छोटीशी गोष्ट- प्रेमाची शक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेश वांदिले

सिंह महाराजांना महाराणींचा खूप राग आला होता. त्याचं कारण होतं, महाराणींनी आणलेली दोन नवजात पिलं. ती बिबटय़ाची होती.

एके दिवशी त्या वननगरीत प्रभात समयी फिरायला गेल्या असताना एके ठिकाणी ती दोन बारीकशी पिलं बेशुध्दावस्थेत पडलेली दिसली. बाजूला त्यांची आई मरून पडली होती. महाराणींनी पिलांना हुंगलं. त्यांचा श्वास सुरू होता. त्यांनी त्या पिल्लांना जिभेने चाटलं. थोडय़ा वेळाने ती पिल्लं शुध्दीवर आली. दोन्ही पिल्लं सिंहीण महाराणींना बिलगली. महाराणींनी त्यांना दूध पाजलं. नीट डोळेही उघडता येऊ न शकणाऱया त्या पिल्लांना घेऊन महाराणी गुहेत परतल्या.

दुसऱया प्राण्यांची पिल्लं गुहेत आणल्यामुळे सिंह महाराज त्यांना रागावले. त्या दोघांना मारण्यासाठी त्यांनी पंजा उगारला. महाराणींनी त्यांना अडवलं. त्या दोघांना काही इजा केली तर गुहा सोडून जाईन अशी धमकी त्यांनी दिली.

महाराजांचा नाइलाज झाला. महाराणींपुढे त्यांची डाळ शिजेना. तरीसुध्दा महाराज काहीही करू शकतात हे लक्षात आल्याने महाराणी त्या दोन्ही पिल्लांची खूप काळजी घेऊ लागल्या.

बिबटय़ाच्या पिल्लांनासुध्दा महाराणींचा लळा लागला. महाराणी त्यांना आपल्या नजरेसमोरून दूर जाऊ देत नसत. हळूहळू बिबटय़ाची पिल्लं मोठी होऊ लागली. महाराणींनी त्यांना स्वरक्षण करणं, शिकार करणं व इतर अनेक बाबी शिकवल्या.

महाराजांबद्दलही त्या त्यांना सतत चांगलंच सांगत असत. महाराजांचा राग करू नका. ते प्रेमळ आहेत. ते रागावले तरी शांत राहा, असं बरंच काही त्यांनी त्यांना शिकवलं.

महाराणींना दोन राजपुत्र होते. त्यांचीही बिबटय़ांच्या पिल्लांसोबत मैत्री झाली. लहानपणापासून चारही जण एकत्रच वाढल्याने त्यांची मैत्री घट्ट झाली. मात्र महाराजांना हेसुध्दा पसंत नव्हतं. ते कायम बिबटय़ांच्या पिल्लांवर गुरगुरत असत.

एकदा सिंह महाराज जंगलात महाराणींसोबत फिरायला गेले होते. त्यांनी दोन्ही राजपुत्र आणि बिबटय़ाच्या दोन्ही पिल्लांना सोबत यायला सांगितलं. महाराज आणि महाराणी समोर आणि चारही पिल्लं मागे, अशी त्यांची छान भ्रमंती सुरू होती.

रमतगमत पुढे पुढे जात असताना महाराज आणि महाराणी शिकाऱयाच्या जाळय़ात सापडले. ते बघून राजपुत्र पळून गेले. मात्र दोन्ही बिबटय़ांची पिल्लं तिथेच घुटमळत राहिली. त्यामुळे शिकारी चरफडू लागले. शिकारी कुठे लपला असल्याचं एका बिबटय़ाच्या लक्षात आलं. त्याने चपळाई करून त्याच्यावर हल्ला चढवला. हे बघून तो शिकारी घाबरला आणि पळू लागला. दुसऱयाने त्याची मानगुटी पकडून त्यास ठार केले. तो शिकारी ठार झाल्यावर त्या दोन्ही पिल्लांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडून काढलं व दोघांची सुटका केली.

आपण ज्यांचा एवढा राग करत होतो त्यांनीच आपले प्राण वाचवल्याचं बघून महाराजांना गहिवरून आलं. त्यांनी महाराणींची क्षमा मागितली.

महाराणी म्हणाल्या,

“आपण प्रेम दिलं, काळजी वाहिली तर पिल्लं कुणाचीही असली तरी ती अशी प्रेमळ होतात. आपल्याला माया लावतात. आपली काळजी घेतात, महाराज.”

“होय महाराणी, चुकलंच आमचं.” असं म्हणून त्यांनी महाराणी आणि त्या दोन पिल्लांची क्षमा मागितली. त्यानंतर ती पिल्लं महाराजांचे प्रमुख रक्षक झाले.