साय-फाय – डिजिटल डिटॉक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

मोबाईलवर ‘धाड-धुडूम’ आवाजाचे गेम खेळत लोळत असलेला लहानगा, सासू-सुनेच्या मालिकेत रममाण झालेली आई आणि कानाला फोन लावून लॅपटॉपवर कामात गुंग झालेले वडील हे आजच्या घडीला घराघरात दिसणारे चित्र आहे. आपण डिजिटल युगात वावरत असतो आणि रोजच्या जीवनात डिजिटल साधनांत- जसे की मोबाइल, लॅपटॉप, संगणक, स्मार्ट वॉच-पूर्णपणे गुंतलेले असतो. मात्र सांगली जिह्यातल्या ‘वडगाव’ गावात मात्र एक सुखद दृश्य बघायला मिळते आणि त्यामुळे हे गाव आता सर्वत्र प्रचंड चर्चेत आलेले आहे.

असे काय विशेष घडते आहे या गावात, तर संध्याकाळी बरोबर सात वाजता गावात एक सायरन वाजवला जातो आणि रात्री बरोबर दीड तासाने म्हणजे साडेआठ वाजता पुन्हा सायरन वाजवला जातो. या मधल्या दीड तासात गावातील सर्वजण आपला मोबाइल आणि टीव्ही पूर्णपणे बंद ठेवतात. हे दोनवेळचे सायरन म्हणजे गावासाठी इशारा असतात. आजकालच्या आधुनिक जगात यालाच ‘डिजिटल डिटॉक्स’ असे म्हटले जाते. जगभरातील तज्ञ सध्या प्रत्येक व्यक्तीला ‘डिजिटल डिटॉक्स’ची किती गरज आहे हे काकुळतीने सांगत असतात. स्वतःला आधुनिक म्हणवणारे आपण तिकडे दुर्लक्ष करतो. मात्र वडगावसारखे गाव त्याचे महत्त्व समजून ते अमलातदेखील आणते हे खरंच सुखावणारे आहे.

‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजे काय असते? सध्या मोबाइल, संगणक अशा अनेक डिजिटल साधनांचा वापर प्रचंड वाढला आहे. त्याच्या सततच्या वापराने शारीरिक समस्या तर वाढल्या आहेतच, पण अनेक लोकांना मानसिक समस्यांनादेखील सामोरे जावे लागत आहे. डिजिटल वस्तूंच्या सततच्या वापराने निद्रानाश, डोकेदुखी अशा समस्यादेखील उद्भवत आहेत. जगभरातील अनेक लोक मानसिक आजाराला सामोरे जात असून या आजाराचे परिणाम म्हणजे हे लोक इतर लोकांशी प्रत्यक्ष संपर्क, संभाषण टाळू लागतात. सतत चिडचिड करायला लागतात. एक प्रकारच्या भीतीच्या किंवा दडपणाच्या ओझ्याखाली असल्यासारखे अनुभवायला लागतात. यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ‘डिजिटल डिटॉक्स’ अर्थात काही कालावधीसाठी अथवा संपूर्णपणे डिजिटल वस्तूंपासून दूर राहणे होय.

वडगावातील लोक या ‘डिजिटल डिटॉक्स’चा अत्यंत सुखद अनुभव घेत असल्याचे कबूल करतात. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाइल आले आणि घरी बसल्या बसल्या बायका-पुरुष टीव्हीच्या व्यसनात गुरफुटले. एकेकाळी गजबजलेले हे तीन हजार लोकवस्तीचे गाव संध्याकाळनंतर सामसूम पडू लागले. लोकांची एकमेकांशी भेट होईना की शिळोप्याच्या चर्चा घडेनात. मुलंदेखील मैदान विसरून मोबाइलमध्ये रमायला लागली. याचे गांभीर्य उमगलेल्या ग्रामपंचायतीने मग एक नियम बनवायचे निश्चित केले, ज्यामुळे काही काळासाठी तरी गावातले लोक या डिजिटल विळख्यातून मोकळे होतील.

अर्थात, हा नियम तयार करणे व लागू करणे सोपे नव्हते. आधी तर गावातील अनेक पुरुषांनी या विचाराची खिल्ली उडवली. मग ग्रामपंचायतीने गावातील सर्व महिलांना एकत्र केले आणि आपला विचार त्यांच्यासमोर मांडला. आपण टीव्हीच्या मालिकांमध्ये नको तितके गुंतत चाललो आहोत हे जवळपास सर्व महिलांच्या लक्षात येत होतेच. त्यांना या नियमाचे महत्त्व चटकन उमगले आणि त्याचे फायदेदेखील लक्षात आले. त्यांनी या विचाराला पाठिंबा देताच लगेच पंचायतीची बैठक घेण्यात आली आणि नवा नियम लागू करण्यात आला. “शेतावरून आता माझा नवरा लवकर घरी येतो आणि दोन्ही मुलांचा अभ्यास घेतो. मुलेदेखील आनंदाने अभ्यासात मग्न होतात. त्यांचा अभ्यासाचा उत्साह आता वाढायला लागला आहे. मी पण आता निवांतपणे स्वयंपाकघरात लक्ष देऊ शकते.’’ वडगावच्या एका गृहिणीचे हे मत बरेच काही सांगून जाणारे आहे. गावातील सर्व स्त्रियांचे हेच मत असणार हे नक्की.

जर फक्त दीड तासाच्या ‘डिजिटल डिटॉक्स’ने एका संपूर्ण गावात इतका आनंद पसरत असेल तर आपण प्रत्येकाने आता आपल्या प्रियजनांच्या सुखासाठी या ‘व्यसनमुक्ती’चा गांभीर्याने विचार करायला हवा. मग कधी करताय सुरुवात?

[email protected]