पृथ्वीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल!

193

>> शैलेश माळोदे

भूगर्भशास्रज्ञ डॉ. के. स. वाल्दिया. पृथ्वीच्या गर्भातील अनेक गोष्टी लोकहितार्थ कशा वापरता येतील याचा अखंड ध्यास या वैज्ञानिकांनी घेतला आहे.

माझा जन्म 20 मार्च 1937 रोजी देवसिंग वाल्दिया आणि नंदा वाल्दियांच्या पोटी कलाव, म्यानमार येथे झाला. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आम्ही सर्वजण आमच्या पिठोरगडला परतलो. शालेय शिक्षण पिठोरगड येथेच पूर्ण झालं. त्यानंतर बी.एस्सी., एम.एस्सी. आणि पीएच.डी. या सर्वांसाठी मी लखनौ विद्यापीठात दाखल झालो आणि महत्त्वाचं म्हणजे मी 1957 साली विद्यापीठात फॅकल्टी म्हणूनही काम करू लागलो’’ टिपिकल पहाडी व्यक्ती ज्या शांत, संयत आणि थेटपणे एखाद्याविषयी माहिती सांगेल अशीच सुरुवात खड्गसिंग वाल्दिया ऊर्फ डॉ. के. एस. वाल्दिया या हिंदुस्थानच्या एका अत्यंत ज्येष्ठ आणि नावाजलेल्या भूशास्त्रज्ञांनी (जिऑलॉजिस्ट) यांनी मनमोकळय़ा गप्पा मारण्यास सुरुवात केली.

डॉ. के. एस. वाल्दिया यांना संस्था निर्माता म्हणून आपल्या देशाच्या इतिहासात आणखी एक वेगळं स्थान आहे. त्यांचा सहभाग वाडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी, सेंट्रल हिमालयन एन्व्हायर्नमेंटल असोसिएशन नैनीताल, जी.बी. पंत इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन एन्व्हायर्नमेंट ऍण्ड डेव्हलपमेंट, अल्मोडा आणि कुमाऊं विद्यापीठाच्या भूशास्त्र्ा विभागाच्या स्थापनेत खूप मोठा आहे. पृथ्वी विज्ञानातील विविध अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच डॉ. वाल्दिया पीएच.डी. विद्यार्थी, पोस्ट डॉक्टरल स्कॉलर्स आणि इतर संशोधकांना मार्गदर्शन करताना आनंद उपभोगत आहेत.

संशोधनाविषयी बोलताना डॉ. वाल्दिया म्हणाले, देशात भूशास्त्रात संशोधनास खूप वाव असून या क्षेत्रातील संशोधन देश विकासासाठी खूपच महत्त्वपूर्णदेखील आहे. इतकं प्रचंड वैविध्य असलेल्या भूभागाचं अध्ययन होणं – आणि तेही अद्ययावतरीत्या – गरजेचं आहे. डॉ. वाल्दिया यांनी आतापर्यंत 110 संशोधन शोध निबंध, 16 पुस्तके लिहिली असून 9 पुस्तकांचं संपादनही केलंय. त्याचबरोबर त्यांनी हिंदी भाषेतून 40 पेक्षा जास्त लेखही लिहिले आहेत. ‘एक थी नदी सरस्वती’ हे त्यांचे हिंदी भाषेतलं पुस्तक सरस्वती नदीच्या भूशास्त्रीय अभ्यासाच्या हिंदी मांडणीकरिता खूपच महत्त्वाचं आहे. 1983 ते 88 या काळात ते पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य होते.

प्लेट टेक्टॉनिक्स आणि पर्यावरणय भूशास्त्र या विषयात ते जागतिक दर्जाचे तज्ञ मानले जातात. डॉ. के. एस. वाल्दिया यांनी कुमाऊं क्षेत्रासहित संपूर्ण उत्तराखंडाच्या हिमालयीन क्षेत्राचा सर्वंकष अभ्यास केला असून त्यांनी चालत हजारो कि.मी. क्षेत्र पायाखाली घालून त्याचं मॅपिंग केलंय. ते म्हणतात, उत्तराखंडातील हिमालय हे अस्थिर पृथ्वीचं एक उदाहरण असून त्याविषयी योग्य काळजी घेतली न गेल्यास आपल्याला वारंवार संकटांना तोंड द्यावं लागेल. चुनखडीच्या खाणीमुळे अशाच अस्थिरतेच्या परिणामाचं भेदक चित्र आपल्यापुढे आले होते. पुढे सर्वोच्च न्यायालयाने मसुरी क्षेत्रातील हे खाणकाम करण्यावर बंदी घातली. त्यासाठी वाल्दिया यांच्या संशोधनाचाच आधार होता.

संशोधनाबरोबरच विज्ञान प्रसार प्रचारात डॉ. के. एस. वाल्दिया यांना खूप रस आहे. गेली काही वर्षे ते सायन्स आऊटरीच कार्यक्रमात सहभागी होऊन उत्तराखंडातील अत्यंत दुर्गम भागातील मुलांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कामात वयाची पर्वा न करता सहभागी होत आहेत. विविध शिक्षक आणि तज्ञांना बरोबर घेऊन ते विज्ञानाचा उपयोग, संधी आणि विविध क्षेत्रांविषयी तरुणांना उद्बोधित करीत आहेत. तसंच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शास्त्रीय क्षेत्रात कोणतं संशोधन करीयर करावं याविषयी समुपदेशनही ते करतात.

डॉ. के. एस. वाल्दिया सध्या बंगळुरू येथे स्थायिक असून जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चमध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचं स्वतःचं संकेतस्थळदेखील आहे. उत्तराखंडमधील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी सहकारी शिक्षकांना सोबत घेउैन स्कॉलरशिप्स देऊन छोटे छोटे प्रयत्न हाती घेतले आहेत. तरुण विद्यार्थ्यांना योग्य ती संधी मिळाल्यास ते नक्कीच चांगलं काम करतात याविषयी माझ्या मनात तरी कोणताही संदेह नसल्याचं सांगून डॉ. वाल्दिया यांनी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी पुढे येऊन मार्गदर्शन करण्याची निकड प्रतिपादित केली. आज वयाची 82 वर्षे पूर्ण केलेल्या डॉ. वाल्दियांचा ऩउत्साह सर्वांना, विशेषतः तरुणांना प्रेरक आहे याबद्दल वादच नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या