यंगिस्तान – किल्ले निवतीगड

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

सिंधुदुर्ग जिह्यात एक ठिकाण असे आहे, जिथे एका छोटेखानी टेकडीवर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे ज्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक किनारा आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील हे ठिकाण म्हणजेनिवतीचा किल्लाहोय.

निवती किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर केली. पोर्तुगीजांच्या मुलुखाकडून येणारे आक्रमण थोपविण्यासाठी या गडाचा उपयोग होत असावा.

निवतीच्या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण गाठावे लागते. मालवणपासून पुढे परुळे – निवती असा प्रवास करत आपण निवती गावाजवळ येऊन पोहोचतो. निवतीजवळ आल्यावर दोन फाटे फुटतात. डावीकडे जाणारा रस्ता निवती बीचकडे जातो, तर उजवीकडचा रस्ता थेट निवतीगडावरच जातो. आजमितीस गडाच्या प्रवेशद्वाराची कमान पूर्णपणे ढासळली आहे. मात्र आतील बाजूची पहारेकऱ्यांची देवडी शाबूत आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला आपणास कोरडा खंदक दिसतो.

एकेकाळी गडाच्या संरक्षणासाठी केलेल्या या खंदकात आजमितीस मात्र झाडाझुडपांनी कब्जा केल्याचे दिसून येते. खंदक पाहून झाल्यावर एक वाट समोर असलेल्या बुरुजांकडे जाते, तर डावीकडील दुसरी वाट बालेकिल्ल्याकडे जाते. आपण आधी बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे. बालेकिल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या भिंतीत आपणास गडावर चालून येणाऱ्या शत्रूवर बंदुकीने मारा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या वैशिष्टय़पूर्ण जंग्या दिसून येतात.

बालेकिल्ल्यावरून आपणास निळ्याशार समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दर्शन घडते. बालेकिल्ला व्यवस्थित पाहून झाल्यावर आपण परत माघारी फिरून गडप्रवेश केलेल्या ठिकाणी यायचे. आता पश्चिमेकडे सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर एक खणखणीत बांधणीचा वैशिष्टय़पूर्ण बुरूज आपणास दिसून येतो. हा बुरूज भव्यदिव्य असून याच्या आकारावरून या बुरुजाचा टेहळणीसाठी वापर केला जात असावा. हा वैशिष्टय़पूर्ण बुरूज पाहून पुढे गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकाकडे अजून एक छोटेखानी बुरूज आपणास दिसून येतो. या बुरुजाच्या थोडं पुढे आल्यावर आपणास गडाच्या पिछाडीस असलेल्या भोगवे गावाचा समुद्रकिनारा दिसतो. आपण या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेऊन भोगवे किनाऱ्याचे हे अतीव सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यायचे.

भोगवे किनाऱ्याचे दुरूनच दर्शन घेऊन आपण आता गडाचे दक्षिण टोक गाठायचे. या ठिकाणी पायऱ्या असलेलं एक पाण्याचं टाकं आहे. हे टाकं पाहून दक्षिणेकडील बाजूला थोडे खाली उतरून गेल्यावर गडपायथ्याशी भरसमुद्रात असलेले वैशिष्टय़पूर्ण रंगीबेरंगी खडक आपले लक्ष वेधून घेतात. या खडकांवर सूर्यकिरणे परावर्तित होऊन त्यांचे मूळ रूप अजून खुलून दिसते. निवतीगडाच्या भेटीत रंगीबेरंगी खडकांचा हा नजारा प्रत्येकाने पाहण्यासारखाच आहे. अशा रीतीने गडाची आपली भटपंती पूर्ण होते.

 निवतीगडाच्या भेटीत गडासह कोकणातील सुरम्य सागरी किनाऱ्याचे दर्शन घडते. सागरी किनारा किती पराकोटीचा प्रेक्षणीय असतो हे दाखवणारे हे स्थळ आहे. चला, मग कधी येताय निवतीगडाच्या दर्शनाला?