लेख – सिलिगुडी कॉरिडॉरला नदी-समुद्र मार्गांचा पर्याय

519

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानचा ईशान्य भाग हा भूगोलाचा कैदी आहे. सध्या हिंदुस्थानातून ईशान्य हिंदुस्थानकडून जाणारा अरुंद रस्ता हा 22 किमी लांबीच्या चिकन्स नेक सिलिगुडी कॉरिडॉरमधून जातो. ज्या मार्गाला शत्रू राष्ट्रे लढाईच्या काळात बंद पाडू शकतात. या मार्गाला पर्याय म्हणून म्यानमार आणि बांगलादेशामधून आपण सागरी व्यापारास चालना देऊन या भागात नदीचे जाळे सक्रिय करीत आहोत.

ईशान्य हिंदुस्थानात मोडणारी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅण्ड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही आठ राज्ये भू-राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाची आहेत. या राज्यांनी हिंदुस्थानच्या एकूण क्षेत्रफळाचा आठ टक्के भूभाग व्यापला असून देशाची सुमारे चार टक्के लोकसंख्या येथे राहते. हा प्रदेश उर्वरित हिंदुस्थानशी जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टय़ाने जोडलेला आहे जो पश्चिम बंगाल राज्यातील सिलिगुडी जिह्यात येतो. याशिवाय या आठ राज्यांमध्ये मिळून देशाची सुमारे पाच हजार, 180 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. हा प्रदेश संपूर्णतः भूवेष्टित आहे ज्याभोवती बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि चीन असे पाच देश आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही आठही राज्ये कुठल्या ना कुठल्या देशाशी जोडलेली आहेत. म्हणून प्रत्येक पूर्वोत्तर राज्य हे शब्दशः ‘सीमावर्ती’ राज्य आहे. आज पूर्वोत्तर राज्ये संपर्क सुधारत आहेत, मात्र यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, मेहनत आणि प्रचंड संसाधनांची गरज आहे. येथे आपल्याला राजकीय औदासिन्य, प्रशासनिक अडखळे, खडतर भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक चणचण अशा चार आघाडय़ांवर लढावे लागत आहे.

ईशान्येकडील राज्यांच्या आर्थिक प्रगतीकरिता म्यानमार, बांगलादेशच्या नद्यांचा वापर करण्यासाठी हिंदुस्थान तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी ‘एम. व्ही. माहेश्वरी बोट’ कोलकाताजवळील हल्दिया बंदरातून गुवाहाटीतील पांडू बंदराकडे रवाना झाली. तिने हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स आणि अदानी विल्मारसाठी मालवाहतूक केली. या बोटीने बांगलादेशातून हिंदुस्थान-बांगलादेश नदी व्यापार मार्गावरून 1500 किलोमीटरचे अंतर 10 दिवसांत कापले. या मार्गावरून वाहतूक गेल्यामुळे हिंदुस्थानच्या ईशान्य दिशेला कनेक्टिव्हिटी नाटकीयदृष्टय़ा बदलली आहे.

हिंदुस्थान-म्यानमार मध्ये तिथल्या सिट्टवे बंदरापासून रस्ता बनवून हिंदुस्थानमधील ईशान्य हिंदुस्थानातील मिझोराम राज्यापर्यंत बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला ‘कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट प्रोजेक्ट’ (समुद्र-नदी-रस्ता मार्ग) म्हटले जाते. हिंदुस्थानच्या नकाशात पाहिल्यास ईशान्य हिंदुस्थानला समुद्रमार्गाने व्यापार करायचा असेल तर सर्वात जवळचे बंदर हे कोलकाता आहे. ते ईशान्य हिंदुस्थानच्या टोकाकडील मिझोराम, त्रिपुरापासून जवळपास 1880 किलोमीटर एवढे लांब आहे. मात्र जर आपण म्यानमारमधल्या सिट्टवे बंदरातून व्यापार केला तर ते अंतर 950 किलोमीटर इतकेच म्हणजे अत्यंत कमी होते. आर्थिकदृष्टय़ा विचार केल्यास ईशान्य हिंदुस्थानातील राज्यांचा व्यापार वाढवण्यासाठी कलादान प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे. हिंदुस्थानच्या ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांकडे पहा, या धोरणांतर्गत हा रस्ता बांधण्याचे आपण ठरवले होते, परंतु यामध्ये काही अडथळे येत होते ज्यावर आपण मात करत आहोत.

कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट

कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या कामाला जानेवारी 2019 पासून सुरुवात झाली. हिंदुस्थानच्या दृष्टीने कुठल्याही देशामध्ये असलेले हे सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्याचा शेवटचा भाग सोडला तर बाकी सगळा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. कलादान प्रकल्प हा हिंदुस्थान आणि म्यानमार या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे.

