लेख – उत्साही तरुणाई!

>> दिलीप जोशी

कुणाच्याही जीवनातला सुवर्णकाळ म्हणजे तारुण्य. शारीरिक आणि मानसिक उत्साह, उमेदीचा, जीवनात नवं काही करून दाखवण्याचा, स्वतःला घडवण्याचा हा काळ. प्रत्येक काळातली तरुणाई त्या त्या काळानुसार आपल्या तारुण्यातील उत्साहाचा उत्सव साजरा करीत असते. भावी जीवनाची सुखस्वप्ने या काळात मनात फुलत असतात. त्यासाठी प्रयत्न, कष्ट करण्याची तयारीही असते. असे अनेक ‘सेल्फ मेड’ किंवा स्वतःला घडविणारे, यशस्वी होणारे अनेक तरुण पाहिले आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही चिकाटीने अभ्यास करून यशप्राप्ती केलेल्यांची संख्या कमी नसते. तरुणाईच्या कौशल्य-संकल्पनांचा ‘जागतिक दिवस’ साजरा नुकताच झाला. जगभरचे अनेक तरुण-तरुणी कोविडसारख्या विपरीत काळातही मोठय़ा जिद्दीने काम करताना दिसतात. त्यांचा हा रचनात्मक कार्यभाव निश्चितच कौतुकास्पद. दूर खेडोपाडय़ात राहणाऱया आणि जिद्दीने काही करणाऱया सर्वांनाच प्रसिद्धीच्या झोतात येता येतं असं नाही. पण त्यांची सिद्धी त्यांचं आयुष्य उजळायला पुरेशी असते. कला, विज्ञान, शेती, उद्योग-व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रांत विशेष काही कौशल्य दाखवणाऱया, ‘हट के’ विचार करून नवनिर्मिती करणाऱया तरुणाईची आपल्या देशातही कमतरता नाही.

आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तरुणाईच्या कौशल्याला अधिक महत्त्व. कारण उद्याचा हिंदुस्थान त्यांचाच असणार आहे. गेल्या शतकात जगाचे एकूण जीवनमान उंचावल्याने आता ‘तरुणाई’चे असे विनिक्षित नैसर्गिक वय असतं तरी पूर्वी चाळिशीलाच ‘म्हातारं’ झाल्याची जी भावना असायची तशी आता दिसत नाही. पासष्टीनंतर हायकिंग- ट्रेकिंग करणारे असतात. अर्थात, विशीच्या तरुणांशी काही स्पर्धा होऊ शकत नाही. तरीही आपण जोपर्यंत मनाने तरुण म्हणजे पुढचा काळ आणि त्यातील तरुणाईशी संवाद साधण्याइतके सजग असलो तर मानसिक ताजेपण तरुण वयासारखंच असतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी वयाची साठी उलटल्यावर चित्रकला शिकून पॅरिस येथे प्रदर्शन भरवलं आणि अपवादात्मक का होईना, पण शंभरी ओलांडलेले फौजासिंग इंग्लंडमधल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेत होते, ही उदाहरणं खूप उमेद देणारी ठरतात. निराश करणारे प्रसंग माणसाच्या आयुष्यात कोणत्याही वयात येतातच. पण त्यावर मात करण्याचा निश्चय म्हणजे मनाचं तारुण्य.

