‘ते’ शिवसेनाप्रमुखांमुळेच शक्य झाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनंत विचारे

मी खडतर बालपण सहन केलं. इयत्ता पहिली फळसप, ता. म्हसळे, जि. कुलाबा-रायगड येथे, तर दुसरी-तिसरी मामांच्या गावी… मु. आसुफ, ता. श्रीवर्धन, जि. रायगड, कुलाबा. चौथी-पाचवी पुन्हा फळसप या मूळगावी, सहावीसाठी पुन्हा बोर्ली पंचतन (मामांचे गाव), तर सातवीसाठी चुलते शिंदेवाडी, दादर येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत. मग आठवी ते दहावीपर्यंत ह्यूम हायस्कूल, भायखळा येथे स्वतःच्या कमाईवर. पेपरवाटपाचा धंदा, रात्री वाचनालय सांभाळायचे व त्या कमाईवर शाळा व्हायची. तद्नंतर पोलीस जमादार असलेल्या चुलत्यांकडे गेलो. याच कालावधीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनारूपी वादळाची सुरुवात केली होती. त्यांच्या या वादळात परळचे तरुण सर्वश्री विजय गावकर, शरद चोचे, रघुनाथ दरेकर, मनोहर रहाटे (जेठाबाई बिल्डिंग), अरुण नायकर, चंद्रकांत वाईरकर, दत्ता जाधव (चिंचपोकळी), अशोक कुळकर्णी, विठ्ठल चव्हाण, विश्वास पाटोळे, बाळ नरे, चंद्रकांत ब्रीद (बावा) आणि मी उडी घेतली.

1968 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात शिवसेनेचे प्रथमच 28 नगरसेवक निवडून आले. त्यातील सर्वश्री विजय पर्वतकर, विजय गावकर, दादा परब, स्नेहलता कोर्डे आदी अनेक शिवसैनिक, ज्ञात- अज्ञातांनी, मराठी-हिंदूपेमींनी अनेक प्रकारे मदतीचा हातभार लावला. शिवसेना नेते दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीरभाऊ जोशी आणि अन्य नेत्यांनी आमची पाठराखण केली. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार याच कालावधीत दादा परब नगरसेवक, त्यानंतर नगरसेवक मोहन नाईक यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून कामे केली. त्यानंतर 1974-75 साली किसननगर नं. 2, वागळे इस्टेट, ठाणे येथे माझे मेहुणे भाई सावंत यांच्या सहकार्यामुळे राहण्यास आलो. तोपर्यंत रेल्वेची पाच वर्षे नोकरी झाल्यामुळे ‘इंजिनीअर’ या पदाची खातेनिहाय परीक्षा दिली.

मुंबई विभागातून परळ कारखाना, माटुंगा, कुर्डुवाडी, नागपूर, इटारसीपर्यंत सर्व कारखान्यांतून आलेल्या उमेदवारांनी परीक्षा दिली. (सन 1973) सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, त्या परीक्षेत मी प्रथम क्रमांक पटकावला; पण दुर्दैवाने मोस्ट सीनियर म्हणून मला डावलण्यात आले. पण लगेचच म्हणजे सहा महिन्यांनंतर झालेल्या परीक्षेत पास होऊन झांशी येथे इंजिनीअरिंग स्कूलमधून डिप्लोमा मिळवून जे. ई. म्हणून परळ कारखान्यातच काम करू लागलो आणि पुढे वेगवेगळय़ा पदोन्नती दिल्या. पण रेल्वेमध्ये बढती, बदलीमध्ये मराठी माणसाला डावलले जायचे. म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते 2 ऑगस्ट 1985 रोजी कारखान्यातील शिवसैनिक कामगारांच्या मदतीने मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीची परळ येथील शिरोडकर हायस्कूलमधील कार्यक्रमात स्थापना केली. परळनंतर भायखळा प्रिंटिंग प्रेस, एल. ऍण्ड टी. भायखळा, वाडीबंदर, ओपन लाइन, न्यू ऍडमिन बिल्डिंग, डी. आर. एम., जी. एम. बिल्डिंग, गार्ड मोटरमन विभाग, तिकीट तपासनीस, कुर्ला कारशेड, कल्याण कारशेड, लोको कारशेड, आय.ओ.डब्ल्यू. असा प्रवास करीत लोणावळा, पुणे, कुर्डूवाडी, सोलापूर, पंढरपूर व उत्तर दिशेला कसारा, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मनमाड ते नागपूरपर्यंत एकूण 84 युनिटमध्ये लोकाधिकार समिती कार्यरत केली. त्यामुळेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना आम्ही तेव्हा घेराव घालू शकलो होतो. त्यात यशस्वी ठरल्यावर नोकरभरतीत मराठी तरुणांना डावलणाऱ्या रेल्वे भरती मंडळावर शिवसेनेने अनेक मोर्चे काढले. याचाच परिपाक म्हणून 1988च्या भरतीत 68 टक्के मराठी तरुण भरती झाले. हे केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे, त्यांच्या आशीर्वादाने शक्य झाले.