
नांदेडच्या कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य, मराठवाडय़ातील बालसाहित्यकार प्राचार्य सुभाष वसेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने बालसाहित्य आणि चित्रकला या क्षेत्राची हानी झाली आहे. पऱ्यांची शाळा, मोगऱ्याची फुले, गाण्याचे गाव, वाऱ्यावरती उडवू पतंग हे (बालकविता संग्रह व ध्वनिफीत) परीचे अश्रू, समुद्रातील राज्यात राजू हे त्यांचे बालकथासंग्रह विविध प्रकाशनांनी प्रकाशित केले. सुभाष वसेकर यांची ‘पाहुणे’ ही कविता इयत्ता दुसरीच्या बालभारती पाठय़पुस्तकात 1979 साली समाविष्ट झाली होती. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘पऱ्यांची शाळा’ ही बालकविता (2007) साली समाविष्ट झाली, तर याच सर्वोत्तम बालकवीची ‘शतकातील बालकविता’ ही बालकविताही त्याच वर्षी समाविष्ट झाली होती.
प्राचार्य वसेकर सर अंबाजोगाई येथे 21 फेब्रुवारी 1997 रोजी झालेल्या पाचव्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या भगिनी प्रा. सौ. सुरेखा दंडारे (वसेकर) यांनी आपल्या मोठय़ा बंधूविषयी एका लेखात विस्ताराने लिहिले होते. 1975 सालापासून उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारात बालसाहित्यविषयक साहित्यकृतींचा समावेश होऊ लागला. त्यात वसेकरांच्या ‘पऱ्यांची शाळा’ या बालकवितासंग्रहास हा पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यापासूनच राज्य पुरस्कारात सर्वोत्तम बालसाहित्यालाही पुरस्कार सुरू झाले. यातील कविता आणि चित्र मुलांच्या कल्पनाशक्तीस वाव देणारेच होते. त्यांच्या अनेक उत्तमोत्तम बालकविता तत्कालीन अनेक महत्त्वाच्या बालमासिकांत, दिवाळी अंकात प्रसिद्ध होत गेल्या. अनेक कवितांचे आकाशवाणीच्या कार्यक्रमातून प्रसारण झाले. वसेकर खरे तर मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी. पुढे या कला शिक्षणाचा उपयोग त्यांना नांदेडमध्ये त्यांच्या वडिलांनी कलामहर्षी त्र्यंबक वसेकर यांनी सुरू केलेल्या अभिनव चित्रकला महाविद्यालयाचे प्रशासन, प्राचार्यपद सांभाळताना झाला. एखाद्याच्या घरात साहित्य, कला, संस्कृतीचे वातावरण असले की, आपोआप कलेचा वारसा हा आधीच्या पिढीकडून नंतरच्या पिढीकडे येत असतो. सुभाषजींच्या बाबतीत काहीसे असेच झाले असावे. मराठवाडय़ात नांदेड येथून 1955 साली कलामहर्षी त्र्यंबकराव वसेकर यांनी ‘‘अभिनव चित्रशाळा संचालित चित्रकला महाविद्यालयाची स्थापना केली. त्र्यंबक वसेकरांच्या व्यापक दूरदृष्टीने मराठवाडय़ातील कला क्षेत्रास, विशेषतः चित्रकलेमधील कलाभानास अधोरेखित केले गेले. त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे महत्त्वाचे कार्य त्र्यंबकरावांनी केले. या महाविद्यालयात कला शिक्षण घेतलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आज चित्रकलेच्या क्षेत्रात आपला नावलौकिक टिकवून आहेत. मराठवाडाभर शाळाशाळांतून होणाऱ्या चित्रकला महाविद्यालयाच्या चार महत्त्वाच्या परीक्षांमुळे शालेय मुलांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. आपल्या वडिलांचा हाच कलेचा वारसा नंतरच्या काळात सुभाष वसेकरांपर्यंत आला. या महाविद्यालयाचे प्राचार्य या भूमिकेत प्रशासकीय कार्य करीत असताना फाऊंडेशन कोर्स व एटीडी ही दोन शैक्षणिक वर्षे कला शाखेच्या विद्यार्थ्यांना मिळाली. त्या विद्यार्थ्यांना वसेकर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
समवयस्कांत अथवा मुलांत फार चटकन मिसळण्याचा त्यांचा स्वभाव नसला तरी एकूणच त्यांचे व्यक्तिमत्त्व, वक्तशीरपणा, शिस्तप्रियता, त्यांचा कलेचा अभ्यास, भाषाप्रभुत्व, अध्यापन शैली, लेखन, सुलेखन, शुद्धलेखन, साहित्याची निर्मिती याविषयी त्यांच्या विद्यार्थ्यांना कायम उत्सुकता वाटावी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. एवढेच नव्हे तर कलेचा दर्जा आणि कलात्मक जाणीव याबाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. संस्थेत सुरू असलेले फाऊंडेशन, एटीडी याचा दर्जा पदवी अभ्यासक्रमाच्या बरोबर असायचा.
सुभाष वसेकरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप तर कलाक्षेत्रावर सोडलीच होती; पण बालसाहित्याच्या या क्षेत्रात मोजकीच साहित्यनिर्मिती करून लक्षणीय काम केले. त्यांच्या कार्याचा, लेखनाचा सन्मान राज्य पुरस्कारासह संतुकराव भोकरे, ग. ह. पाटील पुरस्कारांनी झाला. अंबाजोगाई येथे 1997 साली भरलेल्या 5 व्या मराठवाडा बालकुमार संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. वसेकर यांच्या निधनाने कलाक्षेत्र आणि बालसाहित्य या दोन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे.
>> प्रशांत गौतम




























































