
>>दिलीप देशपांडे
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुस्थानातील बहुतेक सर्वच भागात येणारी, उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबीयात घरासमोर तुळस असते. तुळशी वृंदावन असते.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. या प्रबोधिनी एकादशीला श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. सांगता होते.
तुळशी विवाह म्हणजे तुळस या पवित्र वनस्पतीच्या रोपाची शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्याचाच अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह करण्याची प्रथा आहे.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. तिला विष्णुप्रियाही म्हणतात. तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते. हे एक काम्यव्रत आहे. शास्त्रातही सांगितले आहे, ज्यांना कन्या नसेल त्यांनी एकदा तरी तुळशीचा विवाह लावून कन्यादानाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे.
तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत, संकल्प केले असतील त्याची समाप्ती करून ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग सेवन करण्याची पद्धत आहे. तुलसी विवाहानंतरच विवाह मुहूर्त सुरू होतात.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गाई दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व आहे.
‘तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान,उठोनिया प्रातःकाली, वंदी तुलसी माऊली, नाही आणिक साधन, एक पूजन तुळशीचे, न लगेच तिर्थाटना जाणे, नित्य पूजने तुळसीसी, योगायोग न लगे काही, तुळशीवाचून देव नाही’ अशा शब्दांत संत एकनाथ महाराजांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे
देवाला नैवेद्य दाखवताना आपण तुळशीच्या पानांचा वापर करतो. नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवतो. आपला नैवेद्य देवापर्यंत लवकर पोचावा ही भावना असते. वाईट शक्तीने आपल्यावर आक्रमण करू नये म्हणूनच दाराशी तुळस लावण्याची प्रथा आहे. दारासमोर वृंदावन असते. जुन्या काही रूढीपरंपरा आहे. त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू होते. आजकाल आपणांस बऱ्याच प्रमाणात विसर पडत चाललाय.
तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. घरासमोर तुळस असल्यास पिसवा, जंतू शिरकाव करत नाही. तुळस प्रदूषणनाशक आहे. हवा शुद्ध करणे हा तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. विज्ञान दृष्टीने तुलसी वनस्पती म्हणून खूप महत्त्वाची आहे.
हिंदूंच्या अंतःकरणात जसा तुळशीबद्दल पूज्य भाव, पवित्र भाव आहे, तसाच इतर धर्मांतही आदरभाव आहे. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ म्हटले आहे. ग्रीक भाषेत तुळशीला ‘बेझिलीकाँन’ म्हणजे राजयोग म्हणतात. तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानतात.
आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पापे, पातके, नष्ट करतात. म्हणूनच तुळशीला पापनाशिनी म्हणतात.
म्हणूनच म्हटले जाते, ज्या घरी तुळशीचे बन आहे, ते घर तीर्थक्षेत्रासारखे पवित्र असते.

























































