उद्योगपती अशोक मित्तल यांच्या कोळगाव येथील राजेशाही हॉलिडे रिसॉर्टवर होणार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील राजेशाही असलेल्या हॉलिडे रिसॉर्टवर सीआरझेडचे उल्लंघन करून केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश 1 नोव्हेबर 2018 रोजी मुबंई उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी अशोक मित्तल यांना तीन महिन्याच्या मुदतीत बांधकाम स्वतःहून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली आहे. ही मुदत संपली असून जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाणार असली तरी ही कारवाई मात्र लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे.

बॉम्बे इन्व्हरमेन्ट ऍक्शन ग्रुपचे अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे 8 फेब्रुवारी 1999 मध्ये पूर्वीच्या मालकाकडून पाच एकर जागा विकत घेतली होती. पूर्वीच्या मालकाला मित्तल याना जागा विकण्याआधी या पाच एकर जागेत 514 स्के.मी. बांधकाम, एक पाण्याची टाकी व पाच मीटर पेक्षा जास्त उंच नसलेली भिंत बांधण्याची परवानगी रायगड जिल्हाधिकारी यांनी 4 डिसेंबर 1998 रोजी दिली होती. त्यानंतर त्या मालकाने ही जागा अशोक मित्तल याना विकली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी आधीच्या मालकाला दिलेल्या बांधकाम परवानगी पेक्षा मित्तल यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून 1407 स्के.मी.चे अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे.

या अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत मित्तल यांनी जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबत मध्ये अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मित्तल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 नोव्हेंबर 2018 रोजी अशोक मित्तल यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशोक मित्तल याना नोटीस पाठविली असून तीन महिन्यात स्वतःहून अनधिकृत बांधकाम पाडावे अन्यथा अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून पाडले जाईल असे म्हटले आहे. 1 फेब्रुवारी 2019 पर्यत अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असून ही मुदत संपली आहे. त्यामुळे मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामावर आता जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. मात्र तूर्तास लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने निवडणुकीनंतर मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल असे बोलले जात आहे.

अलिबाग तालुक्यातील किहीम येथील डायमंड किंग निरव मोदी, धोकवडेमधील कुंदनमल तर मांडवा येथील कोठारी या मोठ्या उद्योगपतींचे बंगले सीआरझेडचे उल्लंघन केल्याबाबत जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले आहेत. तर आता अशोक मित्तल यांचाही राजेशाही हॉलिडे रिसॉर्ट लोकसभा निवडणुकीनंतर जमीनदोस्त होणार हे मात्र नक्की.