धानोरा येथे मृत वानराची वाजत गाजत अंत्ययात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। आष्टी

तालुक्यातील धानोरा येथे ग्रामस्थांनी एका वानराची वाजत गाजत अंत्ययात्रा काढली. त्यानंतर विधीपूर्वक त्याचे दफन केले.

देवराम चौधरी यांच्या शेतातील एका वृक्षावर या वानराने ठाणे मांडले होते. दुष्काळात धानोरा शिवारात पाणी व चाऱ्याच्या शोधात फिरता फिरता हे वानर चौधरी यांच्या शेतात आश्रयाला आले . तेथे त्याला अन्नपाणी मिळू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने अन्नपाणी घेणे बंद केले होते. पशुवैद्य डॉ. वामन यांनी त्याच्यावर उपचार केले मात्र या वानराने आपला प्राण त्याग केला. त्याचा मृत्यु झाल्यानंतर धानोरा येथील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी त्या वानराची वाजत गाजत , टाळ मृदुंगाच्या गजरात भजन अभंग म्हणत अंत्ययात्रा काढली. गावातून अंत्ययात्रा काढून, बाळू देव महाराजांच्या मंदीरा समोर, मारुती मंदीरा जवळ त्या वानराचा दफनविधी करण्यात आला. या प्रसंगी राहुल आडकर, संदेश शेळके, आजिनाथ चौधरी, संजय गायकवाड, छगन बेद्रे, देवराव चौधरी आदी ग्रामस्थ, भाविक व भजनी मंडळी उपस्थित होते.