तंत्र-कौशल्यात नव्या पिढीतले तरुण पुढे असण्याचे कारण म्हणजे त्यांना सध्या अनुकूल असा काळ आहे. ‘ग्लोबलायझेशन’मुळे जवळ आलेल्या जागतिक वातावरणाचे काही तोटे आहेत तसे फायदेही आहेत. विज्ञानातील नव्या वाटा, नवी आव्हानं नवतरुणाईला खुणावताहेत. ती प्रत्येक काळात सापेक्षतेने असतातच. त्यातूनच माणसाची आजची प्रगती झाली आहे. भास्कराचार्यांपासून आइन्स्टाइनपर्यंत अनेकांनी त्यांच्या तरुण वयातच अद्वितीय संशोधन केलं. विकलांग असूनही स्टीफक हॉकिंग कधीच ‘म्हातारे’ झाले नाहीत. मग धडधाकटांनी हिंमत का हरावी? अशी स्फूर्तीदायी उदाहरणं मोठय़ा प्रमाणावर तरुणाईसमोर असतील तर त्यांच्या मनावर असलंच तर मळभ निश्चित दूर होईल. ते नवी उत्तुंग स्वप्न पाहतील. ती प्रत्यक्षात आणायला कृतीप्रवण होतील. माजी राष्ट्रपती आणि देशातील रॉकेट वैज्ञानिक अब्दुल कलाम अखेरपर्यंत विलक्षण उत्साही होते. ‘डेअर टू ड्रीम’ म्हणजे चांगली स्वप्नं पाहण्याचं धाडस करा असं ते सांगत. ही स्वप्नं झोपेत नव्हे, तर जागेपणी पाहावी लागतात. त्यातून नवनव्या तंत्रकौशल्यांचा आविष्कार प्रत्येक क्षेत्रात होतो. याची असंख्य उदाहरणं जगभर आणि आपल्याही देशात आढळतील.

तरुणाईच्या विचारातून निर्माण झालेले काही समाजोपयोगी प्रयोग सादर करण्याची स्पर्धा मराठी विज्ञान परिषद घेत असते. तिथे अनेक कार्यकुशल तरुण-तरुणींना भेटण्याची संधी मिळाली. ही मुलं त्यांचे प्रयोग सादर करून वाहवा मिळवतात. शेतीपासून उद्योगापर्यंत ते आरोग्य, समाजशास्त्र्ााrय प्रश्नांबाबतही प्रयोग तरुणाई करीत असते. नवी पिढी किती रचनात्मक काम करते ते पाहण्याचीही नजर हवी. म्हणजे असे अनेक प्रयोगशील तरुण दिसतात.

आमच्या खगोल संस्थेत, अक्षीर याने आपल्या मित्राच्या सहाय्याने स्वतःच विचार आणि डिझाईन केलेल्या सूर्य-पृथ्वी-चंद्राच्या फिरत्या प्रतिकृतीला (मॉडेल) कानपूर आयआयटीचे पहिले पारितोषिक तर मिळालेच, पण पुढे तो अमेरिकेत गेल्यावर तिथेही त्याच्या या तंत्रकौशल्याने तिकडचे लोक प्रभावित झाले. समीरने पीएसएलव्ही रॉकेट आणि चंद्रावर उतरलेल्या ‘इगल’ या पहिल्या मानवाच्या यानाची हुबेहूब प्रतिकृती बनवली. विक्रांतने गुरुत्वीय लहरी पकडणाऱया ‘लायगो’ प्रकल्पाची आणि शैलेशने खग्रास सूर्यग्रहणाची अशी प्रतिकृती बनवून सोप्या भाषेत हे विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहजतेने पोहोचवले.

असेच प्रयोग गावोगावची तरुणाई करीत असते. पाण्यावर चालणारी सायकल अथवा हाताने चालवता येणारे धुलाई यंत्र अथवा काही पिकांची संशोधित वाणं याचे प्रयोग ठिकठिकाणी होत असतात. आयटी तंत्रज्ञानाची मदत घेऊन अनेक प्रयोगांत अचुकता आणता येते हे तरुणाईला समजतं. त्यांच्या या उत्साह, उमेदीला ‘स्कोप’ किंवा वाव मिळेल असं समाजमन हवं. त्यासाठी अंतर्मनातून उत्साह आणायला हवा. आधुनिकता आली म्हणजे समस्या, संकटे संपली असे नव्हे. कोविडने तर प्रगत म्हणवणाऱया देशांच्या शक्तीचा भ्रम उतरवला. पण अशा अनपेक्षित धक्क्यातूनच माणूस सावरेल. तरुणाईचा वाटा त्यात मोठा असेल. त्यांना मनाने तरुण असलेल्या कोणीही प्रोत्साहन मात्र द्यायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या