या रस्त्यामध्ये समुद्राने कोलकात्याच्या हल्दिया बंदरापासून म्यानमारमधील सिटवे बंदरापर्यंत 579 किलोमीटर एवढे आहे. त्यानंतर सिटवेपासून पलेटवा या गावापर्यंत 158 किलोमीटरचा प्रवास हा कलादान नदीतून करावा लागतो. त्यानंतर पलेटवापासून झोरीनपुरीपर्यंतचा रस्ता 110 किलोमीटरचे अंतर हे रस्ते मार्गाने कापावे लागते. झोरामपुरी हे मिझोराममधील एक म्यानमार सीमेवर असलेले गाव आहे. जिथे हा रस्ता हिंदुस्थानात प्रवेश करतो. तिथून 100 किलोमीटर अंतरानंतर हा रस्ता हिंदुस्थानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 54 ला जोडला जाईल. म्यानमारचे सिटवे बंदर पूर्णपणे तयार आहे. पलेटवा येथिल कलादान नदीवरील बंदरसुद्धा तयार आहे. मात्र पलेटवापासून झोरीनपुरीपर्यंतचा रस्ता मागे पडला होता.

ईशान्येच्या राज्यांना शेजारी देशांशी जोडल्याशिवाय त्यांचा खऱया अर्थाने विकास होणार नाही. संपूर्णतः भूवेष्टित असल्यामुळे बाह्य जगताशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आजूबाजूच्या देशांतूनच जावे लागणार ही निकड ओळखून सरकारने त्या दिशेने पावले उचलली. 1991 सालापासून अस्तित्वात असलेल्या ‘लुक ईस्ट’ धोरणाचे 2015 मध्ये ‘ऍक्ट ईस्ट’मध्ये रूपांतर केले ज्यायोगे हिंदुस्थानच्या पूर्वेकडील शेजारी देशांशी संबंधांत अभूतपूर्व वृद्धी झाली. पूर्वेकडील संपर्कता प्रकल्पांमध्ये मुख्यतः हिंदुस्थान-म्यानमार-थायलंड त्रिराष्ट्रीय महामार्ग, कलादान ‘मल्टिमोडल’ प्रकल्प, रिह-तिदिम महामार्ग, गंगा-ब्रह्मपुत्रा जलवाहतूक, बीबीआयएन (बांगलादेश-भूतान-इंडिया-नेपाळ) कॉरिडोर यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. यामागची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे पूर्वोत्तर राज्यांचा सभोवतालच्या प्रदेशाशी संपर्क प्रस्थापित करणं, नेपाळ-भूतानसारख्या भूवेष्टित, दुर्गम आणि डोंगराळ देशांसाठी सागरी बंदरांकडे जाण्याचा मार्ग सुकर करणे आणि दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांबरोबर व्यापार व निवेश वाढवणे. याचबरोबर आगरतळा आणि बांगलादेशचं प्रसिद्ध बंदर चितगाव यांना जोडणारी रेल्वे बांधण्याचे कामदेखील हिंदुस्थान-बांगलादेश एकत्र येऊन करत आहेत. जेणेकरून पूर्वोत्तर राज्यांना बंगालच्या उपसागराशी जोडणारा अजून एक सुगम व स्वस्त पर्याय उपलब्ध होईल.

काही रस्त्यांना म्यानमारच्या आराकान आर्मी या बंडखोर गटापासून धोका आहे. हिंदुस्थानी लष्कर सध्या म्यानमारच्या सैन्याबरोबर एकत्रित बंडखोरांच्या विरोधात कारवाया करत आहे. त्यामुळेच ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरांचे म्यानमारमधील शिबिरे उद्ध्वस्त करण्यात हिंदुस्थानला यश मिळाले आहे. म्यानमार लष्कर अत्यंत उत्तम पद्धतीने सहकार्य देत आहे. मात्र म्यानमार आर्मीमध्ये बंडखोरांविरोधात कारवाई करण्याची पुरेशी क्षमता नाही. त्यामुळेच येत्या काळात आराकान आर्मीला या रस्त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाहीच, पण त्या भागातील प्रगती अधिक वेगाने होईल हे समजावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण म्यानमार सैन्याशी आपले सहकार्य जारी ठेवावे आणि लवकरात लवकर हे प्रकल्प सुरू करावे. त्यामुळे ईशान्य हिंदुस्थानातील मिझोराम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांना त्याचा खूपच फायदा होणार आहे. हाच फायदा उद्या ईशान्य हिंदुस्थानातील इतर राज्यांपर्यंत पोहोचवू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या