Asian Games – हॉकीत पाकचा फडशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 10-2 गोल फरकाने फडशा पाडत आशियाई क्रीडा स्पर्धेतील शनिवारचा दिवस गाजविला. हिंदुस्थानचा हा पाकिस्तानवरील आतापर्यंत सर्वात मोठा विजय ठरला, हे विशेष.

हिंदुस्थानकडून या लढतीत कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक 4 गोल केले. मंदीप सिंहने आठव्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. हरमनप्रीतने 11व्या, 17व्या, 33व्या व 34व्या मिनिटाला गोल केले. सुमितने 30व्या, वरुण कुमारने 44व्या, शमशेर सिंहने 46व्या, तर एल. के. उपाध्यायने 49व्या मिनिटाला गोल केले.

हिंदुस्थानने पूर्वार्धात 4-0 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर 6 गोल करून हिंदुस्थानने कारकिर्दीत प्रथमच पाकिस्तानविरुद्ध 10 गोल ठोकले. पहिल्या हाफमध्ये, तर पाकिस्तानची गोलची पाटी कोरीच होती. मध्यंतरानंतर 2 गोल करण्यात त्यांना यश आले. पाकिस्तानकडून एम. एस. खानने 38व्या मिनिटाला, तर राणा अवाने 45व्या मिनिटाला गोल केले.