अशोक मुळ्ये यांचे 80व्या वर्षात पदार्पण, मोनिका मोरेच्या हातून अभीष्टचिंतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये म्हणजे नाटय़ क्षेत्रातील एक वल्ली व्यक्तिमत्त्व, जे परखड आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. आयुष्यात कधीही स्वतःचा वाढदिवस साजरा न करणारे अशोक मुळ्ये उर्फ मुळ्येकाका यांनी आज 80व्या वर्षात पर्दापण केलेय. यानिमित्त एक अनोखा सोहळा आज ‘मातोश्री’वर पार पडला. स्वतःला दिलेल्या एका वचनाप्रमाणे, रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या आणि आता सर्जरीने हात बसवण्यात आलेल्या मोनिका मोरे हिच्या हातून मुळ्येकाकांनी पेढा खावून वाढदिवस साजरा केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत हा हृद्य सोहळा रंगला.

2014 मध्ये मोनिका मोरे हिने रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावले. मोनिका आणि तिच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला. पण मोनिका मोठय़ा धैर्याने या संकटाला सामोरी गेली. मोनिकावर 2020 साली हॅण्ड ट्रान्सप्लांट सर्जरी झाली आणि तिला नव्याने हात बसवण्यात आले. तिच्या अपघातापासून ती मुळ्ये काका यांच्या संपर्कात आहे. ‘‘जेव्हा ती स्वतःच्या हाताने स्वतःची कामे करू लागेल, तेव्हाच तिच्या हातून पेढा खावून वाढदिवस साजरा करेन. ते माझं वाढदिवसाचं पहिलं सेलिब्रेशन असेल,’’ असा निर्धारच जणू मुळ्येकाकांनी केला होता. त्यानुसार हा कार्यक्रम आज पार पडला. या वेळी सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मोनिकाला ड्रेस तर तिच्या आईला साडी देऊन सन्मानित करण्यात आले. ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणाऱया अशोक मुळ्ये यांचा उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला.

उद्धव ठाकरे यांनी मोनिकाच्या जिद्दीचे कौतुक केले. तसेच मोनिकाच्या आईच्या धैर्याला सलाम केला. ‘‘तुमच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची कल्पना करता येणार नाही. पण त्या परिस्थितीतही तुम्ही मोनिकाला पाठबळ दिले. आता तुमच्या मुलीला मजबूत हात मिळाले आहेत, ती अजून कणखर झाली आहे,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोनिका आणि तिच्या आईचे मनोबल वाढवले.

चेन्नईतील एका मुलाने केलेल्या अवयवदानानंतर मोनिकाला त्या मुलाचे हात बसवण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी अवयवदात्याच्या आईवडिलांनी मुंबईत येऊन मोनिकाची भेट घेतली. मोनिकाचे हात आपल्या हातात घेताना त्यांना अश्रू अनावर झाले, अशी आठवण या वेळी मोनिकाच्या आईने सांगितली.

‘व्हाईट मॅन’ अशोक मुळ्ये विविध कार्यक्रमांच्या हटके संकल्पनांसाठी ओळखले जातात. 75व्या वाढदिवशी तर त्यांनी हारतुरे, सत्कार करून घेण्यापेक्षा एका तरुणाला मावा सोडायला लावण्याचा चमत्कार केला होता. ‘माझा पुरस्कार’ आणि ‘असेही एक साहित्य संमेलन’ हे त्यांचे आगळेवेगळे कार्यक्रम आहेत. गतिमंद मुलांच्या आईंचे संमेलन आणि ज्येष्ठ रंगकर्मी संमेलन, नाटककारांचे संमेलन तर कधी मोनिका मोरेच्या भेटीला एखाद्या कलाकाराला घेऊन पोहोच… अशा अनेक संकल्पना त्यांनी तडीस नेल्या आहेत.