ठसा – सुलोचना चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे 

‘लावणीसम्राज्ञी’ असा लौकिक प्राप्त झालेल्या हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला. त्यांनी बोर्डावरची लावणी माजघरात आणली. मुद्रा अभंगाची आणि ओठावर ठसकेबाज लावणी अशी सुलोचना चव्हाण यांची खासियत आहे. अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाच्या निमित्ताने महाड येथे आणि त्यापूर्वी पार्ल्याच्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये त्यांची प्रकट मुलाखत घेण्याचा योग आला. एवढेच नव्हे तर मुंबई विद्यापीठाच्या आमच्या लोककला अकादमीच्या तसेच शाहीर अमर शेख अध्यासनाच्या त्या सुरुवातीपासून मार्गदर्शक आहेत. आमचा असा एकही परंपरा महोत्सव नाही की ज्यात सुलोचना चव्हाण यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला नाही. त्यांचे चिरंजीव व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तालवाद्य वादक विजय चव्हाण लोककला अकादमीमध्ये वाद्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत.

सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे विवाहापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे शिक्षण जेमतेम चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. बालपणी श्रीकृष्ण बालमेळ्यात त्यांनी काम केले. हिंदी, उर्दू, गुजराती, मराठी नाटकांत बालभूमिका केल्या. सुलोचना यांच्या मोठय़ा भगिनीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. श्रीकृष्ण बालमेळ्याचे रंगभूषाकार दांडेकर चित्रपट सृष्टीशी संबंधित होते. दांडेकर यांच्या ओळखीतून संगीत दिग्दर्शक शाम बाबू पाठक यांच्याकडे सुलोचनाबाईंनी पहिले चित्रपट गीत गायिले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी गायनाला प्रारंभ केला. लग्नापूर्वी सुमारे 70 हिंदी चित्रपटांतून त्यांनी पार्श्वगायन केले. हिंदी चित्रपट सृष्टीत त्या सुलोचना कदम अथवा के. सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी ‘भोजपुरी रामायण’ गायिले.

भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली. मराठी चित्रपटातील लावणी गायन ही सुलोचनाबाईंची खरी ओळख झाली. त्यांना त्यासाठी ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला. फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर आणि थेट माजघरात लोकप्रिय करण्याचे ऐतिहासिक कार्य सुलोचनाबाईंनी केले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायिलेल्या ‘सांभाळ गं, सांभाळ गं’, ‘दौलत लाखाची’ या लावणीने सुलोचनाबाई विलक्षण प्रभावित झाल्या. आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात त्यांनी मराठीतले पहिले पार्श्वगायन केले. ’मुंबईच्या कॉलेजात गेले पती आले होऊन शान बी. ए. बी. टी.’ असे या गीताचे बोल होते. संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या तसेच सुलोचनाबाईंनी गायिलेल्या या गीताला रुपेरी पडद्यावर ‘हंसा वाडकर’ यांनी साकार केले होते. 1952 साली ‘कलगी-तुरा’ या चित्रपटासाठी त्यांनी लावणी गायन केले. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते श्यामराव चव्हाण! लावणी गायनात सुरांची नजाकत आणि शब्दफेक यांचे शिक्षण सुलोचनाबाईंना श्यामराव चव्हाण यांनी दिले. 12 ऑगस्ट 1953 रोजी त्या श्यामराव चव्हाण यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या.

’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच गाजल्या. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या लावण्यांपैकी ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हंत्यात लवंगी मिरची’ ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी लावणीच्या मूळ ठसक्यात गाजवली. लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका तसेच खटका देण्याचे काम सुलोचनाबाईंनी केले. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा ’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का?’ या व अशा अनेक लावण्या सुलोचनाबाईंनी गायिल्या, त्या लोकप्रिय झाल्या. त्यांचा वाढदिवस रेडिओ सिलोनवर गाणी प्रसारित करून साजरा केला जातो. सुलोचनाबाईंनी लावणी सोबत भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले आहे.  लावणीचा ठसका आवाजातून सादर करताना या गेय प्रकारचा घरंदाजपणा आणि अभिजात लोकसंगीताची परंपरा सुलोचनाबाई यांनी समर्थपणे सांभाळली.