रौप्य महोत्सवी कलांगण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

‘कलांगण’ ही वर्षा भावे यांची संस्था आता 25 वर्षांची होत आहे. या संस्थेने अनेक गायक, वादक, अभिनेते घडवलेत असं म्हटलं पाहिजे. वर्षा भावे या शास्त्रीय  संगीत गायिका आहेत, संगीतकार आहेत.  त्यांची मुलगी पूर्वी भावे साडेतीन वर्षांची झाली, तेव्हा त्यांनी लहान मुलांना गाणे शिकवायला सुरुवात केली. अर्थात त्याला बैठक शास्त्रीय संगीताचीच होती, पण आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करून मुलांमध्ये संगीताची गोडी निर्माण होण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करू या असाही विचार वर्षाताईंच्या मनात आला आणि मग त्या लहान मुलामुलींना काही बालकविता, बडबडगीतं स्वतः त्या गाण्यांना चाली लावून शिकवू लागल्या. मुलांना ते आवडू लागलं होतं. त्याचदरम्यान सेवाभारती संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या एका स्पर्धेत वर्षाताईंचे काही विद्यार्थी यशस्वी झाले होते. त्या मुलांना घेऊन एखादा कार्यक्रम उद्यान गणेश मंदिराच्या माघी गणेशोत्सवात करावा, असं मंदिराच्या समितीकडून सुचवण्यात आलं. तेव्हा वर्षाताईंनी एक कल्पना मांडली. त्यांच्या मनात आलं की, आपण लहान मुलांच्या या मंचला ‘कलांगण’ असं नाव देऊ या आणि त्याची  घोषणा 31 जानेवारी 1998 रोजी माघी गणेशजन्माच्या दिवशी त्या कार्यक्रमात करण्यात आली. येथून ‘कलांगण’चे बीज पेरलं गेलं. ‘कलांगण’चे   ‘लिंबू टिंबू’, ‘गुणनिधी स्पर्धा’, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित ‘कृष्णमेळा’ तसेच ‘बालस्वर’ हे अभिनव उपक्रम गाजले आहेत.

व्ही. शांताराम यांच्या प्रभातमधील सफर घडवणारा ‘प्रभात दर्शन’ हा ‘कलांगण’ने सादर केलेला आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम यंदाच्या दिवाळीत ‘कलांगण’ने सादर केला.