लेख – आभाळमाया – जीवसृष्टीचे निकष

>> वैश्विक  

पृथ्वीसारखा ग्रह सापडला’ अशी अवकाशी बातमी अधूनमधून येते आणि सर्वसामान्यांना कुतूहल वाटतं की, ‘आपल्यासारखंच’ कोणीतरी विश्वात अन्य ठिकाणी आहे खरं! मग ती जीवसृष्टी कशी असेल? मुळात त्या पृथ्वीवर सजीव असेल का? असला तरी आपल्यासारखा प्रगत (!) असेल का? वगैरे चर्चा रंगते. अशा ऍकॅडेमिक चर्चा काही गोष्टी जाणून घ्यायला उद्युक्त करतात. विज्ञानातील एखाद्या गोष्टीबद्दलची मतं-मतांतरं ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ अशी ठरली तर ते चांगलेच. मात्र वैज्ञानिक विषयाच्या गप्पांसाठी, किमान काही माहिती असावी लागते आणि नवं काही जाणून घेण्याची तसंच आपल्या संकल्पना योग्य नसल्या तर त्या बदलण्याचीही तयारी असली तरच चर्चा ‘हेल्दी’ होते.

कुणी तरी असेल तिथे ही संकल्पना पृथ्वीबाह्य जगाची. साध्या गणिती हिशेबाने असल्या आकाशगंगेसारख्या एका दीर्घिकेत सुमारे 200 अब्ज तारे असतील, तर त्यातले काही आपल्या सूर्यासारखेही असायला हरकत नाही. शिवाय अशा अनेक सूर्यांभोवती ग्रहमालाही असणं शक्य आहे. तसं असलं तर कितीतरी जीवसृष्टींनी आपली दीर्घिका गजबजलेली असू शकते आणि विश्वातील अब्जावधी दीर्घिका (गॅलॅक्सी), तर अनेक तारे, ग्रह असलेल्या असणारच. थोडक्यात पृथ्वीसारखं विकसित जीवन किंवा आपल्यापेक्षाही प्रगत जीवन असलेले एलियन असू शकतात. मात्र त्याविषयी ठोस पुरावा मिळेपर्यंत ते असतीलच असं सांगता येत नाही.

ही मांडणी झाली दीर्घिका, तारे, ग्रह यांची. पण त्यापैकी किती तारे, जोडतारे आहेत, त्याभोवती ग्रहमाला किती तारे सांभाळून आहेत, त्या ग्रहांचे आकार आणि त्या ताऱयांपासून त्यांचं अंतर किती आहे? असे अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं मिळवताना काही संकल्पना-सिद्धांतांचा आधार घ्यावा लागतो. नुसता इतर कुठे जीवसृष्टी असेल का? असा प्रश्न आमच्या कार्यक्रमात विचारला  तर बहुतेक जण होकारार्थी उत्तर देतात. त्यावर एकेका निकषाचा विचार करू लागलं की जीवसृष्टीच्या अस्तित्वाविषयी मतं बदलतात.

हबल, चंद्रा असे टेलिस्कोप अवकाशात गेलेत आणि रेडिओ दुर्बिणीद्वारे तर ऑप्टिकल टेलिस्कोपला न दिसणाऱया अवकाशस्थ वस्तूंच्या प्रतिमा आपल्याला मिळू लागल्या आहेत. आपल्याकडे नारायणगावजवळच्या खोडद येथे असलेल्या जायण्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचं कामही विश्वातील दूरस्थ वस्तू आणि विश्वनिर्मितीच्या काळातला हायड्रोजन वायू शोधण्याचं आहे. जगात असे अनेक रेडिओ टेलिस्कोप कार्यरत असून विराट विश्वाच्या पसाऱयाची मोजदाद करीत आहेत.

तर दुसऱया जीवसृष्टीच्या बाबतीत अशाच एका रेडिओ ऍस्ट्रॉनॉमरने काही निकष ठरवले. त्याचं नाव फ्रॅन्क ड्रेक. त्यांच्या निकषांच्या समीकरणाला ‘ड्रेक इक्वेशन’ म्हणतात. ‘सेर्टी’ म्हणजे सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्टिअल इन्टेलिजन्स या संस्थेसाठी कार्य करणारे पॉल शूल्टझ् आम्हाला काही वर्षांपूर्वी भेटले होते. या उपक्रमाद्वारे परताऱयाभोवतीच्या ग्रहांचा आणि असलीच तर प्रगत जीवसृष्टी शोधण्याचा कार्यक्रम चालतो. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील खगोल अभ्यासक फ्रॅन्क ड्रेक यांनी 1960 च्या दरम्यान अशाच संभाव्य जीवसृष्टीविषयीचे निकष तयार केले.

आपल्याच आकाशगंगा दीर्घिकेतील जीवसृष्टी शोधताना त्या ग्रहमालेचा जनक तारा आपल्या सूर्याच्या वस्तुमानाचा आहे का? मुळात असे तारे आकाशगंगेत किती असतील? त्याभोवती किती ग्रह किती अंतरावरून फिरत असतील? त्यातले पृथ्वीसारखे काही (पाणीदार) असतील का? त्यावर सजीवाची निर्मिती झाली असेल का? ते सजीव आपल्यासारखे प्रगत असतील का? आपल्याशी संपर्क साधायला त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल का? त्यांनी तसे संदेश आपल्याकडे पाठवले असतील का? अशा बऱयाच प्रश्नांची वैज्ञानिक निकषांवर टिकणारी उत्तरं मिळाली तर जीवसृष्टी वगैरे गोष्टीत काही तथ्य असेल. इंग्लिशमध्ये ‘इफस् आणि बटस्’ म्हणजे सगळय़ा पण आणि पंरतुची उत्तरं मिळाली, तर एलियनविषयी काहीतरी कळेल.

आपल्याकडचं रेडिओ संदेशवहन 1900 नंतर विकसित झालं. त्याची अवकाशाचा वेध घेण्याची क्षमता तर गेल्या पन्नासेक वर्षांतली. एखाद्या जीवसृष्टीकडून त्यापूर्वीच आपल्याला सिग्नल येऊन गेले असले तर? किंवा परताऱयाभोवतीच्या प्रगत सृष्टीची निर्मिती आणि ऱहासही होऊन गेला असला तर? असे अनेक किंतु उद्भवतात. अर्थात, तरीही आपण चिकाटीचे प्रयत्न करायलाच हवेत. 1974 मध्ये शौरी तारका समूहाकडे पाठवलेल्या रेडिओ संदेशाचं उत्तर यायला हजारो वर्षे लागणार, पण कुणीतरी फार पूर्वी पाठवलेला संदेश आपल्याला कोणत्याही क्षणी प्राप्त होऊ शकतो. वैश्विक विश्वरचनेची हीच तर उत्कंठावर्धक गोष्ट आहे. अनेक निकषांचा कस तिथे लागतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या