्याचा दृढनिश्चय झाला.

अखेर 1955 मध्ये ‘पाथेर पांचाली’ चित्रपटाद्वारे रे यांची स्वप्नपूर्ती झाली. खरं म्हणजे तेव्हापासून रे यांच्या या कलात्मक प्रवासास सुरुवात झाली. ‘पाथेर पांचाली’
चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शक, प्रसिद्धी अशा अनेक जबाबदाऱया त्यांनी सार्थपणे आणि यशस्वीपणे पार पाडल्या. रे यांच्या या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पारितोषकासह 11 आंतरराष्ट्रीय पारीतोषकं मिळाली. ‘पाथेर पांचाली’ नंतर ‘अपराजीतो’ आणि ‘अपूर संसार’ अशी अपूची त्रिधारा निर्माण झाली. ‘पाथेर पांचाली’ चित्रपटात अपूचा जन्म होतो. अपूचं बालपण, त्याचं दुर्गा, ठाकूरणशी असलेलं नातं असं बराच काही आपल्याला यात दिसतं. गरिबी तर त्याच्या शेवटपर्यंत त्याची सोबत करते. याचा पुढचा कथा भाग ‘अपराजितो’ या चित्रपटात येतो. गरिबी संपत नाही. त्याचे वडील हरिहरच्या मृत्यूनंतर अपू आणि आई सरबजया बंगालमधील गावात परततात. पण शेवटी अपूचा एकटयाचा प्रवास सुरूच राहतो. ‘अपूर संसार’ (1959) (The World of Apu) हा त्रिधारेतील अखेरचा भाग. अपूचा लेखक व्हायचा प्रयत्न यात उलगडला आहे. एका विचित्र प्रसंगामुळे त्याला विवाहबद्ध व्हावं लागतं. वैवाहिक आयुष्यात संकट कोसळत आणि तो पुन्हा एकात पडतो.

या तिन्ही चित्रपटाचं जगभर कौतुक झालं. अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. चित्रपट बनताना अनेक आर्थिक संकटांशी रे यांना सामना करावा लागला. ‘पाथेर पांचाली’ साठी भांडवल जमवताना रे यांच्या नाकीनऊ आले होते. पैसे पुरवणारे निर्माते त्यांना अनेक बदल सुचवायचे, परंतु रे बंदोपाध्याय यांच्या कथेवर, पटकथेवर ठाम राहिले. अगदी बंगाल शासनाने आर्थिक सहाय्य देताना ‘हरिहरचे कुटुंब शासकीय विकास कामात सामील होतं’, असा गोड शेवट सुचवला, पण रे यांच्या ठामपणामुळे शासनही नमलं.

सत्यजित रे यांच्या चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा विशिष्ट समाजातील होत्या. त्यांच्या अनेक गोष्टी मनाला भिडतात. काही नवं, वेगळं असं त्या सांगू पाहतात. समाजातील स्त्रीचं खरं प्रतिनिधित्व त्या करतात म्हणूनच ‘पाथेर पांचाली’तील कंबरेत वाकलेली आणि सुरकुत्यांचं जाळं असलेली इंदिर ठाकरून ही वृद्धा मनात कायम घर करून राहते. ‘महानगर’, ‘नायक’, ‘कापुरुष’, ‘समाप्ती’, ‘तीन कन्या’, ‘चारुलता’, ‘अशानी संकेत’, ‘जलसाघर’ या चित्रपटातील नायिका अनेक अडचणी आणि रूढी या बंधनात अडकलेल्या दिसतात, परंतु या सर्व स्त्रिया सामाजिक भाष्य करतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या