वेब न्यूज – देव भाषा

>> स्पायडरमॅन

संस्कृतला ‘देव भाषा’ किंवा ‘देव वाणी’ म्हणून ओळखले जाते. देवांच्या मुखातून निघालेली भाषा म्हणून हिला देव भाषा म्हटले जाते. आपल्या संस्कृतीत पूजनीय असलेले अनेक महान ग्रंथ जसे की पुराण, संहिता, वेद हे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत. संस्कृतला विश्वातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक भाषा मानली जाते. अनेक अभ्यासकांचा दावा आहे की, आपल्या हिंदुस्थानात बोलल्या जात असलेल्या मराठी, हिंदी, बंगाली अशा अनेक प्रमुख भाषांची जननी ही संस्कृत आहे. संगणकासाठीदेखील ही भाषा अत्यंत उपयोगी असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केलेला आहे. एकेकाळी जनमानसाची संवादाची, लेखनाची, व्यवहाराची भाषा असलेली संस्कृत पुढे पुढे मागे पडत गेली आणि इतर बोलीभाषांनी तिची जागा घेतली. मात्र आपल्या हिंदुस्थानात आजही अशी काही गावे आहेत जिथे संवादाची भाषा ही संस्कृत आहे.

मध्य प्रदेशच्या राजगढ जिह्यात वसलेले झिरी हे गाव. गावातील आबालवृद्ध सारे संस्कृतमध्येच संवाद साधतात. संस्कृत ही या गावाची प्रथम भाषा आहे. कर्नाटकातील शिमोगा हा एक प्रसिद्ध जिल्हा. इथल्या तुंगा नदीच्या रमणीय किनाऱ्यावर वसलेल्या मत्तूर गावाचीदेखील प्रथम भाषा ही संस्कृत आहे. या गावातील डॉक्टर, इंजिनीअरदेखील संस्कृत भाषेचाच व्यवहारात वापर करतात. शिमोगा जिह्यामधील होसी हल्ली नावाचे गावदेखील प्रथम भाषा संस्कृतमुळे प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध संस्कृत गीतकार जयदेव यांचे जन्मस्थळ म्हणजे ओडिशाच्या गुर्दा जिह्यातील सासन हे गाव. या गावातदेखील संवादाची भाषा ही संस्कृत आहे.

मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील बघुवार हे गाव व राजस्थानच्या बंसवाडामधील गनोडा हे गावदेखील वरच्या यादीत समाविष्ट होते. इथली लहान लहान मुलेदेखील अगदी सहजपणे संस्कृतमध्ये संवाद साधताना दिसून येतात. महर्षी पाणिनीला संस्कृतचे जनक मानले गेले आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीला जिवंत ठेवणारी ही भाषा आजही देशाच्या कानाकोपऱ्यात जतन केली जात आहे हा एक अभिमानाचा ठेवा आहे.